‘नटसम्राट’ ही वि.वा. शिरवाडकरांची अभिजात नाटय़कृती. चित्रपटाच्या रूपाने ती पडद्यावर आणायची तर त्याची तुलना होणार हे निश्चित, मात्र अशी भीतीच आपल्याला उरली नसल्याचे महेश मांजरेकर म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मुळात, ‘नटसम्राट’ हे नाटक मी कुठेतरी टीव्हीवर पाहिलेलं मला अंधुक आठवत होतं. मी ते पुस्तक आणून वाचलं आणि त्या व्यक्तिरेखेच्या गणपतराव बेलवलकरांच्या प्रेमात पडलो. एक नट म्हणून त्यांच्या झालेल्या शोकांतिकेशी मी स्वत:ला जोडू शकत होतो. एका अर्थाने बरं झालं की मी हे नाटक पाहिलं नव्हतं. त्यामुळे पूर्ण माझ्या पद्धतीने मी हा चित्रपट करू शकलो, असं मांजरेकरांनी स्पष्ट केलं. ‘नटसम्राट’ नाटकाचा आत्मा चित्रपटात हवा, पण ते नाटक म्हणून चित्रपटात नको अशा विचारात असलेल्या मांजरेकरांनी वेगळं काही नाटकातून सापडतंय का याच्या शोधातच एक वर्ष घालवल्याचं सांगितलं. त्यांना हवा असलेला धागा नाटकात त्यांना बेलवलकरांच्या मित्राच्या रूपाने मिळाला. राम हा त्यांचा मित्र आणि जुनं जीर्ण झालेलं असं नाटय़गृह या दोन व्यक्तिरेखा म्हणून मला सापडल्या तेव्हा आठवडय़ाभरात माझी पटकथा तयार झाली, असं सांगणाऱ्या मांजरेकरांनी पटकथा लेखनात आपल्याला अभिजीत देशपांडे आणि किरण यज्ञोपवित या दोघा लेखकांची खूप मदत झाल्याचं नमूद केलं.

‘नटसम्राट’ने प्रत्येक कलाकाराला डंख मारलेला आहे – नाना पाटेकर
गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेत नाना पाटेकर हा एकच पर्याय दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांच्यासमोर होता. खुद्द रंगभूमीवरून अभिनयाचा श्रीगणेशा करणाऱ्या नानांनाही ‘नटसम्राट’ साकारण्याच्या स्वप्नाने भुलवलं होतं. ५० वर्षांपूर्वी डॉक्टर लागूंनी ‘नटसम्राट’ साकारला तेव्हा मी-विक्रम आम्ही विशीत होतो. त्यावेळच्या प्रत्येक कलाकाराला या नाटकाने डंख मारलेला आहे, असे नानांनी सांगितले. डॉक्टर नुकतेच परदेशातून शिकून आले होते. आणि त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने हे नाटक केलं. हे नाटक तुमचा ठाव घेतं त्याला लागूंचा अभिनय हे जसं कारण आहे तसंच नाटकाची भाषा हेही फार मोठं कारण आहे. या नाटकाला भाषेची झिलई आहे. त्यामुळे हे नाटक दोन स्तरावर सुरू राहतं. एक म्हणजे सामान्य माणसाची अत्यंत कौटुंबिक जिव्हाळ्याची गोष्ट म्हणून आपण हे नाटक पाहतो. तर दुसरीकडे त्याच्या भाषेमुळे ती एक अभिजात कलाकृती म्हणून आपल्या डोळ्यासमोर येते. ‘नटसम्राट’ नाटकात भूमिका साकारणं हे माझ्यासाठी फार त्रासदायक होतं, असं नानांनी सांगितलं. प्रत्येक वेळेला नटसम्राटाची भूमिका जगणं, पुन्हा पुन्हा करत राहणं हे त्रासदायकच आहे. त्यामुळेच नाटक करत असताना डॉ. लागूंना हृदयविकाराचा धक्का बसला होता. दत्ता भट हे नाटक करत असतानाच गेले. सतीश दुभाषीही असेच गेले. या नाटकातली शोकांतिका जगणं आणि मुळात शिरवाडकरांची भाषा.. त्यातील आरोह-अवरोह जरासे चुकले तरी त्याचा प्रभाव थिटा पडतो. त्यामुळे चित्रपटात भूमिका करतानाही संवादावर प्रचंड मेहनत घेतल्याचं नानांनी यावेळी सांगितलं.

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Randeep Hooda says he sold his fathers properties for Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी वडिलांची मालमत्ता विकली, रणदीप हुड्डाचा खुलासा; म्हणाला, “मी खूप…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

विक्रम ‘विक्रम’ आहे
अभिजात कलाकृतीचा पाया, त्यात दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने भरलेले रंग, दिग्दर्शकाची नवी मांडणी आणि या सगळ्यातून उभा राहिलेला कलाविष्कार असा प्र‘योग’ रसिकांच्या वाटय़ाला फार कमी येतो. कित्येकदा जुन्या आणि नव्याची होणारी तुलना भीतिदायक असते. त्यातून आपला प्रयोग फसेल का, या शंकेने असे प्रयत्नच केले जात नाहीत. तरीही यावर्षी ‘कटय़ार काळजात घुसली’सारखा चित्र‘प्रयोग’ झाला. तर नव्या वर्षांत ‘नटसम्राट’ हा चित्रपटयोग रसिकांसाठी जुळून आला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या चित्रपटाच्या निमित्ताने नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्याची एक झलक या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या निमित्ताने अनुभवायला मिळाली. गेली ४० वर्षे एकमेकांना कलाकार म्हणून कारकीर्द घडवताना पाहणारे हे दोन अभिनेते त्यांनीच त्यांच्या तरुणपणी पाहिलेल्या नाटकावरील चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
विक्रम नेहमीच माझ्यासाठी थोरला राहिला आहे, असं नानांनी यावेळी सांगितलं. विक्रम गोखले यांचं ‘बॅरिस्टर’ नाटक आपण करावं, अशी इच्छा नेहमीच व्हायची, पण विक्रमसारखे देखणे रूप नसल्याने ही भूमिका करता येईल, असा आत्मविश्वास कधीच वाटला नाही. तरीही ‘बॅरिस्टर’चे संवाद पाठ आहेत, असं सांगणाऱ्या नानांना ‘पाहिजे जातीचे’ या नाटकाच्या वेळी विक्रम गोखलेंनी दिलेली कौतुकाची थाप आठवली. छबिलदासमध्ये हे नाटक सुरू असताना विक्रम गोखलेंनी ते पाहिलं आणि ‘तू छान काम करतोस’, अशा शब्दांत कौतुक केलं. त्याच दिवशी आपण वडिलांना विक्रमने आपलं कौतुक केल्याचं लगोलग सांगितलं, अशी आठवण नानांनी सांगितली.

नानाने स्वत:च्या प्रयत्नातून ‘नटसम्राट’ साकारला- विक्रम गोखले
या चित्रपटात ‘राम’ ही आपली भूमिका कशी आली? यावर बराच विचार केल्याचं विक्रम गोखले यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियात ‘किंग लिअर’ हे शेक्सपिअरचं नाटक पाहण्याचा योग आला. त्या मूळ नाटकात शेक्सपिअरने विदूषकाची व्यक्तिरेखा लिहिली होती. विदूषक ही एकमेव व्यक्ती होती जी नाटकात राजाला प्रश्न करू शकते. ‘नटसम्राट’मध्ये ती विदूषकाची भूमिका न आणता तेच सामथ्र्य दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर आणि लेखक किरण यज्ञोपवित यांनी ‘राम’ या भूमिकेला दिले असल्याचे विक्रम गोखले यांनी स्पष्ट केले. ‘नटसम्राट’ या नाटकाबद्दल माझी स्वतंत्र मतं आहेत. मात्र, २० वर्षांपूर्वी नानाने हे नाटक पाहिल्यानंतर त्याच्या मनावर ज्या प्रतिमा उमटल्या असतील त्या बाजूला सारत त्याने ही अवघड भूमिका साकारली म्हणून त्याचं कौतुक वाटतं, असं सांगतानाच नानासाठी हे केवढं मोठं आव्हान आहे हे आपल्याला मनापासून जाणवत होतं, असं ते म्हणाले. शिरवाडकरांना जो नटसम्राट अपेक्षित होता ते देखणं रूप, त्यांचे पल्लेदार संवाद सहज बोलू शकणारा सुशिक्षित नट म्हणून डॉ. लागू एकदम चपखल होते. नाना हा देखणा ‘नटसम्राट’ नाही. त्यामुळेच त्याची भूमिका जास्त अवघड होती, असं सांगणाऱ्या विक्रम गोखलेंनी हा चित्रपट आपल्या आजवरच्या कारकीर्दीतील अत्यंत वेगळा चित्रपट असल्याची ग्वाही दिली.