News Flash

पाहा नेटके : भविष्याचा शोध

सुहास शिरवळकर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित ही मराठी वेबमालिका सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

असिफ बागवान

आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय, हे जाणून घेणं कुणाला नकोसं असतं? प्रत्येकालाच आपला भविष्यकाळ खुणावत असतो. यातील काही तो घडवण्यासाठी आपला वर्तमानकाळ खर्ची घालतात. तर काही जण भविष्याकडे डोळे लावून नुसते बसून राहतात. भविष्यात डोकावणं प्रत्येकालाच आवडत असतं. वर्तमानपत्रात दर आठवडय़ाला छापून येणारं साप्ताहिक राशीभविष्य असो की, दाराशी आलेला एखादा बाबाबुवा असो आपलं पुढचं आयुष्य कसं असेल, हे जाणण्याची उत्सुकता शमत नाही. पण समजा, एखाद्याच्या समोर त्याचा भविष्यकाळ प्रत्यक्ष कुणी जगत असेल तर..?

एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित ‘समांतर’ याच कहाणीभोवती फिरतो. सुहास शिरवळकर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित ही मराठी वेबमालिका सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे. कुमार महाजन (स्वप्निल जोशी) हा मूळचा सुखवस्तू घरातला. परंतु, पिढीनुरूप आर्थिक स्थैर्य गमावलेल्या कुमारसमोर आता दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करणंही आव्हानात्मक बनलं आहे. त्यातच कुमारचा मूळ स्वभाव शिघ्रकोपी असल्यामुळे रोज रोज येणारे हे मानसिक ताण त्याला असह्य़ होऊ लागले आहेत. त्यामुळेच देवादिकावर विश्वास नसतानाही मित्र चाफेगावकर याच्या आग्रहाखातर कुमार स्वामींना (जयंत सावरकर) भेटण्यास राजी होतो. मात्र, घाणेरडय़ा वस्तीतील गल्लीबोळात एका पोटमाळय़ावर राहणाऱ्या स्वामींचं घर गाठतानाच त्याच्या मनातला नास्तिक भाव पुन्हा जागृत होतो. हात पाहून अचूक भविष्य सांगणारे म्हणून लौकिक असलेले हे स्वामी म्हणजे, कुणी भोंदूबाबा असेल, यावर तो ठाम असतो. पण पहिल्या पाच मिनिटांतच स्वामी त्याला त्याच्या भूतकाळातील अशा काही गोष्टी सांगतात की, कुमारचा त्यांच्यावर विश्वास बसतो आणि भविष्य जाणून घेण्यासाठी तो हात पुढे करतो. स्वामी कुमारचा हात हातात घेतात पण काही क्षणातच तो सोडून देतात. त्यांचं म्हणणं असं की, हा हात त्यांनी आधीच पाहिला आहे आणि या हाताचं भविष्य सांगणार नाही, असंही ते त्याला सुनावतात. आयुष्यात पहिल्यांदाच कुणा स्वामीच्या दारी आलेल्या कुमारसाठी हा आश्चर्याचा धक्का असतो. पण स्वामी त्याला तो हात त्यांनी ३३ वर्षांपूर्वी पाहिला असल्याचं सांगतात, तेव्हा तो पूर्णपणे हादरून जातो. ३३ वर्षांपूर्वी स्वामींनी सुदर्शन चक्रपाणी नावाच्या माणसाचा हात पाहिलेला असतो. सुदर्शन आणि कुमार यांचं जीवन अगदी सारखंच असून सुदर्शनच्या आयुष्यात जे जे घडलं तसंच कुमारच्या आयुष्यातही घडणार, हे भाकीतही ते करतात. स्वामींचं हे भाकीत थोतांड म्हणून फेटाळणाऱ्या कुमारला लवकरच ते खरं असल्याचा अनुभव येतो. भविष्य सांगण्याऐवजी गायब झालेले स्वामी आणि आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय, हे जाणून घेण्याची उत्कटता यांनी झपाटून गेलेला कुमार मग सुदर्शन चक्रपाणीचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तो सुदर्शन चक्रपाणीपर्यंत कसा पोहोचतो, वाटेत त्याला काय अनुभव येतात आणि सुदर्शन चक्रपाणीला भेटल्यानंतर खरंच त्याला त्याचं भविष्य गवसतं का, हे ‘समांतर’च्या नऊ भागांतून उलगडत जातं.

समांतरची सुरुवातच एका उंचीवरून सुरू होते. आयुष्याला विटून गेलेला पण तरीही भविष्य जाणून घेऊन आपल्या कर्माद्वारे नशीब बदलू पाहणारा तरुण पहिल्याच प्रसंगात आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतो. तिथून पुढे त्याचा, आपला आणि वेबमालिकेचा प्रवास त्या कुमार महाजनच्या मागोमाग सुरू राहतो. स्वप्निल जोशी कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये नाही, असे आठ-दहा प्रसंगच या वेबमालिकेत आहेत. उरलेल्या प्रत्येक प्रसंगात तो कुमार महाजन बनून वावरताना दिसतोच. कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत तेजस्विनी पंडित आणि सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज ही या कहाणीतील अन्य मुख्य पात्रे. या वेबमालिकेतील स्वप्निलचा लूक हेही एक वैशिष्टय़ आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत चेहऱ्यावर गंभीर, त्रासिक भाव घेऊन तो वावरला आहे. चक्रपाणीला शोधण्यासाठीची घाई, प्रत्येक क्षणी आपल्याबाबतीत काही तरी अघटित घडणार असल्याची धास्ती हे सगळं त्याच्या अभिनय आणि हावभावांतून सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं आहे. तेजस्विनीनेही तिच्या वाटय़ाला आलेल्या प्रसंगांतून छाप पाडली आहे. सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेसाठी नितीश भारद्वाज का, हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्यांचा ‘श्रीकृष्ण’ अवतार आठवतो. छोटय़ा पडद्यावर श्रीकृष्ण साकारणाऱ्या नितीश आणि स्वप्निल या दोन अभिनेत्यांना एकत्र आणण्याचा एकूण प्रयास यातून दिसतो. अर्थात त्याने काय साध्य झालं, हा प्रश्नच आहे. कारण सुदर्शन चक्रपाणीच्या व्यक्तिरेखेचा पट शेवटच्या दोनेक भागांत, तोही काही मिनिटांपुरता आहे.

कुमार महाजन आणि सुदर्शन चक्रपाणी या एकमेकांना समांतर नशीब घेऊन जगणाऱ्या व्यक्तींच्या एकत्र येण्याचा हा प्रवास प्रेक्षकाला एका जागी खिळवून ठेवणारा नक्कीच आहे. पण प्रेक्षकांवर पकड घेण्यात हा प्रवास कमी पडतो. एका आश्वासक सुरुवातीनंतर खरंतर प्रेक्षकांना पुढचे नऊ भाग पाहताना आश्चर्यकारक धक्के आणि वळणं पाहण्याची आशा असते. पण समांतरची कहाणी तशी न जाता सरळ प्रवास करते. कुमार आणि सुदर्शन चक्रपाणी एकमेकांच्या समोर आल्यानंतर काही तरी विस्मयकारक किंवा धक्कादायक घडणार, अशी आशा असताना त्यांची भेटही साध्यासरळ पद्धतीने उरकते आणि कहाणी शेवटच्या टप्प्यावर प्रवेश करते. नंतरचा कथापट इतक्या वेगाने आणि तुकडय़ातुकडय़ांत पुढे सरकतो की, मालिकाकर्त्यांना आता उरकायची घाई लागली आहे की काय, असे वाटू लागते. असं म्हणत असतानाच, प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा वाढवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे, हे नमूद करायला हवं. याबाबतीत काही प्रसंग अतिशय प्रभावी झाले आहेत.

मराठी वेबमालिकांचं विश्व अजूनही हवं तितकं विस्तारलेलं नाही. जे काही आहे, त्यातही विनोदी ढंग असलेल्या वेबमालिकांचीच अधिक चलती आहे. झी फाइव्हवरील डेट विथ सईसारखी एखादी मालिका सोडल्यास थरारपटांच्या बाबतीत मराठी भाषेत फारसं वेगळेपण दिसून येत नाही. अशावेळी समांतर हा निश्चितच चांगला प्रयोग आहे. अर्थात तो आणखी मोठा असता तर कदाचित अधिक थरारक वाटू शकला असता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 4:34 am

Web Title: article on samantar web series review abn 97
Next Stories
1 विदेशी वारे : हॉलीवूडवरही करोनाचे सावट
2 ईस्ट किंवा वेस्ट.. कथा हवी बेस्ट
3 “मी त्याला रंगेहाथ पकडलं होतं”; दीपिकाचा गौप्यस्फोट
Just Now!
X