‘अ‍ॅव्हेंजर्स’पटांचा प्रभाव हा सर्वसामान्य प्रेक्षकांवरच आहे असं मानण्याची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक-निर्मात्यांनाही त्याची भुरळ पडली आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना अशा वेगवेगळ्या पद्धतीने एकत्रित काम करताना पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते, हे हिंदीतील चित्रपटकर्मीच्याही लक्षात आलं आहे. त्यामुळे ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने ज्या पद्धतीने सुपरहिरोंची एक अनोखी दुनिया निर्माण केली होती, त्याच धर्तीवर इथेही आघाडीच्या कलाकारांना हाताशी धरत चित्रपटमालिका क रण्याकडे कल वाढतो आहे.

या माव्‍‌र्हलपटांचा पहिला प्रभाव दिग्दर्शक रोहित शेट्टीवर पडला आहे. त्याने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असलेला नायक ‘सिंघम’च्या रूपाने लोकांसमोर आणला. ‘सिंघम’ला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याचा सीक्वलपटही तयार झाला. मात्र या वेळी फक्त अजय देवगणच्या ‘सिंघम’पुरते मर्यादित न राहता रोहितने अभिनेता रणवीर सिंगला हाताशी धरत ‘सिम्बा’ आणला. ‘सिम्बा’मधील भालेराव हाही चांगला पोलीस अधिकारी असला तरी तो सिंघमसारखा नाही. या दोघांच्याही स्वभावात फरक आहे. त्यामुळे ‘सिम्बा’मध्ये वेगळा नायक रंगवतानाच त्याच्या कथेत बाजीराव सिंघमला घुसवत तिकीटबारीवर चमकदार कामगिरी रोहितने साधली आणि त्याच वेळी अक्षय कु मारलाही ‘सूर्यवंशी’मधून पोलीस अधिकारी म्हणून लोकांसमोर आणत सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशी असे पोलिसी विश्वच त्याने रुपेरी पडद्यावर निर्माण के ले आहे. आता हाच प्रकार यशराजची निर्मिती असलेल्या गुप्तहेरांच्या कथांवर आधारित चित्रपटांच्या बाबतीत के ला जाणार आहे.

यशराज निर्मितीसंस्थेच्या बॅनरखाली सध्या ‘पठान’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. तीन वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी शाहरूखने या चित्रपटाची निवड के ली आहे. यात तो पहिल्यांदाच गुप्तहेराच्या भूमिके त दिसणार आहे. ‘पठान’मध्ये शाहरूखची नायिका दीपिका पदुकोण साकारणार असून तीही गुप्तहेराच्याच भूमिके त असणार आहे. या चित्रपटात आणखी एक पाहुणा कलाकार चमकणार आहे तो म्हणजे सलमान खान. सलमान यात त्याच्या ‘टायगर’च्या भूमिके तून येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘एक था टायगर’ या चित्रपटात सलमानने हेराची भूमिका के ली होती. त्याचा टायगर पुन्हा एकदा ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून जिवंत झाला. या दोन्ही चित्रपटांत त्याची नायिका कतरिना कै फनेही हेराचीच भूमिका साकारली आहे. आता ‘टायगर जिंदा है’चाही सीक्वलपट येऊ घातला आहे, ज्यात शाहरूखच्या ‘पठान’चाही सहभाग असणार आहे. हे दोन्ही यशराजचे प्रयोग यशस्वी झाले तर २०२३ मध्ये आपल्या सगळ्याच गुप्तहेर नायकांना एका नव्याच चित्रपटात एकत्र आणण्याचा निर्माता आदित्य चोप्रा यांचा मानस आहे. यात के वळ शाहरूख, सलमान, दीपिका आणि कतरिनाच नाही तर यशराजच्याच ‘वॉर’चा नायक कबीर अर्थात हृतिक रोशनही एकत्र दिसण्याची शक्यता आहे. या पाच मोठय़ा कलाकारांना एकाच चित्रपटात एकत्र आणण्याचा प्रयोग यशस्वी झाला तर हा बॉलीवूडच्या इतिहासातील मोठा चित्रपट ठरेल, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे. या पाचही जणांचा चाहतावर्ग लक्षात घेता हा चित्रपट पहिल्याच दिवशी शंभर कोटी रुपयांची कमाई करू शके ल, असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यातील तिकीटबारीवरचे चित्र लक्षात घेता सध्या तरी आदित्य चोप्राचे हे प्रयोग यशस्वी ठरावेत, असे साकडेच चित्रपट व्यावसायिकांनी घातले तर नवल वाटणार नाही.