बॉलीवूडमध्ये पाय रोवणे हे अभिनेत्यांपेक्षाही अभिनेत्रींसाठी कायमच अवघड गणित राहिले आहे. मुळात, आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या चित्रपटांची संख्याच जास्त आहे. चित्रपट करण्यावाचून गत्यंतर नाही म्हणून केवळ नाचगाण्यापुरते काम असले तरी व्यावसायिक अभिनेत्रींचा शिक्का बसेपर्यंत ते केलं जातं. मात्र तोवर शांत बसणाऱ्या या अभिनेत्री मुख्य प्रवाहात प्रस्थापित झाल्यानंतर मात्र सूत्रं आपल्या हातात घेताना दिसतायेत. अभिनेत्री म्हणून मनासारखे काम मिळणार नसेल तर स्वत:च निर्माता-दिग्दर्शक म्हणून सूत्रं हातात घेत आपल्याला हव्या त्या भूमिका, हवी ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अभिनेत्रींचा एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे..

आघाडीची अभिनेत्री म्हणून शिक्कामोर्तब झाल्यानंतर केवळ मुख्य नायकाभोवती फिरणारे पात्र म्हणून चित्रपट करण्याची त्यांची तयारी नसते. आणि त्यामुळे अनेकदा चित्रपट सोडले जातात. कंगना राणावत हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. अली अब्बास दिग्दर्शित ‘सुलतान’ चित्रपटातील ‘आरफा’ची भूमिका सगळ्यात पहिल्यांदा कंगना राणावतकडे आली होती. अर्थात, सलमान खान मुख्य भूमिकेत आहे म्हटल्यावर त्याच्या नायिकेला फार काही करण्यासारखे नसणार असा विचार करत कंगनाने तो चित्रपट नाकारला. नंतर ती भूमिका अनुष्का शर्माने केली तेही तिच्या पद्धतीने तिने ‘आरफा’ची भूमिका खणखणीत वाजवून घेतली. चित्रपट लोकप्रिय झाल्यानंतर जेव्हा कंगनाला तिच्या नकाराबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने खरोखरच त्या वेळी त्या भूमिकेत मी काही करू शकेन असं वाटलं नसल्याचं स्पष्ट केलं. एकंदरीतच हिंदी चित्रपटांमध्ये नायिकांना त्यांच्या मनासारख्या भूमिका किंवा त्यांच्यासाठी म्हणून लिहिले गेलेले चित्रपट मिळणे आजही तितके सोपे राहिलेले नाही. पण अगदीच मिळत नाहीत असेही नाही.

संजय लीला भन्साली, राकेश ओमप्रकाश मेहरा, हंसल मेहता असे काही निवडक दिग्दर्शक आहेत जे प्रामुख्याने नायिकांचा विचार करताना दिसतात. झोया अख्तर, मेघना गुलजार, अश्विनी तिवारी, गौरी शिंदेसारख्या दिग्दर्शिकांमुळेही स्त्रियांचे प्रश्न, त्यांचे विषय, त्यांची गोष्ट घेऊन येणारे चित्रपट दिसतात. मात्र या दिग्दर्शकांची संख्याही अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच असल्याने पुन्हा मुख्य प्रवाहात व्यावसायिक चित्रपटांशिवाय कुठलाच पर्याय या अभिनेत्रींसमोर नसतो. अशा वेळी आपणच निर्मिती किंवा दिग्दर्शनात उतरण्याचे धाडस या तरुण अभिनेत्री करताना दिसतायेत. हा बदल पहिल्यांदा मोठय़ा प्रमाणावर जाणवला तो अभिनेत्री अनुष्का शर्मामुळे. तीन वर्षांपूर्वी अनुष्काने आपली बॉलीवूड कारकीर्द जोरात असतानाही चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. ‘एनएच-१०’ हा तिची निर्मिती आणि मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटात ऑनर किलिंगसारखा विषय तिने घेतला. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. त्यानंतर तिने ‘फिलौरी’, ‘परी’ असे दोन चित्रपट केले. प्रत्येक चित्रपटात वेगळी शैली, वेगळी कथा मांडण्याचा तिचा प्रयत्न यशस्वी ठरला. दिग्दर्शक म्हणून चित्रपट करणे सहजशक्य नसले तरी निर्मितीत उतरून मात्र नायिकाप्रधान चित्रपटांना वाट मोकळी करून देण्याचे प्रयत्न या अभिनेत्रींकडून होताना दिसतायेत.

अनुष्का शर्माच्या आधी अभिनेत्री सोनम कपूरनेही बहीण रियाबरोबर असाच चित्रपट निर्मितीचा प्रयोग सुरू केला. ‘आयेशा’ हा तिचा पहिला चित्रपट. त्या चित्रपटाला फारसे यश मिळाले नव्हते. मात्र गेल्या वर्षी करीना कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया आणि स्वत: सोनम या चौघींनी मिळून केलेला मैत्रिणींची गोष्ट सांगणारा ‘वीरे दी वेडिंग’ बॉक्स ऑफिसवरही तितकाच यशस्वी झाला आणि अर्थातच या नायिका ब्रिगेडचा आत्मविश्वास अधिक दुणावला. अनुष्का आणि सोनमच्या बरोबरीनेच प्रियांका चोप्रानेही चित्रपट निर्मितीत आपले पाऊल टाक ले. मात्र तिने चित्रपटनिर्मिती करताना हिंदी चित्रपटांपेक्षा प्रादेशिक चित्रपट निर्मितीवर जास्त भर दिला. ‘पर्पल पेबल्स पिक्चर्स’ या तिच्या बॅनरखाली प्रियांकाने आतापर्यंत मराठी, भोजपुरी, बंगाली, आसामी, सिक्कीमी अशा सहा चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रियांकाच्या बरोबरीने जिचं नाव आघाडीची अभिनेत्री म्हणून घेतलं जातं ती दीपिका पदुकोणही चित्रपट निर्मितीत उतरली आहे.

आजवरच्या अभिनेत्रींमध्ये तुलनेने दीपिकाने आपल्याला हव्या त्याच भूमिका गेल्या काही वर्षांत केल्या आहेत. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ ते अगदी ‘पिकू’सारख्या चित्रपटातही ती केंद्रस्थानी होती. त्यानंतर हॉलीवूडची वाटही चोखाळून झाल्यावर दीपिका आता वेगळ्या विषयांवरचे चित्रपट करणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटाची निर्मिती दीपिका करते आहे. अ‍ॅसिड हल्ल्यात सर्वस्व हरवून बसलेल्या तरुणीची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. मुलींवर होणाऱ्या अ‍ॅसिड हल्ल्यांचे प्रमाण देशभरात मोठे आहे, मात्र अजूनही हा विषय चित्रपटांपासून दूरच राहिला होता. पण आता आपल्या व्यावसायिक अभिनेत्रीच्या प्रतिमेचे ओझे उतरवून दीपिकाने या वास्तव विषयांवरच्या चित्रपटांमध्ये उतरायचे ठरवले आहे. दीपिकानंतर स्वरा भास्करनेही आपल्या निर्मितीसंस्थेची घोषणा केली असून ‘कहानीवाले’ या बॅनरखाली आपण चित्रपट निर्मिती करणार असल्याचे स्वराने जाहीर के ले आहे.

एकीकडे निर्माता म्हणून या आघाडीच्या अभिनेत्री पुढे आल्या आहेत. तर दुसरीकडे कंगना राणावत, कोंकणा सेन शर्मा, नंदिता दास यांनी दिग्दर्शनातून आपले कसब दाखवून दिले आहे. ‘मणिकर्णिका’ चित्रपटातील झाशीची राणी म्हणूनच कंगनाने सुरुवात केली होती. मात्र काही अंतर्गत वादांमुळे चित्रपटाचे मूळ दिग्दर्शक राधाकृष्ण जगमुरालदी यांनी अध्र्यावरच चित्रपट सोडला. हा चित्रपट प्रेक्षकांसमोर यावा यासाठी कंगनाने कसून मेहनत घेतली होती. त्यामुळे तो अध्र्यावर न सोडता तिने दिग्दर्शनाची धुरा आपल्या खांद्यावर घेत चित्रपट पूर्णही केला आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वीही करून दाखवला. यापुढे ती दिग्दर्शन करणार की नाही याबद्दल तिने अजून कुठली घोषणा केलेली नसली तरी चतुरस्र अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणूनही कंगनावर शिक्कामोर्तब झाले आहे. चोखंदळ भूमिकांमधूनच कायम प्रेक्षकांसमोर आलेल्या नंदिता दासने तर फार आधीच दिग्दर्शक म्हणून नव्या खेळीला सुरुवात केली होती. आता कोंकणा सेन शर्मानेही गेल्या वर्षी ‘डेथ इन गुंज’ नावाच्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे.

आपल्याला हव्या तशा भूमिका मिळत नाहीत म्हणून गप्प बसण्यापेक्षा आपापल्या पद्धतीने कथा निवडून निर्मिती किंवा दिग्दर्शनाच्या माध्यमातून मला हवे ते मी करणारच.. ही या बॉलीवूडच्या नायिकांची भूमिका येत्या काळात चित्रपटसृष्टीत क्रांतिकारी बदल घडवणार हे निश्चित!