गायत्री हसबनीस

फॅशन वीकच्या रॅम्पवर शो स्टॉपर हा महत्त्वाचा घटक मानला जातो. कुठल्या सेलिब्रिटीने कुठल्या डिझायनरसाठी रॅम्प वॉक केला आहे, हे सहज लक्षात राहते किंबहुना जर तो डिझायनर आणि शो स्टॉपर लोकप्रिय असेल तर तो स्मरणातून बाहेर जातच नाही. एरव्ही फॅ शन वीकमध्ये आपली उपस्थिती लावणाऱ्या बॉलीवूडजनांना या रॅम्पवॉकचे महत्त्व नेमके लक्षात आले आहे. त्यामुळे सध्या चित्रपटांच्या किंवा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी या रॅम्प वॉकचा वापर करण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे..

प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलेले कलाकार किंवा एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व आणि नंतरच्या प्रसिद्धीसाठी त्या त्या चित्रपटातील कलाकारांना शो स्टॉपर म्हणून रॅम्पवर आणण्याचा प्रयत्न डिझायनर्स करून घेतात. मात्र सध्या एखादा चित्रपट गाजला की लगेचच त्या चित्रपटातील लोकप्रिय चेहरे रॅम्पवर दिसतात. ‘दंगल’ चित्रपट गाजल्यानंतर अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने ‘लॅक्मे फॅशन वीक’ २०१७ विंटर/फेस्टिवल या सीझनला रॅम्पवरून डिझायनर सोनाली पामनानी हिच्या शोची शो स्टॉपर होण्याचा मान पटकावला होता. त्याच सीझनला हर्षवर्धन कपूरसोबत ‘मिर्झिया’ चित्रपटातून पदार्पण करून नावारूपाला आलेली सयामी खेर ही नचिकेत बर्वे या लोकप्रिय डिझायनरच्या कलेक्शनसाठी शो स्टॉपर झाली होती. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या अहाना कुमराने गेल्या वर्षी ‘इंडिया फॅशन वीक’मध्ये निकिता मायना या डिझायनरसाठी रॅम्प वॉक केला, तर ‘नीरजा’ या चित्रपटातून जीम सारभ या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्यानेही ‘लॅक्मे फॅशन वीक’ २०१७ मध्ये अनुज भुटानी या डिझायनरसाठी शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला होता.

चित्रपटांची प्रसिद्धी हल्ली वेगवेगळ्या माध्यमांमधून होत असली तरी लॅक्मे फॅ शन वीकसारखा प्रसिद्धी मंच चुकवणे कलाकारांना अंमळ जड जाते. अभिनेत्री भूमी पेडणेकरचा ‘सोनचिरय्या’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने शिला खान या डिझायनरसाठी? शो स्टॉपर म्हणून ती आपल्यासमोर आली. मोठय़ा सेलिब्रिटींची भावंडेही मग प्रसिद्धीसाठी या मंचापासून कशी दूर राहतील? सध्या चर्चेचा विषय ठरलेली कतरिना कैफची बहीण एझाबेल कै फनेदेखील भूमी पेडणेकरसोबत रॅम्प वॉक केले. सध्या लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतमने या सीझनला ‘गौरी आणि कनिका’ या फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला. करीना कपूर ही नेहमी शो स्टॉपर म्हणून लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रॅन्ड फिनालेला फॅशन डिझायनरसाठी रॅम्प वॉक करतेच. तिच्याबरोबर यावेळी करिश्मा कपूरनेही पूनित बलाना या डिझायनरकरता रॅम्प वॉक केले. नुकताच प्रदर्शित झालेला आणि बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘मणिकर्णिका’. कंगना राणावत आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अनुश्री रेड्डी या लोकप्रिय डिझायनरची शो स्टॉपर म्हणून लोकांसमोर आली. तर अहाना कुमराही आपल्या ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा गझल मिश्रा या डिझायनरसाठी अभिनेत्री कुब्रा सैटसोबत ती शो स्टॉपर म्हणून लोकांसमोर आली. कुब्रा सैट ही अभिनेत्रीसुद्धा नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’मुळे चर्चेत आली आहे. ‘हाऊसफुल ४’ या आगामी चित्रपटात झळकणाऱ्या पूजा हेगडेनेदेखील ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये हजेरी लावली. अनिल कपूरनेही आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपटासाठी डिझायनर राघवेंद्र राठोडचा शो स्टॉपर म्हणून झकास रॅम्प वॉक केला. तर ‘गल्ली बॉय’ या आगामी बहूचर्चित चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रणवीर सिंग आणि ‘लव्ह जेन’ या डिझायनरने एकत्रितपणे चित्रपटाची लॅक्मे फॅ शन वीकच्या माध्यमातून अधिकृत प्रसिद्धी केली.झोया अख्तरनेही यावेळी हजेरी लावली होती. त्यामुळे एकीकडे चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी आलेले बॉलीवूड कलाकार आणि नवखे लोकप्रिय कलाकार यांची एकच गर्दी लॅक्मे फॅ शन वीकमध्ये पाहायला मिळाली. २०१३ मध्ये ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी करण जोहरने रॅम्पवॉक केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी ‘वेलकम टू न्यूयॉर्क ’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने लॅक्मे फॅशन वीमध्ये रॅम्प वॉक केला. या वर्षीही त्याने ‘लॅक्मे फॅशन वीक’ समर/रिसार्ट २०१९ मध्ये गौरव गुप्ता या सुप्रसिद्ध डिझायनरच्या ओपनिंग शोसाठी शो स्टॉपर म्हणून लोकप्रिय अभिनेत्री तब्बूसोबत रॅम्प वॉक केला, तेव्हा अनेकांना नवल वाटले. तब्बूचा ‘अधांधून’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे आणि तिचा ‘भारत’ हा नवाकोरा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तर सध्या ‘कॉफी विथ करन’ या शोमुळे गाजत असलेल्या करण जोहरचे ‘ब्रह्मास्त्र’, ‘कलंक’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ असे लक्षवेधी या वर्षी एकामागोमाग एक प्रदर्शित होणार असल्याने त्याने हा रॅम्प चुकवणं शक्यच नव्हतं. अर्थात, तब्बू आणि करणचा एकत्र रॅम्प वॉक त्यांच्या कुठल्या एकत्रित चित्रपटाची वार्ता घेऊन येणारा नाही ना याचे उत्तरही येत्या काळात मिळेल.  लोकप्रिय फॅशन डिझायनर्सनी आपल्या कलेक्शनसाठी ट्रेण्डिंग आणि नव्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या सेलिब्रिटींना शो स्टॉपर करून घेणे हे एक समीकरणच बनले. ट्रेण्डिंग या एका शब्दातच भरपूर अर्थ आहेत. त्यामुळे ट्रेण्डिंग सेलिब्रिटी म्हणताना एखाद्या अमुक कारणांमुळे चर्चेत असलेले सेलिब्रिटी, खेळाडू, नवोदित कलाकार, नवं जोडपं या अर्थाने चर्चेत असलेल्या सगळ्यांचाच यात समावेश होतो. काही शो स्टॉपर म्हणून येतात तर काही फक्त शोमध्ये सहभागी होऊ न शोचा उत्साह वाढवतात. गौरी खान म्हणजे शाहरुख खानची पत्नी म्हणून तिची ओळख आहेच. ‘झीरो’ या चित्रपटाचे यश आणि आपल्या डिझायनर स्टुडिओची ख्याती तिने यंदा आपल्या नव्या इंटिरिअर डिझायनिंग कलेक्शनच्या माध्यमातून लोकांसमोर आणली.

‘टीस्वा’ या ब्रॅण्डबरोबर तिचं हे कलेक्शन ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये चर्चेत होतं. अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप सध्या कर्करोगाशी झुंजते आहे. ‘रिबॉक’तर्फे सादर झालेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या कलेक्शनमध्ये ताहिरा एक लढाऊ स्त्री म्हणून शो स्टॉपर झाली होती. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर ही नवी प्रेमी चर्चेतली जोडपीसुद्धा शो गेस्ट म्हणून सहभागी झाली होती.