News Flash

वेबवाला : संयत आणि प्रभावी

कोणत्याही गोष्टीवर भाष्य करायचे असेल तर हल्ली त्यामध्येदेखील प्रचारकी अभिनिवेश डोकावत असतो.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

कोणत्याही गोष्टीवर भाष्य करायचे असेल तर हल्ली त्यामध्येदेखील प्रचारकी अभिनिवेश डोकावत असतो. वलयांकित असलेल्या चित्रपट या माध्यमातून भाष्य करतानादेखील अनेकदा अभिनेविशीपणा दिसत असतो. कधी कधी आक्रस्ताळीपणादेखील डोकावतो. पण हे असं काहीही डोकावू न देता, शांतपणे कॅमऱ्यातून योग्य त्या गोष्टी टिपत, साध्या सोप्या पण प्रभावी संवादातून, संयत संगीताचा वापर करूनदेखील मुद्दे मांडता येऊ  शकतात. असे चित्रपट अनेकदा पठडीतल्या कथानकांची वाट चोखाळत नाहीत. पण जे सांगायचे ते दमदारपणे मांडतात. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला सोनी हा चित्रपट नेमका असाच आहे. नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलेला हा चौथा हिंदी वेब चित्रपट.

ही गोष्ट आहे दिल्लीतील महिला पोलिसांची. कथेची नायिका पोलीस निरीक्षक आहे, तर तिची वरिष्ठ अधिकारी हीदेखील महिलाच आहे. ती आयपीएस आहे. त्या वरिष्ठ अधिकारीचा पती तिच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी असतो. महिलांची छेडछाड होते अशा संभाव्य ठिकाणी आपण स्वत:च एक सामान्य महिला म्हणून जायचे आणि गुंडांच्या हल्ल्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी येऊ न त्या गुंडांना पकडायचे असे डिकॉय ऑपरेशन या दोघी महिला अधिकारी चालवत असतात. त्याचबरोबर नैमित्तिक कामदेखील असतेच. दोघींची काम करण्याची पद्धत वेगळी असते, मात्र उद्देश सारखाच असतो. या दोघींच्या पोलीस वाटचालीतील एक-दोन महिन्याच्या काळातल्या काही छोटय़ा छोटय़ा घटना चित्रपटात मांडल्या आहेत. एक सलग अशी मोठ्ठी कथा यात नाही. पण जे काही दाखवले आहे त्यातून बराच व्यापक पट असणाऱ्या मुद्दय़ांवर स्पष्ट भाष्य आहे. नोकरीतले काही मोजकेच दिवस कथेत दिसतात. त्यातदेखील सोनीला शिस्तभंगाच्या नावाखाली बदली आणि चौकशीला सामोरे जावे लागते.

वयाच्या एका टप्प्यावर पोलिसातील नोकरी करतानाच एक महिला म्हणून असणारे अनेक कंगोरे त्यातून दिसून येतात. एकटी महिला काम करताना त्यातून प्रतीत होणाऱ्या अडचणी, व्यवस्थाअंतर्गत पाहण्याचा, जगाने तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक बाबी यात उलगडल्या जातात. पण हे सर्व करताना त्यात कुठेही काहीतरी तत्त्वज्ञान सांगतोय, समस्या मांडतोय याचा कसलाही अभिनिवेश डोकावत नाही. तर अतिशय साध्यासोप्या अशा संवादातून प्रभावीपणे भाष्य करत जातो. या संवादातदेखील कसलाही फिल्मी नाटकीपणा नाही की उच्चभ्रूपणादेखील डोकावत नाही. जे आहे ते सरळ सोप्या पद्धतीने येत जाते. इतकेच नाही तर काही संवादांचा संबंध अतिशय पद्धतशीरपणे पुढच्या एखाद्या प्रसंगाशी जोडून घेतले आहेत. एका प्रसंगात तर एकटीनेच घरकाम करताना कोणताही संवाद नसताना रेडिओवरील बातम्यांचाच वापर अगदी समर्पकपणे करण्यात आला आहे.

असाच उत्तम वापर झाला आहे तो संगीत आणि प्रकाशाचा. योग्य संगीत प्रसंगाचे गांभीर्य, प्रभाव वाढवते याची जाण चित्रपटकर्त्यांना दिसून येते. शेवटच्या प्रसंगात ऑपरेशनचा भाग म्हणून सोनी एकटीच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाजवळून चालत असते. एकंदरीतच आजवर आलेल्या अनुभवामुळे ती काहीशा विमनस्क अवस्थेत असते. त्यातच रस्त्यावरील तरुणांचे टोळके पोलिसांवरच जे काही भाष्य करत असते ते ऐकून ती आणखीनच व्यथित होते. तो रस्ता चालत जाण्याच्या संपूर्ण प्रसंगात केवळ बांधकामाच्या ठिकाणी सुरू असणाऱ्या आवाजांमुळे एकूणच सोनीच्या मानसिकतेचे चित्र प्रकर्षांने पडद्यावर जाणवत राहते. बहुतांश ठिकाणी प्रत्यक्षात जितका प्रकाश असू शकेल तेवढाच प्रकाश वापरून चित्रीकरण झाले आहे. अनेक प्रसंग हे रात्रीचे, तसेच काही घरातले असल्याने ते त्याच उपलब्ध प्रकाशातच अगदी अचूकपणे उभे केलेले दिसतात. तर दुसरीकडे कोणताही वेडावाकडा कोन न पकडतादेखील त्या त्या प्रसंगाची नेमकी प्रतिमा कॅमेरा पडद्यावर उमटवत राहतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलिसांची कथा असूनदेखील एकही खून नसलेला हा चित्रपट इंटरनेटच्या माध्यमातून प्रदर्शित झाला आहे. वेबसीरिज किंवा वेबफिल्म म्हणजे हिंसा, सेक्स याचा अतिरेकी वापर करायचा परवानाच मिळालेला असतो. किंबहुना असेच कथानक वेबसीरिजला पूरक असते असा एक समज झालेला असताना सोनीसारखा संयत चित्रपट नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलेला आहे. आपल्याकडे महिला पोलीस अधिकारी हा विषय चित्रपटांसाठी काही नवीन नाही. किंबहुना डॅशिंग महिला पोलीस अधिकारी हे मध्यवर्ती पात्र असलेल्या कथानकावर कैक चित्रपट आलेले आहेत. त्यांचा भर हा अन्यायाचा नायनाट करणारी तारणहारी पोलीस अधिकारी असाच असतो. पण अशा प्रकारे एक महिला म्हणून त्या व्यक्तिमत्त्वावर, त्याच्या आयुष्यातील छोटय़ामोठय़ा घटनांवर प्रकाश टाकणारे चित्रपट तुलनेने कमीच आहेत.

अनेकांना हा समांतर चित्रपटांच्या मांडणीपैकी एक वाटू शकेल. तसा तो आहेदेखील. पण तो नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी माध्यमातून प्रदर्शित झाला आहे हे येथे महत्त्वाचे आहे. कारण हे माध्यम चालते ते प्रेक्षकांनी पैसे भरून घेतलेल्या सभासदत्वावर. अशा वेळी तेथे येणाऱ्या प्रेक्षकालादेखील हा चित्रपट पाहावा वाटणे हे नक्कीच आशादायी चित्र आहे. कारण हल्लीच्या चित्रपटांच्या सनसनाटी व राक्षसी मार्केटिंग आणि वितरणाच्या खर्चीक योजनांमध्ये असे चित्रपट टिकणे कठीणच आहे. त्यामुळेच नेटफ्लिक्सवर जर अशा आशयसंपन्न चित्रपटांना प्रेक्षक लाभला तर वेबफिल्म या माध्यमातून आणखीनही चांगलं काहीतरी पाहायला मिळू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 12:38 am

Web Title: article on netflix movie soni
Next Stories
1 अखेर चाहत्यांना पाहायला मिळणार सलमान-कतरिनाचं लग्न
2 ‘भाई’ चित्रपटावरील आरोपांबाबत महेश मांजरेकर म्हणतात..
3 रिअॅलिटी शो स्पर्धक ते आघाडीची बॉलिवूड गायिका; असा आहे भूमी त्रिवेदीचा यशस्वी प्रवास
Just Now!
X