रेश्मा राईकवार

यश मिळवणे सोपे नसतेच, त्या प्रत्येक यशामागे आपली आपली एक संघर्षांची गोष्ट असते. एखादी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचली की त्या व्यक्तीचा संघर्ष हा कुतुहलाचा, अभ्यासाचा, समजून घेण्याचा विषय होतो. मात्र ती व्यक्ती आणि त्याचा संघर्ष अनेकदा पडद्यावर येताना इतका हिरोगिरीचा मुलामा घेऊन येतो की जणू ती व्यक्ती यशाचा चमचाच तोंडी घेऊन जन्माला आली आहे. अनेक चरित्रपट त्यामुळे प्रेरणादायी न वाटता, बाहेरून चकाचक आणि आतून पोकळ वाटतात. मात्र नितेश तिवारीसारखा एखादा लेखक-दिग्दर्शक असा असतो, जो या कथा आहेत त्याच पद्धतीने, त्याच सहजतेने लोकांना ऐकवतो. ‘पंगा’चे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांचे आहे आणि ते उत्तमच आहे, पण इथे मुद्दाम नितेश तिवारी यांचा उल्लेख करावासा वाटतो कारण, पटकथा त्यांनी लिहिलेली आहे.

चित्रपट पटकथेत सच्चा असेल तर तो कलाकृती म्हणूनही त्याच सच्चेपणाने सादर करणे दिग्दर्शकालाही सोपे जात असावे (अर्थात यालाही अपवाद आहेत), पण ‘पंगा’ पटकथेच्या आणि दिग्दर्शनाच्या दोन्ही पातळीवर एक खूप चांगला अनुभव देऊन जाणारा चित्रपट आहे. या चित्रपटाची गोष्ट वेगळी आहे का? तर तसेही नाही. एका कबड्डीपटूचा लग्नानंतर थांबलेला प्रवास आणि पुन्हा एकदा मुलामुळेच पुन्हा कबड्डीत येण्यासाठी केलेले परिश्रम अशी ढोबळमानाने या चित्रपटाची कथा सांगता येईल. आणि हाच कथाविषय लक्षात घेतला आणि इथे कबड्डीऐवजी दुसरा कोणताही खेळ घेतला तर हीच कथा, हाच संघर्ष ओमंग कुमार दिग्दर्शित ‘मेरी कोम’ चित्रपटातही आपण पाहिलेला आहे. आणि तरीही हा चित्रपट वेगळा वाटतो कारण ती फक्त एको खेळाडूची गोष्ट नाही. तो एका स्त्रीने वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या भूमिका पेलत असताना स्वत:चा स्वत:साठी घेतलेला शोध आहे. आणि या शोधात इतर अनेक स्त्रियांप्रमाणे अडथळे म्हणून येणाऱ्या खूप भावनिक गोष्टी आहेत. पण त्या अडथळ्यांवर नुसतेच रडत बसण्यापेक्षा त्यावर मार्ग स्वीकारून पुढे जाणारी नायिका आपल्याला यात दिसते.

भोपाळसारख्या एका शहरात रेल्वेच्या कार्यालयात तिकीट खिडकीवर काम करणारी कारकून असलेली जया (कंगना राणावत), तिचा नवरा प्रशांत (जस्सी गिल) आणि त्यांचा मुलगा आदित्य (यज्ञ भसिन) या तिघांचे छोटे, सुखी कुटुंब आहे. कार्यालय आणि घर दोन्ही सांभाळणारी जयामधली पत्नी आणि आई दोन्ही खूश आहेत, मात्र तिच्यातील कबड्डीपटू ती तेवढी खूश नाही आहे. एरव्ही फारसा न जाणवणारा विचार एकेकाळची भारतीय कबड्डी संघाची कर्णधार असलेली जया.. जिला आज कोणीही ओळखत नाही. केवळ एक आई आणि पत्नी म्हणून तिची ओळख कायम आहे. जयाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा तिचा मुलगाच तिने तिची जुनी ओळख पुन्हा मिळवली पाहिजे, असा हट्ट धरतो. आणि जयाचे आयुष्य पूर्ण बदलते. आत्तापर्यंत आहे त्यात सुख-समाधान मानून चालणाऱ्या जयाला स्वत:चा शोध लागतो आणि मग त्या शोधाच्या दिशेने सुरू झालेला तिचा प्रवास अर्थातच सोपा नाही. इथे खेळाडू म्हणून पुन्हा फिट होणे, आपला खेळ आजमावणे या गोष्टी येतातच. मात्र ती नसल्यामुळे तिच्या घरातील जबाबदाऱ्या कोण उचलणार, या प्रश्नाचे उत्तरही शोधावे लागते. इथे फक्त जयालाच नाही, तर जयाचा नवरा प्रशांत आणि मुलगा आदित्य या दोघांनाही आपापली उत्तरे शोधावी लागतात. जयाने आयुष्याच्या एका वळणावर घेतलेला हा पंगा किती यशस्वी ठरतो, हे चित्रपटात पाहण्यासारखं आहे.

मोजक्याच व्यक्तिरेखा या चित्रपटात आहेत. आणि त्या सगळ्या व्यक्तिरेखा आपापल्या वैशिष्टय़ांसह चित्रपटात उतरल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून अश्विनी अय्यर तिवारी यांनी खूप वास्तव आणि प्रभावी पद्धतीने या व्यक्तिरेखा आणि कथेची अफलातून मांडणी केली आहे. जया कबड्डीपटू असली, तरी ती मनाने साधी-सरळ, उत्साही अशी स्त्री आहे. तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वास्तवाचा ती समजून-उमजून आनंदाने स्वीकार करते. दिवसभरात होणारी छोटी-मोठी गोष्ट या पती-पत्नींमध्ये शेअर होताना दिसते. जयाच्या आईच्या भूमिकेत मधून मधून चमकून जाणाऱ्या नीना गुप्तांचा वावरही तितकाच हवाहवासा वाटतो. कंगना आणि चरित्रपट किंवा मध्यमवर्गीय भूमिका हे खरंतर एक घट्ट समीकरण होऊन बसले आहे. त्यामुळे तिच्या भूमिकेत तोचतोचपणा जाणवण्याची भीती असते. मात्र ‘पंगा’मध्ये ती पूर्णपणे वेगळी भासते. तिचे नेहमीचे उच्छृंखल वागणे, सैरभैर होणे या गोष्टी यात टाळल्या आहेत. इथे ती जया म्हणूनच जास्त प्रभावीपणे लोकांसमोर येते. जयाचा एकंदरीत लूक, तिचा साधेपणा, तरीही खेळाडू म्हणून असलेली महत्त्वाकांक्षा, तिची सगळ्याक डे पाहण्याची सकारात्मक वृत्ती, पुढे जाण्याचा विचार या गोष्टी पाहणाऱ्यालाही प्रेरणा देऊन जातात. आणि कंगनाने खूप सहज, सुंदर आणि तरीही एका संयत पद्धतीने जयाची भूमिका साकारली आहे. जयाला हरतऱ्हेने पाठिंबा देणारा, आणि तरीही चौकटीबाहेरची गोष्ट अंगावर आली की बावरणारा, तरीही जयाला जपणारा, तिची खेळाची ओढ समजू शकणाऱ्या लाजऱ्याबुजऱ्या प्रशांतच्या भूमिकेत जस्सी गिल हा अभिनेता फिट बसला आहे. गायक-अभिनेता असलेल्या जस्सीने याआधी ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’ या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारली होती. आदित्यची भूमिका साकारणाऱ्या यग्यनेही खूप चांगले काम केले आहे. रिचा चढ्ढाची मोकळीढाकळी, तरीही शिस्तीची मीनूही रंगत आणते. याशिवाय, अभिनेत्री स्मिता तांबेही छोटेखानी भूमिके त आहे, तीही लक्ष वेधून घेते. एकूणच अभिनयाच्या दृष्टीने पर्वणी असलेला असा हा चित्रपट आहे.

कॉर्पोरेट कंपनीमध्ये सर्वोच्च पदावर काम करणारी स्त्री असेल किंवा खेळात पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी स्त्री असेल ती कामात कुठेही कमी पडणार नाही. पण त्याचवेळी आई, मुलगी, पत्नी अशा विविध नात्यांतून वावरताना त्याही बाजू जपण्याचा तिचा प्रयत्न असतो. अशावेळी एक पाऊल भावनांमध्ये अडकलेच तर या सुहृदांचाच पाठिंबा तिला आयुष्यात कितीही कठीण गोष्टींशी पंगा घेऊन पुढे जाण्याचं बळ देतो, प्रेरणा देतो. ही सकारात्मक प्रेरणा पाहणाऱ्यालाही मिळते, हेच ‘पंगा’चे मोठे यश आहे.

पंगा

दिग्दर्शक – अश्विनी अय्यर तिवारी

कलाकार – कंगना राणावत, जस्सी गिल, रिचा चढ्ढा, स्मिता तांबे, नीना गुप्ता, यग्य भसिन.