रवींद्र पाथरे

जागतिकीकरणाच्या परिणामी इंग्रजीने देशोदेशींच्या भाषांवर प्रचंड आक्रमण केलेलं आहे. जरी ती बहुसंख्याकांची भाषा नसली तरी ती जगभरात जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करू शकणारी व्यवहारोपयोगी भाषा आहे. त्याचबरोबर ती सर्वमान्य ज्ञानभाषाही आहेच. इंग्रजांनी आणि अन्य युरोपीय राष्ट्रांनी अर्ध्याअधिक जगावर गेली किमान दोन शतके राज्य केल्यामुळे ती सर्वदूर पसरली. इंग्रजी साहित्य कला, संस्कृती, ज्ञान वासाहतिक राष्ट्रांतून झिपरलं. परिणामी अनेक राष्ट्रांना जागतिक व्यवहारांची, ज्ञानविज्ञानाची कवाडे खुली झाली. या पाश्चात्त्य राष्ट्रांनी आपल्या गुलाम प्रदेशांचं सर्व तऱ्हेचं शोषण केलं असलं तरी नाइलाजानं का होईना, त्यांना आधुनिक गोष्टीही (उदा. दळणवळणाची साधनं, टपालसेवा, लष्करी व्यवस्था इत्यादी) त्या त्या प्रदेशात स्वत:च्या सोयीसाठी विकसित कराव्या लागल्या; ज्या पुढे जाऊन एतद्देशीयांना सर्वस्पर्शी विकासाकरता उपयोगी पडल्या. त्यांच्या सर्वागीण कक्षा विस्तारल्या. मात्र, त्याचवेळी एक अनिष्ट गोष्टही घडली. इंग्रजीने त्यांच्या मातृभाषेवर आक्रमण केलं. या जगात टिकायचं असेल, प्रगती करून घ्यायची असेल तर इंग्रजीला तरणोपाय नाही अशी समजूत पसरली आणि वास्तवातील अनुभवांती ती दृढही झाली. आज परिस्थिती अशी आहे की जगातल्या शेकडो-हजारो बोलीभाषा झपाटय़ाने अस्तंगत होत आहेत. भाषांचं हे वैविध्य संस्कृतींचंही वैविध्य प्रकट करतात.

परंतु भाषांबरोबर नानाविध संस्कृतीही नष्ट होत आहेत. जागतिकीकरणाच्या वरवंटय़ाने तर भाषा, संस्कृती, कलांचं सपाटीकरण होत आहे. विचित्र भेसळ त्यातून आकारास येत आहे. प्रदेशविशिष्टता, संस्कृतिविशेष लोप पावत आहेत. आणखी काही काळानं सगळ्या जगाचंच एकरेषीय एकारलेपण अस्तित्वात येणार आहे; जे मानवी संस्कृतीचा चेहराच हरवणारं असेल.

आपल्याकडेही हे वेगानं घडतं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या देशात तब्बल २००० बोली अस्तित्वात होत्या. त्यापैकी केवळ १४ भाषांनाच अधिकृत भाषेचा दर्जा मिळाल्याने उर्वरित १९८६ भाषा पोरक्या, अनाथ झाल्या. १९६१ च्या जनगणनेनुसार, भारतात १६५२ मातृबोली नोंदवल्या गेल्या होत्या. त्यानंतर केवळ दहाच वर्षांत १९७१ च्या जनगणनेमध्ये केवळ १०८ मातृभाषा उरल्या. म्हणजे किती वेगाने बोली नामशेष होत आहेत पाहा. अंदमानपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत दर पंधरवडय़ाला एक भाषा मरण पावते आहे, हे वास्तव भाषिक सर्वेक्षणात उघड झाले आहे. बोली आधी भ्रष्ट होते, प्रदूषित होते आणि मग व्यवहारोपयोगी भाषेच्या आक्रमणाने नष्ट होते. हे चक्र अव्याहत सुरू आहे. हे आपल्याकडेच घडतंय असं नाही, तर जगभर सर्वत्र ही प्रक्रिया सुरू आहे. आपल्यापुरतं बोलायचं झाल्यास डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या भाषिक सर्वेक्षणात हे वास्तव प्रकर्षांनं समोर आलं.

तथापि ‘भाषेचा मृत्यू’ हा एखाद्या नाटकाचा विषय होऊ शकतो का? हा विचार सहसा कुणाच्या डोक्यात येणार नाही खरा; परंतु रामू रामनाथन या लेखकाच्या मनात तो आला! यापूर्वी मुंबईतील गिरणी संपाच्या पाश्र्वभूमीवर मृतप्राय झालेल्या गिरणगावावरही त्यांनी एक नाटक लिहिलं होतं. आजूबाजूच्या वास्तवानं अस्वस्थ होणाऱ्यांतला हा लेखक आहे. आपली ही बेचैनी ते निरनिराळ्या माध्यमांतून व्यक्त करत असतात. ‘शब्दांची रोजनिशी’ (एक सुरस प्रेमगाथा)’ या नाटकघर, पुणे निर्मित नाटकाची संहिता मुळातली रामू रामनाथन यांची. अमर देवगावकर यांनी ती अनुवादित केली आणि रामू रामनाथन यांच्याप्रमाणेच नाटकानं पछाडलेल्या अतुल पेठे यांनी तिची रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाशयोजना करून ते अभिनयांकितही केलं आहे. त्यांच्यासोबत आहेत केतकी थत्ते!

सतत काहीतरी नव्याच्या शोधात असणाऱ्या अतुल पेठे यांनी आशय, विषयाबरोबरच सादरीकरणाचाही यात वेगळा विचार केला आहे. बोली भाषांचा मृत्यू हा तसा रुक्ष, कोरडा विषय. सभा-परिसंवाद, चर्चा, वादविवाद या जातकुळीत फिट्ट बसणारा. परंतु त्यावर नाटक..? होय. नाटक! नाटक म्हटलं की त्यात नाटय़पूर्णता हवी. ती या विषयांत कुठून आणायची? म्हणून मग प्रेमकथेचा आधार! ती कुठल्या काळातली? ते निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु आणखी ५० वर्षांनी कदाचित ही कथा अस्तित्वात येऊ शकते. कारण तोवर ३५४ पेक्षाही जास्त मजल्यांची इमारत बांधण्याचं गगनभेदी तंत्रज्ञान विकसित झालेलं असू शकतं- जे या नाटकात आहे. या गोष्टीत ती- ‘अ’ आणि तो ‘ज्ञ’ अशी दोन माणसं आहेत. ‘अ’ ला या इमारतीत प्रचंड अवकाळी पावसात जबरदस्तीनं आणलं गेलंय. तिच्यासोबत तिचं बाळ आहे. ‘अ’ची दोन लग्नं झालीयत.. पण अयशस्वी. सध्या ती एकल पालक आहे. तिला कडेकोट बंदोबस्तात या इमारतीतल्या ३२१ व्या मजल्यावर आणलं गेलंय. का? कशासाठी? तिला माहीत नाहीए.

तिथं तो आहे – ‘ज्ञ’! त्याला या इमारतीबाहेर पाऊल टाकून वर्ष उलटलीयत. गेले कित्येक दिवस घनघोर पाऊस कोसळतोय. लाइट्स गेलेत. त्या तशा भयाण वातावरणात आपल्याला या अज्ञात ठिकाणी का आणलं गेलंय, हे तिला कळत नाहीए. ती त्याला खोदून खोदून विचारतेय; पण तो अवांतर गोष्टीच करतो आहे. त्यात त्याचा भाषेचा प्रॉब्लेम! तो एक वाक्यही धडपणे बोलू शकत नाहीए. मोठय़ा मुश्किलीने कधी तरी त्याला ‘भाषा’ सापडते आणि तो सुसंगतपणे बोलू शकतो. त्यामुळे तिच्या मनातला गोंधळ अधिकच वाढतोय. तो तिला काही फोटो दाखवतो. भूतकाळात आपल्या लेखणीनं लौकिक प्राप्त केलेल्या लेखकांचे. त्यांचं लेखनकर्तृत्वही सांगतो. हे विविध भाषिक लेखक आहेत. परंतु आता ते काळाच्या उदरात लुप्त झालेयत.. त्यांच्या लेखनासह! सध्या पाठय़पुस्तकांतून भलतंच काहीतरी शिकवलं जातंय. त्यांतले संदर्भ विकृत केले जात आहेत. पुस्तकांच्या मुखपृष्ठावरील शीर्षकांचा आणि आतल्या मजकुराचा ताळमेळ हरवलाय. या सगळ्या प्रकारांचा शोध घेतला जात आहे.

आणि म्हणूनच तिला – ‘अ’ला जबरदस्ती आणलं गेलंय. तिनं ‘शब्दांची हत्या’ नावाचा शोधप्रबंध लिहिलाय. ‘नष्ट होत जाणाऱ्या भाषा आणि मुकेपणा’ हा तिच्या अभ्यासाचा विषय आहे. ती ‘भाषिक दहशतवादी’ असल्याचा तिच्यावर संशय आहे.

हळूहळू तिला थोडे थोडे संदर्भ स्पष्ट होतात. तिला निरनिराळ्या बोलींतील अनेक सुंदर कविता, गाणी मुखोद्गत आहेत. त्यांतलं सौंदर्य, ज्या संस्कृतींचा ऱ्हास झाला आहे, होतो आहे त्यांतलं अनाघ्रात कोवळेपण तिला भावविभोर करतं आणि आपसूक ते तिच्या स्वरांतून स्रवतं. तिच्या एका प्रवासात ती एका अनाम खेडय़ातून जात असताना एक वृद्ध आपल्या नातवाला काहीतरी सांगत असतो; पण नातवाचा चेहरा मख्ख असतो. त्याला आपल्या आजोबाची बोली कळत नाही. खरं तर त्यांच्या बोलीत केवळ चहालाच ३६४ प्रतिशब्द आहेत. एवढी ती बोली समृद्ध आहे. परंतु आजच्या पिढीला ती कळेनाशी झाली आहे.

अशा अगणित गोष्टी.. ज्या बोलीभाषांबरोबरच लुप्त होत आहेत. नष्ट होत आहेत. प्रगती आणि विकासाच्या नावाखाली आपला हा समृद्ध वारसा आपण गमावतो आहोत याची कुणालाच दखल नाहीय. खेद आणि खंत तर दूरच राहो.

हे असंच सुरू राहिलं तर जगातल्या सगळ्याच भाष नष्ट होतील. माणसाला मुकेपण प्राप्त होईल. संवादच संपला तर माणसाच्या अस्तित्वाला तरी अर्थ उरेल का? आज फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपवर भाषेचं लघुरूप झपाटय़ानं फैलावतं आहे. सोय म्हणून स्वीकारलेलं हे फॅड एक दिवस भाषाच नष्ट करणार नाही ना? ही भीती विवेकशील माणसांना सतावते आहे. ती खरीही आहेच. अशानं एक दिवस कुठलीच भाषा उरणार नाही. माणसं मुक्यानंच एकमेकांशी संवाद साधू बघतील. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं पुढे कदाचित त्याचीही आवश्यकता उरणार नाही. मग माणसाच्या असण्यालाही तरी काय अर्थ उरणार?

‘शब्दांची रोजनिशी’चं हेच प्रयोजन आहे. नष्ट होत जाणाऱ्या समृद्ध बोलींकडे निर्देश करणं! आणि तो सफल होतो. फक्त त्यासाठी वापरलेली ‘प्रेमकथा’ फार कुठं दृश्यमान होत नाही. तिचं असणं ठसत नाही. तिचं अस्तित्व ढोबळ आणि प्राथमिक पातळीवरचं आहे. मात्र, भाषेच्या मृत्यूचा मुद्दाही सस्पेन्स थ्रिलर निर्मितीच्या नादात (थोडक्यात; ‘नाटय़’!) बराच काळ ऐरणीवर येत नाही. येतो तो तुटकतुटकपणे. त्यामुळे एक संभ्रमितपण बराच काळ राहतं. तोवर प्रगतीची आकांक्षा आणि गतिमानतेत गरगरणारा मनुष्यप्राणी अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून मधून मधून डोकावत राहतो. ‘अ’चं बाळ हे नष्टप्राय होऊ घातलेल्या बोलीचं प्रतीक आहे. अतुल पेठे यांनी एका वेगळ्या विषयाला हात घालण्याचे धाडस ‘शब्दांची रोजनिशी’मध्ये केलं आहे. सादरीकरणाचाही वेगळा विचार त्यांनी केला आहे. आश्चर्यकारकरीत्या त्यांनी आपल्या अभिनयातही बदल केला आहे. जो एक सुखद अनुभव आहे. भाषिक, वाचिक अभिनयाचे काही नमुने त्यांनी पेश केले आहेत. केतकी थत्ते या गोड गळ्याच्या सुजाण अभिनेत्रीनं त्यांना तितकीच उत्तम साथ केली आहे. तमीळ, बंगाली, ईशान्य भारतीय बोलींतील तसंच विविध भाषांतील मधुर गीतांची मेजवानी देत भाषा-वैविध्यातील समृद्धता केतकी थत्ते यांनी उत्कटतेनं पोहोचविली आहे. भाषेवरची हुकमत आणि तिचा प्राण पकडण्याची किमया त्यांना साधली आहे. प्राची वैद्य (दुबळे) यांच्या आदिवासी संगीतविचाराने ‘शब्दांची रोजनिशी’ आणि त्यातला आशय एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो.

प्रदीप मुळ्ये यांचं सूचक नेपथ्य, साकेत कानेटकर यांचा ध्वनिविचार, अच्युत पालव यांचं भाषानुगामी अक्षरसुलेखन, रश्मी रोडे, यांची वेशभूषा, शुभंकर सौंदणकर आणि सावनी पुराणिक यांचं अ‍ॅनिमेशन या साऱ्यांनी ही ‘रोजनिशी’ समृद्ध आणि आशयसंपृक्त केली आहे.

फक्त प्रश्न एवढाच पडतो की, ज्या काळात हे नाटक घडताना दाखवलंय, त्या काळात मराठी भाषा तरी अस्तित्वात असेल का?