दरवर्षी ठरवून एखादा विषय घ्यायचा आणि मग तो रंगांमधून कागदावर उतरविण्यासाठी बाहेर पडायचे. अगदी वर्षभर. मग तो विषय, त्या विषयातील तो प्रांत सारा चित्रांमधून साठवून झाला, की पुन्हा शहरात येत त्यावर प्रदर्शने भरवून साऱ्या जगाला ही दडलेली दुनिया दाखविण्याचा आनंद घ्यायचा. वेगळ्या वाटेवरचे कलाकार भास्कर सगर यांचे नवे चित्रदर्शन!

पुणे ही तशी कलाकारांची पंढरी. या पंढरीत चित्रकारही अनेक आहेत. त्या प्रत्येकाची स्वतंत्र धाटणी, निराळी शैली आहे, वैशिष्टय़ही आहे. माध्यम एकच असले तरी त्याची हाताळणी, रंगयोजना, वापरलेले तंत्र आणि मुख्य म्हणजे त्यामागचा विचार हा प्रत्येक कलाकाराचा स्वतंत्र दिसतो. अशा स्वतंत्र विचारांचे, वेगळी वाट जपणारे कलाकार म्हणून भास्कर सगर यांना आज सर्वत्र ओळखले जाते.

दरवर्षी ठरवून एखादा विषय घ्यायचा आणि मग तो रंगांमधून कागदावर उतरविण्यासाठी बाहेर पडायचे. अगदी वर्षभर. मग तो विषय, त्या विषयातील तो प्रांत सारा चित्रांमधून साठवून झाला, की पुन्हा शहरात येत त्यावर प्रदर्शने भरवून साऱ्या जगाला ही दडलेली दुनिया दाखविण्याचा आनंद घ्यायचा. हा सगर यांचा गेल्या अनेक वर्षांचा निधिध्यास.

अगदी सुरुवातीला ‘पुण्यातील वाडे’ या विषयापासून सुरू झालेला त्यांचा हा चित्रप्रवास पुढे महाराष्ट्रातील गड, किल्ले, लेण्या, प्राचीन मंदिरे, सागरकिनारे, जंगले, दक्षिणेकडील हंपी, दक्षिण भारत असा करत गेल्यावर्षी २०१५ साली उत्तर भारतात स्थिरावला होता. या संपूर्ण वर्षांत त्यांनी आता उत्तर भारतातील  मह्त्त्वाच्या स्थळांचा वेध घेत त्यांना रंगांमध्ये साकार केले आहे.

एक विशिष्ट कला, त्यातीलही केवळ जलरंगाची हाताळणी आणि त्यातही ते सबंध वर्ष केवळ एका विषयाला वाहून घ्यायचे.. हे सूत्र जपत गेली कित्येक वर्षे सगर यांचा हा प्रवास सुरू आहे. ठरलेल्या विषयासाठी त्या प्रांतात जायचे. अगोदर तिथल्या परिसराचा ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक असा अभ्यास करायचा. या एकूण विषयातील चित्रविषय ठरवायचे. त्यांची रेखांकने तयार करायची आणि मग शेवटी या कलाकृती तयार करू लागायचे. या निर्मितीसाठी मग त्या-त्या विषयातील प्रांतात कित्येकदा पायपीट करायची, भटकायचे, लोकांशी चर्चा करायची, परवानग्या मिळवायच्या. ऊन-वारा-पाऊस-थंडी यांचा अंदाज घ्यायचा आणि त्यांच्यापासून सावधही राहायचे. ..गेली १८ वर्षे भास्कर सगर मोठय़ा जिद्दीने हा चित्रध्यास आणि हव्यास पुरा करत आहेत.

यंदा ‘उत्तर भारत’ हा विषय घेऊन त्यांनी चित्रांची ही मुशाफिरी नुकतीच पूर्ण केली. उत्तर भारत म्हणजे सिंधु संस्कृतीपासून ते अगदी मध्ययुगापर्यंत अशा इतिहासातील विविध पाऊलखुणा जपणारा प्रांत. विविध राजसत्ता इथे नांदून गेल्या. काही अतुच्च शिखरावर पोहोचल्या. त्यांच्या या कार्यकाळातच इथे कला आणि स्थापत्याची मोठी निर्मिती झाली. मौर्य कला, गांधार शैली, मथुरा शैली, पाल शैली, राजस्थानी लघुचित्र शैली, ओरिसा मंदिर शैली, मुघल शैली; अशी किती नावे घ्यावीत. या साऱ्यांचे प्रतिबिंब मग इथे मौर्यापासून मुघलांपर्यंत तयार झालेल्या अनेक आविष्कारांवर उमटले. या असा स्थापत्याचा, त्यातील कला-संस्कृतीचाच वेध सगर यांनी यंदाच्या त्यांच्या चित्रविषयात घेतला आहे.

मध्यप्रदेशातील भीमबेटका गुहांमधील आदिम चित्रे, कोणार्कचे सूर्यमंदिर, दिल्लीचा लाल किल्ला, जगप्रसिद्ध ताजमहाल, अमृतसरचे सुवर्णमंदिर, फतेहपूर सिक्रीचा पंचमहाल, सारनाथ -सांचीचा महास्तूप, खजुराहोतील शिल्पवैभव, वाराणसीचा घाट, आग्य््रााचा किल्ला, चितोडगडचा विजयस्तंभ, गुजरातचे सोमनाथ मंदिर, पाटणची शिल्पजडित विहीर, भोजपूरचे शिवमंदिर, प्राचीन विश्वविद्यालय नालंदाचे भग्नावशेष, भेडाघाटचे सौंदर्य, लोमेश ऋषींची गुहा, असे एक ना दोन अनेक स्थळांचे हे कला आणि सौंदर्य हे चित्रांमधून बांधले गेले आहे. या चित्रांमध्ये केवळ आकृती आणि रंगाचे आविष्कार नाहीत, तर त्याजोडीने छाया-प्रकाशाचा मेळही आहे. हा मेळ या सर्व चित्रांमध्ये त्रिमितीबरोबर सत्याचा भास निर्माण करतो. या रंगामधून त्या-त्या स्थळाचा इतिहास डोकावतो, त्याचे पुरातत्त्वीय भान देतो, वास्तूंमधील सौंदर्याचे दर्शन घडवतो आणि त्यामागचा विचारही प्रकट करतो. ही सारी चित्रे पाहताना त्या वास्तूच्याच पुढय़ात असल्याचा भास आणि त्या स्थापत्याशी संवाद होणे हीच सगर यांच्या या चित्रांमधील यशोगाथा आहे. हा चित्रसोहळा पुण्यातील दर्पण कला दालनात (पत्रकारनगर, गोखले नगर) येत्या ५ जानेवारीपर्यंत, तर ८ ते १८ जानेवारी दरम्यान आर्ट टु डे गॅलरी (हिराबाग चौक, टिळक रोड) येथे रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.

abhijit.belhekar@expressindia.com