मानसी जोशी

हिंदी चित्रपटसृष्टीत पुरुषांची मक्तेदारी अजूनही सहजी मोडता येणारी नाही. त्यातही स्टंट किंवा अ‍ॅक्शन मास्टर म्हणून स्त्रियांचा वावर हा आजही दुर्मीळ म्हणावा असाच आहे. या परिस्थितीत गेली वीस वर्षे सोनबेर पारदीवाला या साहसी कन्येने अनेक अभिनेत्रींसाठी उंचावरून उडी मारणे, आगीशी खेळणे, बाइक चालवणे यांसारखी साहसी दृश्ये जीव धोक्यात घालून चित्रित केली आहेत. लहानपणापासून साहसाचे वेड रक्तातच भिनलेल्या या स्टंटवुमनशी केलेली बातचीत..

साहसी दृश्ये (स्टंट) करणे ही एक कला असल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींसाठी स्टंट केलेली सोनबेर पारदीवाला व्यक्त करते. स्टंट करणे हे कौशल्याधिष्ठित क्षेत्र असून यात माणूस प्रशिक्षित असणे गरजेचे असल्याचे ती सांगते. मुंबईकर असलेल्या सोनबेरने अनेक चित्रपटांसाठी स्टंट केले आहेत. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करणे अवघड होते. चित्रपटात जी दृश्ये महिलांना करायची ती दृश्येही पुरुषच करत होते. काही वर्षांपूर्वी महिला स्टंट आर्टिस्टचे प्रमाण अत्यंत नगण्य होते. या क्षेत्रात अपेक्षित उंची गाठण्यासाठी मला अनेक कष्ट घ्यावे लागले. सुरुवातीच्या काळात मला अनेकदा टीका-टोमण्यांचा सामना करावा लागला. चित्रपटात बाइक चालवायचे दृश्य चित्रित करायचे असल्यास मी स्वत: बाइक घेऊन चित्रीकरण स्थळी पोहोचायचे. मी बाइकस्वार आहे हे माहीत असूनही लोक हा स्टंट तुला जमेल का, हा प्रश्न विचारायचे तेव्हा मला प्रचंड राग यायचा.. कारकीर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर असे टक्केटोणपे खात शिकले. लोकांच्या टीकेचे उत्तर मी माझ्या कामातून देण्याचे ठरवले. माझे काम पाहून टीका करणाऱ्या लोकांची तोंडे आपोआप बंद झाली. पुरुषप्रधान क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करताना अशा प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागेल याची कल्पना मला होती, त्यामुळे लोक आपल्याबद्दल काय बोलतात याकडे मी फारसे लक्ष दिले नाही, असं ती सांगते.

कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट संपादन केलेल्या सोनबेर पारदीवाला यांनी वीस वर्षांपूर्वी सनी देओल आणि प्रीती झिंटा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द हिरो – लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटाद्वारे कारकीर्दीची सुरुवात केली. या चित्रपटानंतर मी साहसी दृश्ये उत्कृष्ट करू शकते याची जाणीव झाली. त्यानंतर कामे आपसूकच मिळत गेली.  लहानपणापासून साहसाचे वेड असल्याने या क्षेत्राची निवड केल्याचे ती सांगते. हिंदी चित्रपटसृष्टीतील वीस वर्षांच्या कारकीर्दीत केलेला प्रत्येक स्टंट आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगतानाच तीस फूट उंचीवरून किंवा धबधब्यावरून खाली उडी मारणे, पाण्याखाली स्टंट करणे, आगीशी खेळणे, बाइक चालवणे या स्टंट्सनी खूप शिकवल्याचे ती सांगते. आतापर्यंत तिने ‘बँग बँग’ चित्रपटासाठी कतरिना कैफ, तसेच ‘धूम’, ‘रावन’ चित्रपटात ऐश्वर्या रायसाठी स्टंट केले आहेत. ‘रबने बना जी जोडी’ या चित्रपटात अनुष्का आणि शाहरुखचे दुचाकीवरील दृश्य चित्रित करायचे होते. या दृश्यात एंडो प्रकाराने बाइक चालवायची होती. बाइकच्या पुढील बाजूस जोर देऊन ती हवेत उडवायची होती. या दृश्यासाठी बाइकला दोन ते तीन केबल लावण्यात आल्या आणि मग तो स्टंट आम्ही केला, अशी आठवणही तिने सांगितली.

‘३ इडियट्स’च्या शेवटच्या दृश्यात करिना कपूर पँगॉग लेकजवळ स्कूटरवरून येते असे दृश्य होते. या स्कूटरच्या मागे सूत कातायचा चरखा बसवला होता. रुपेरी पडद्यावर हे दृश्य पाहताना मजा येते मात्र त्या वेळी इतक्या थंडीत स्कू टर चालवताना अंग चांगलेच ठणकत होते, असं ती सांगते. ‘धूम’ चित्रपटातील हृतिक रोशनबरोबर चित्रित झालेले बाइकचे दृश्यही आव्हानात्मक होते. या दृश्यात हृतिक बाइकवर पाठीमागे उलटा बसलेला, त्याचे आणि माझे वजन सांभाळून दोन गाडय़ांच्या मधोमध बाइक चालवायची होती, अत्यंत एकाग्रतेने हा स्टंट पूर्ण करावा लागला होता, अशी आठवणही तिने सांगितली. टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, विद्युत जामवाल, कतरिना कैफ, परिणिती चोप्रा हे कलाकार सध्या स्वत:हून स्टंट करतात, अशी माहिती तिने दिली.  कलाकाराने स्टंट करण्यापूर्वी किमान शंभर वेळा स्टंटमन तो स्टंट करून पाहतात. मग कलाकारासोबत त्याचा सराव केला जातो. त्याचे संभाव्य धोके, सुरक्षेच्या उपाययोजना याची काळजी घेतली जाते. थरारक दृश्ये चित्रित करताना कलाकाराला इजा झाल्यास ते परवडणारे नसते. उद्या शाहरुख अथवा सलमान खानला स्टंट करताना हातापायाला इजा झाली, चेहऱ्याला जखम झाली तर ते आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत निर्मिती संस्थांचे वेळ, मेहनत, पैसा, मनुष्यबळ या गोष्टी गुंतलेल्या असतात. त्यामुळे प्रशिक्षित स्टंट आर्टिस्टनाही मेहनतीने आपले काम करावे लागत असल्याचे तिने स्पष्ट केले.

स्टंटच्या प्रकारानुसार त्यासाठी पुरेशी तयारी केली जाते. हवेत उडण्याचे, उंचावरून उडी मारणे, बाइक चालवणे, पाण्याखाली जाणे, मारधाडीचे दृश्य असल्यास दिग्दर्शक पहिल्यांदा तो प्रसंग समजावून सांगतो. स्टंट करताना वेळेचे भान ठेवणे आवश्यक असून, काही सेकंदांच्या चुकीमुळे व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो, असं ती सांगते. पाण्याच्या खाली वीस फूट खोल तुमचे हातपाय बांधले गेले असल्यास डोके शांत ठेवून स्टंट करावा लागतो. पाण्याच्या खाली वेट बेल्ट बांधल्यास लगेच वरती येणे शक्य नसते. एवढय़ा खाली पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाणही कमी असल्याने श्वासोच्छ्वासासही त्रास होतो. अशा वेळेस कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याची व्यवस्था करावी लागते. रेस्क्यू डायव्हर येऊन तुम्हाला काही वेळाने श्वासोच्छ्वास सुविधा देतात. यात जोखीम जास्त असते आणि वेळ चुकल्यास जीव जाऊ शकतो. सुदैवाने आतापर्यंत आपल्यावर जिवावर बेतण्याचा प्रसंग आलेला नाही, असेही तिने सांगितले.

‘‘मी जेव्हा कारकीर्दीला सुरुवात केली जेव्हा प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. आता संगणक, कॅमेरा यामुळे झालेला स्टंट लगेच पाहता येतो. त्यानुसार त्यात सुधारणाही करता येतात. स्टंटसाठी उपकरणे, केबल्स, क्रेन्स, पुल्स यांचा दर्जाही सुधारला आहे. त्यामुळे जोखमीचे प्रमाण कमी झाले आहे,’’ असे सांगतानाच सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या स्टंट दिग्दर्शकासोबत काम करायला आवडत असल्याचेही तिने स्पष्ट केले. शाम कौशल, परवेझ शेख, मेहमूद खान हे स्टंट करणाऱ्या माणसांची पुरेपूर काळजी घेतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कलाकार-दिग्दर्शक प्रसिद्धीच्या झोतात येतात. मात्र, स्टंट आर्टिस्ट कायम उपेक्षितच राहतात. काळाच्या ओघात दिग्दर्शन, छायाचित्रण, नृत्य दिग्दर्शन याप्रमाणे हे क्षेत्र प्रकाशझोतात आले नाही, याबद्दल तिने खंत व्यक्त के ली. या क्षेत्रात येण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे. यासाठी रोज झोप, आरोग्यपूर्ण खाणे, नियमित व्यायाम हे पाळते. याशिवाय, बाइक चालवणे, तायक्वांदो, कराटे, मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. तुम्ही संपूर्णपणे या क्षेत्रावर अवलंबून नाही राहू शकत, असा सल्लाही ती नवोदितांना देते. सोनबेर स्वत: व्यायाम प्रशिक्षक तसेच आहारतज्ज्ञ आहे. ‘फिजिकल हिप्नोथेरपी’ विषयात तिने पीएचडी संपादन केली आहे.

परदेशात स्टंटसाठी जास्त वेळ

परदेशात एखाद्या हॉलीवूडपटासाठी स्टंट चित्रित करताना पुरेसा वेळ दिला जातो. एका दृश्यासाठी स्टंट दिग्दर्शकाला एका आठवडय़ाचा वेळ मिळतो. हिंदी चित्रपटसृष्टीत तुलनेने पुरेसा वेळ दिला जात नाही. स्टंटमन सेटवर आल्यावर त्याला एका दिवसात तो स्टंट चित्रित करायचा असतो. स्टंट दृश्ये चित्रित करताना त्याआधी स्टंट दिग्दर्शकाला पुरेसा वेळ द्यायला पाहिजे, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.