दहा वर्षांपूर्वी आलेल्या प्रेमकथेचा सिक्वलपट करणं ही सोपी गोष्ट नव्हती. ‘मुंबई-पुणे- मुंबई’ चित्रपटाचे स्वरूप, त्याची कथा, मांडणी या सगळ्याच गोष्टी भिन्न होत्या. स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे हे अभिनयातले दोन हुकमी एक्के घेऊन काढलेला हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडला, यशस्वी ठरला. त्यानंतर त्याचा सिक्वल येणार येणार म्हणता २०१५ साल उजाडले. पण गंमत अशी की पहिल्या जोडीतील नायक आणि नायिकांची प्रेमकथा यशस्वी ठरली. त्यानंतर त्यांची लग्नकथा पडद्यावर रंगताना दोन्हीकडच्या कु टुंबांची वऱ्हाडी मंडळी म्हणजे कसलेल्या कलाकारांचा ताफा घेऊन केलेल्या ‘मुंबई-पुणे-मुंबई २’लाही चांगलेच यश मिळाले असल्याने दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांनी नुकतीच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीही घोषणा केली आहे.
‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या सतीश राजवाडे दिग्दर्शित सिक्वलपटाला तिकीटबारीवर चांगले यश मिळाले. आठवडय़ाभरातच जवळपास सात कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाला अजूनही देशात आणि परदेशात मागणी आहे. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक येथेही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. तिथेही चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे आणि अमेरिकेतही चित्रपट अजून सुरू आहे. सॅनफ्रान्सिस्को, ह्य़ूस्टन, लॉस एंजेलिससारख्या शहरांत चित्रपट चांगली कमाई करतो आहे. त्यामुळे या चित्रपटाचे तिकीटबारीवरील आर्थिक गणित चांगलेच जमून आल्याबद्दल टीमने जल्लोष व्यक्त करतानाच तिसऱ्या सिक्वलचीही घोषणा केली आहे.
‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा मूळ चित्रपट लोकांना खूप आवडला होता. त्यावेळी पुण्याचा मुलगा आणि मुंबईची मुलगी यांची प्रेमकथा सुरू झाली होती. त्या दोघांचं पुढे काय झालं, हे पाहायला आम्हाला आवडेल, अशा प्रतिक्रिया कितीतरी प्रेक्षकांनी दिल्या होत्या. त्या चित्रपटाचे अनेक भाषांमध्ये रिमेकही झाले. मात्र तरीही चित्रपटाबद्दलची लोकांची उत्सूकता कायम होती. म्हणजे, कुठल्याही नवीन चित्रपटाची घोषणा झाली किंवा स्वप्निल-मुक्ताचा एकत्र चित्रपट येणार हे कळले ही ‘मुंबई-पुणे-मुंबई’चा सिक्वल येणार, याची चर्चा सुरू व्हायची, असे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले होते. त्यामुळे त्या चित्रपटाचा सिक्वल निश्चित होता. पण तो योग्य वेळी प्रदर्शित झाल्याची भावना या संपूर्ण टीममध्ये आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ चित्रपट अनेक अर्थाने वेगळा ठरला. मूळ पुण्याचा मुलगा आणि मुंबईची मुलगी एवढीच ओळख असलेले नायक-नायिका सिक्वलमध्ये, मात्र गौतम प्रधान आणि गौरी देशपांडे या नावांनी पुढे आले. पहिल्या भागात या दोघांच्या संवादातूनच ऐकू आलेले त्यांचे आई-बाबा आणि इतर मंडळी सिक्वलमध्ये प्रत्यक्षात उतरली. या सगळ्याची एक गंमत प्रेक्षकांना भावणार, हा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा विश्वास तंतोतंत खरा ठरला आहे.
सिक्वल करत असताना प्रशांत दामले, सविता प्रभुणे, विजय केंकरे आणि मंगला केंकरे यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांचे एकत्र येणे हीसुद्धा जमेची बाजू होती. आणि याच कलाकारांना घेऊन सिक्वलचं चित्रीकरण करत असताना चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वलचीही कल्पना आली होती, असे सतीशने सांगितले. मात्र त्यावेळी तिसरा सिक्वल येणारच याची ग्वाही दिग्दर्शक म्हणून त्याने दिली नव्हती. आता सिक्वलला तिकीटबारीवर मिळालेल्या प्रतिसादामुळे निर्माते संजय छाब्रिया आणि सतीश यांच्यासह संपूर्ण टीमच आनंद साजरा करते आहे. त्यानिमित्ताने, या चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वलची घोषणा क रण्यात आली आहे. तिसऱ्या कथेत काय पाहायला मिळणार, याबद्दल अजून काही निश्चित सांगता येणार नाही. मात्र दुसरा भाग जसा लोकांना आवडला तसाच तिसराही आवडेल, असा विश्वास सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला आहे.