सुहास जोशी

चित्रपटाचे तंत्र हे विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यात कला आहे, पण त्यास तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. जसजशी विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसे चित्रपटाचे तंत्र बदलत गेले, सुधारत गेले. मनोरंजनासाठी कराव्या लागणाऱ्या क्लृप्त्या असोत की एखादा प्रसंग प्रभावी करण्यासाठी केलेली कॅमेऱ्याची आणि प्रकाशाची करामत असो, यामध्ये जशी ते माध्यम हाताळणाऱ्या कलावंताची सर्जनशीलता असते तसेच त्या माध्यमाच्या तंत्रज्ञानाचा हिस्सादेखील मोठा असतो. कालौघात द्क्श्राव्य माध्यमाने या सर्वाचा प्रभावी उपयोग केला. स्पेशल इफेक्ट्सच्या माध्यमातून तर केवळ स्वप्नरंजन म्हणावी अशी दृश्यं पडद्यावर पाहायला मिळाली. तंत्रज्ञानाचा असाच प्रभावी वापर करून साकारलेला वेबचित्रपट म्हणजे नेटफ्लिक्सवरील ‘ब्लॅक मिरर – बॅण्डरस्नॅच’.  बॅण्डरस्नॅच हे एकेकाळी अल्पकाळ गाजलेल्या संगणकीय गेमचे नाव आहे. आणि हा चित्रपटदेखील गेमप्रमाणेच पाहता येतो. हे शक्य झालंय ते तंत्रज्ञानामुळे. पण केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला खेळ इतपतच या चित्रपटाकडे पाहता येणार नाही. कारण त्यातून मानवी स्वभावाच्या पैलूंचे इतके प्रखर चित्रण आहे की हा चित्रपट पाहताना म्हणजे खेळताना काही क्षण पाहणारादेखील चक्रावून जाऊ  शकतो.

ही कथा आहे १९८४ साली विकसित केलेल्या संगणकीय खेळाच्या जन्मदात्याची. स्टेफन हा एक संगणकीय गेम विकसित करणारा करामती मुलगा. आई एका अपघातात मरण पावलेली, तर वडिलांशी जेमतेम सख्य असणारा असा थोडासा विमनस्क मुलगा. स्टेफन त्याच्या गेमचा प्रस्ताव घेऊन त्या काळी प्रसिद्ध असलेल्या टकरसॉफ्ट कंपनीकडे जातो. तेथे त्याला लोकप्रिय गेम डेव्हलपर कॉलिन भेटतो. टकरसॉफ्टचा मालक स्टेफनच्या ‘बॅण्डरस्नॅच’ या गेमची अगदी जुजबी झलक पाहूनच प्रभावित होतो आणि हा गेम येत्या नाताळात विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे ठरवतो. या गेममधील मुख्य पात्र तेवढेच स्टेफनने तयार केलेले असते. पण त्या पात्राचा पुढचा प्रवास त्याने मांडलेला नसतो. किंबहुना तो वाचत असलेल्या बॅण्डरस्नॅच कादंबरीत त्याला या पात्राच्या साहसी मार्गाची कल्पना सुचत असते. तुम्ही निवडाल तितके धाडसी मार्ग गेममध्ये आणता येतील इतकीच त्याची मूलभूत संकल्पना असते आणि हे त्या कादंबरीतून त्याला सुचलेले असते.  पण टकरसॉफ्टचा मालक त्याला कंपनीच्या कार्यालयात येऊन काम करायचा पर्याय देतो. या पुढील कथानक हे सरळ या टोकापासून सुरू होऊन दुसऱ्या टोकाला संपत नाही. कारण त्याच वेळी पडद्यावर दोन पर्याय येतात, कंपनीत येऊन काम करायचे की तो प्रस्ताव नाकारून घरूनच काम करायचे. येथे प्रेक्षकाला पर्याय निवडायचा असतो.

यानंतरचा संपूर्ण चित्रपट अशा पर्याय निवडीवरच पुढे जात राहतो. प्रेक्षकाने कथेमध्ये काय निवडायचे याचे पर्याय देणारा हा प्रयोग आहे. प्रेक्षकाने पर्यायावर क्लिक केले की पुढील कथानक त्याप्रमाणे पुढे जात राहते. पण निवडलेल्या पर्यायानंतर कथा पुढे सरकणार नसेल तर पुन्हा पर्याय निवडीवर येऊन सुरुवात करावी लागते. म्हणजेच एखाद्या गेममध्ये मार्ग न सापडल्यास मागे येण्यासारखे आहे. अर्थात हे मागे येऊन पुढे जाणे तुलनेने वेगात असते. त्यामुळे द्विरुक्ती होत नाही.

एखाद्या क्षणी पाहणाऱ्यास असे वाटू लागते की कथानकाचे सारे नियंत्रण त्याच्याच हातात आहे. पण कधी कधी ते चांगलेच फसवे ठरते. ते इतके फसवे असते की त्या गुंत्यात अडकायलादेखील होते. अशा वेळी स्क्रोलबारचा वापर करून नेहमीप्रमाणे पुढे जाण्याचा प्रयत्न मात्र येथे करता येत नाही. तुम्हाला एकतर पर्याय निवडत पुढे जायचे आहे किंवा कथानकात काही ठरावीक टप्प्यांवर दिलेला ‘एक्झिट गेम’चा पर्याय वापरून या गेमरूपी चित्रपटातून पूर्णच बाहेर पडायचे.

नेहमीच्या पद्धतीने चित्रपट पाहण्याची सवय असल्याने कदाचित कथानकातील ही पर्यायी गडबड अनेकांना विचित्र वाटू शकते. पण एकाच घटनेतील अनेक पर्याय तपासणारे, त्यातील कंगोरे मांडणारे काही चित्रपट यापूर्वीदेखील नेहमीच्याच पद्धतीने प्रदर्शित झाले आहेत. त्यात एका कथेच्या ठरावीक टप्प्यात बदल केल्याने वेगवेगळ्या कोणत्या शक्यता दिसू शकतात हे मांडले आहे. येथे तो पर्याय प्रेक्षकाला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे कथानक निवडीचा पर्याय न वापरतादेखील चित्रपट पाहता येतो. त्यामध्ये आपोआप पर्याय निवडला जाऊन त्यातील शक्यतादेखील मांडल्या जातात आणि कथानक पुढे जात राहते.

ही तांत्रिक करामत बाजूला ठेवली तरी एकूणच हे कथानक मानसिकतेचा अनेक अंगाने वेध घेणारे आहे. किंबहुना त्या गेम डेव्हलपरच्या आयुष्यातील काही प्रसंगातील मानसिकता, त्याच्या मनामध्ये सुरू असणारे पर्याय निवडीचे द्वंद्व याची उत्तम मांडणी यातून करण्यात आली आहे. कधी कधी सरळ साध्या वाटणाऱ्या घटनांचे परिणाम कसे प्रदीर्घ काळ टिकतात, त्यातून मग नवीनच गुंता तयार होतो हे यामध्ये थेट मांडले आहे. १९८४ साली ही परिस्थिती नेमकी कशी असेल, त्या वेळचे तंत्रज्ञान, बाजारपेठ, स्पर्धा याचादेखील या सर्वामागे सहभाग आहे. त्यामुळे केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेले गिमिक अशी संभावना या चित्रपटाची करता येणार नाही.

महत्त्वाचे म्हणजे हे सर्व साध्य झाले ते वैयक्तिकरीत्या चित्रपट, सीरिज पाहण्याची सुविधा देणाऱ्या माध्यमांमुळे. सीरिज अथवा चित्रपट केवळ एकाच व्यक्तीने पाहणे, ते पाहताना त्याची मानसिकता आणि पडद्यावर दिसणाऱ्या कथानकातून उमटणारे परिणाम याची सांगड अशा प्रकारे या वेबआधारित चित्रपटात नेटफ्लिक्सने केली आहे. हे नावीन्य केवळ या वेबआधारित माध्यमामुळेच आहे हे लक्षात घ्यावे लागेल. इंटरॅक्टिव्ह चित्रपट अशी याची ओळख सध्या सांगितली जाते. ती सर्वानाच रुचेलच असे नाही, पण एक नवा प्रयोग म्हणून तो अनुभवण्यास काहीच हरकत नाही.