मानसी जोशी

प्रेमकथा हा खरं तर बॉलीवूडचा हक्काचा विषय. नायक तसेच नायिका यांच्यात हरतऱ्हेने आणि हरकारणाने फुलत जाणारे प्रेम बॉलीवूडपटांनी दाखवले आहे आणि प्रेक्षकांनीही ते आवडीने पाहिलेत. तरीही हा प्रेमरस चित्रपटातून संपणारा विषय नाही. मात्र प्रेमाच्या त्याच त्याच कथांपेक्षा दोन पावलं पुढे जात आताच्या तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून वेगळी आशयनिर्मिती सध्या ओटीटी माध्यमांवर पाहायला मिळते आहे. लिव्ह इन रिलेशनशिप, लैंगिक संबंध, जोडप्यांमधले एकत्र राहताना होणारे वादविवाद यावर जास्त प्रकाश टाकण्यात आला आहे. हिंदीत चार ते पाच वर्षांत विशेषत: ओटीटी माध्यमाच्या आगमनानंतर दिग्दर्शक आणि निर्माते हटके विषय मांडण्यावर जोर देत आहेत. ‘लिटिल थिंग्ज’, ‘लव्ह पर स्वेअर फूट’, ‘मिसमॅच’, ‘परमनन्ट रूममेट्स’, नुकताच प्रदर्शित झालेला ‘सर’ या वेब मालिका तसेच चित्रपटांचा यात आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ओटीटीवरच्या प्रेमकथांवर टाकलेली नजर..

टीव्हीएफच्या ‘परमनन्ट रूममेट’ आणि आपल्या मराठमोळ्या मिथिला पालकर, ध्रुव सहगलची प्रमुख भूमिका असलेली ‘लिटिल थिंग्ज’ या सुरुवातीच्या काळात आलेल्या दोन वेब मालिकांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. अ‍ॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स फारसे लोकप्रिय नसताना या प्रेमकथांनी तरुणाईला ओटीटी माध्यमांकडे आकर्षित केले. नवीन आशय, हलकीफुलकी मांडणी आणि कलाकारांचा सहजसुंदर अभिनय या वेब मालिकेच्या दमदार बाजू ठरल्या. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे जोडपे एकत्र राहायचे ठरवते तेव्हा त्यांच्यात उडणारे खटके, छोटी-मोठी भांडणे, संसार करताना उडणारी तारांबळ ‘परमनन्ट रूममेट’ या वेब मालिकेत उत्कृष्टरीत्या मांडले आहे. व्यवसाय, शिक्षणानिमित्त मेट्रो शहरात एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना ही प्रेमकथा जास्तच भावली. ‘लिटिल थिंग्ज’मध्येही ध्रुव आणि मिथिलाची जोडी प्रेक्षकांना आवडली. कार्टून्सचा केलेला सुयोग्य वापर, जास्त न ताणलेली कथा यामुळे याचा पहिला भाग परत पाहावासा वाटतो. या दोन्ही वेब मालिका एवढय़ा लोकप्रिय झाल्या की यावरही मिम्स, व्हिडीओ, टी शर्टवरची चित्रं लोकप्रिय झाली. याचे दुसरे भागही प्रदर्शित झाले. यापैकी ‘परमनन्ट रूममेट’चा दुसरा भाग प्रेक्षकांना आवडला तर तीच कथा असल्याने ‘लिटिल थिंग्ज’बाबत मात्र काहीशा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

याच वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘मिसमॅच’मध्येही आजच्या तरुणाईचा प्रेमाचा गोंधळ वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ यांच्या या वेब मालिकेची हाताळणी नवीन आहे. चोवीस तास कोडिंगसाठी वेडी असणारी प्राजक्ता आणि तिच्यावर आतोनात प्रेम करणारा साध्या सरळ स्वभावाचा रोहित यांच्यातील गमती जमती खरंच पाहण्यासारख्या आहेत. याचबरोबर ‘एमएक्स प्लेअर’वरील ‘चीझकेक’ हीसुद्धा काहीशी निराळी म्हणावी लागेल. जितेंद्र ठाकूर आणि आकांक्षा ठाकूर हे दाम्पत्य रस्त्यावर जखमी झालेल्या कुत्र्याला घरी आणतात. चीझकेक नावाच्या कुत्र्याच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात कसे बदल होतात हे त्यात दाखवण्यात आले आहे. छोटय़ा पडद्यावरील ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेद्वारे लोकप्रिय झालेले राम कपूर आणि साक्षी तन्वर ही जोडगोळी पुन्हा एकदा ‘करले तू भी मोहोब्बत’ या वेब मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आले. दारू पिऊन वाया गेलेला सुपरस्टार राम कपूर आणि त्याच्यावर उपचार करणारी मानसोपचारतज्ज्ञ साक्षी यांच्यात सुंदर प्रेमाची जुगलबंदी यात पाहायला मिळाली. तर अभिनेत्री आशा नेगी आणि शर्मन जोशी यांची ‘बारीश’ ही काहीशी एकता कपूरच्या साचेबद्ध कथामालिकांमध्ये मोडते. या वेबमालिकेतून शर्मन जोशीने ओटीटी विश्वात पदार्पण केले.

विकी कौशल आणि अंगिरा धर यांचा ‘लव्ह पर स्वेअर फूट’ हा चित्रपटही पारंपरिक प्रेमकथेच्या विचारांना छेद देतो. या दोघांकडे पुरेसे पैसे नसल्याने एकत्रितपणे घर घ्यायचे स्वप्न ते पाहतात. घर घ्यायच्या इराद्याने एकत्रित आलेले हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. नंतर पुढे काय होते हे पाहण्यासाठी हा चित्रपटच पाहावा लागेल. विक्रोंत मस्सी आणि यामी गौतम यांचा ‘गिनी वेड्स सनी’ हा चित्रपटही प्रेक्षकांची निराशा करतो. झगमगीत पोशाख, चित्रीकरण स्थळे दाखवूनही कथेची बांधणी व्यवस्थित नसल्याने हा चित्रपट मार खातो. हिंदीत अशा वेगळ्या आशयाची हाताळणी करताना मराठीतील ‘मूव्हिंग आऊट’ या वेब मालिकेची प्रचंड चर्चा झाली. अभिज्ञा भावे, ऋषीकेश सक्सेना यांची ही वेब मालिका तरुणांचे भावनाविश्व चितारण्यात यशस्वी ठरली आहे. ओटीटीवर सध्या गुन्हेगारी जगताचे चित्रण करणाऱ्या वेब मालिका, रहस्यमय मालिका यांचे प्रचंड वेड आहे. त्यामुळे या मालिकांचा राबता ओटीटीवर असला तरी कधीमधी फु लणाऱ्या या प्रेमकथाही आपले लक्ष वेधून घेतात. येत्या काळात ओटीटीवर आणखी काही दर्जेदार प्रेमकथा पाहायला मिळतील, अशी आशा व्यक्त करणे एवढेच सध्या प्रेक्षकांच्या हातात आहे.