News Flash

‘सोयरे सकळ’ : घनगर्द अरण्यात.. मूळांच्या शोधात!

माणसाचं आयुष्य कुठून कुठं वाहवत जाईल सांगता येत नाही. मनुष्य आशा आणि अपेक्षा करतो तसं त्याच्या आयुष्यात घडतंच असं नाही.

(संग्रहित छायाचित्र)

रवींद्र पाथरे

माणसाचं आयुष्य कुठून कुठं वाहवत जाईल सांगता येत नाही. मनुष्य आशा आणि अपेक्षा करतो तसं त्याच्या आयुष्यात घडतंच असं नाही. त्याने कितीही प्रयत्न केले, त्यासाठी कितीही कष्ट उपसले तरी काही गोष्टी त्याच्या हातात नसतात. यालाच कुणी ‘नियती’ म्हणतं, कुणी ‘आयुष्याचे भोग’ म्हणतं, तर कुणी ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..’ म्हणत समोर आलेल्या वास्तवाचा निमूटपणे स्वीकार करतं. क्वचित कुणाच्या वाटय़ाला सगळी सुखं हात जोडून उभी असलेली आपल्याला दिसतात. पण खरंच ते वास्तव असतं का? ..प्रश्नच आहे!

अशा वेळी मानवी जीवन अशाश्वत आहे, मनुष्य नियतीच्या हातातलं बाहुलं आहे याची प्रकर्षांनं जाणीव होते. मानवी जीवनातली ही अशाश्वतता सर्वानाच माहीत असली तरी माणसं कायम असं गृहीत धरून जगत असतात, की आपलं आयुष्य आहे तसंच निरंतर राहणार आहे. त्यामुळेच ती षड्रिपूंसह निर्धास्तपणे जगत असतात. परंतु अकस्मात अशी एखादी घटना घडते, असं एखादं संकट समोर उभं ठाकतं, की सारं होत्याचं नव्हतं होतं. अशा कसोटीच्या प्रसंगांतून माणसं एकतर तावूनसुलाखून निघतात, किंवा मग कोसळून तरी पडतात. यालाच ‘जीवन’ म्हणतात. मानवी जीवनाचं सार मांडणाऱ्या कलाकृती क्वचितच आपल्यासमोर येतात.. ज्या आपल्याला समृद्ध करून जातात. विचार करायला भाग पाडतात. जीवनाचं क्षणभंगुरत्व पटवून देतात. नाटककार महेश एलकुंचवारांची ‘वाडा’ नाटय़त्रयी अशांपैकीच एक. माणसाचं व्यामिश्र, कमालीचं गुंतागुंतीचं, बहुरेषीय आयुष्य चितारणाऱ्या अशा कलाकृती हल्ली अनुभवायला मिळत नाहीत. कारण हे शिवधनुष्य पेलणं येरागबाळ्याला शक्य नसतं. त्यासाठी अशी कलाकृती निर्माण करणारा निर्मिकही सखोल असावा लागतो. आजच्या फास्ट फूडी जमान्यात इतकं खोलवरचं मानवी जीवनाबद्दलचं चिंतन, मनन आणि नंतर त्यावर भाष्य करण्यासाठी लागणारं निवांतपण कुणापाशीच नाहीए. साहजिकच अशी नाटकं आता दुर्मीळ झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर रंगमंचावर नुकतंच आलेलं भद्रकाली प्रॉडक्शन्सचं डॉ. समीर कुलकर्णी लिखित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘सोयरे सकळ’ हे नाटक त्याच्या वेगळेपणामुळे लक्षवेधी ठरतं. मानवी जीवनाचा एक नमुना सूक्ष्मदर्शकाखाली धरून तो प्रेक्षकासमोर ठेवणारं हे नाटक आहे. संगीत रंगभूमी, सरंजामशाही अस्तित्वात असण्याचा स्वातंत्र्यपूर्व काळ. १९४०-४५ च्या सुमाराचा. दादासाहेब क्षीरसागर हे एक तालेवार वकील. परंपरानिष्ठ. धार्मिक कर्मकांडं निष्ठेनं पाळणारे. हस्तसामुद्रिक वगैरे पाहणारे. त्यांची पत्नी माई ही त्या काळास अनुरूप पतिपरायण. विनायक आणि ताई ही त्यांची दोन लहान मुलं. घरात सुबत्ता. नोकरचाकरांसकट नांदता वाडा. कुलस्वामिनी रेणुकादेवीचं घरात प्रस्थ. दरवर्षी तिचा उत्सव जोशात होत असे. घर आल्यागेल्याचं स्वागत करणारं. परंपरानिष्ठ असलं तरी आदराचं स्थान, दरारा बाळगून असलेलं. दादांचा बालमित्र साधू त्यांच्याच घरी लहानाचा मोठा झालेला. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला. त्या घराचाच अभिन्न हिस्सा झालेला.

माईंचा भाऊ नाना हा संगीत नाटकांच्या ओढीनं घरातून पळून गेलेला. त्या काळी नाटकांतून कामं करणं म्हणजे वाया जाणं असं मानलं जाई. स्वाभाविकपणेच नानाचं नाव सगळ्यांनी टाकलेलं. बालगंधर्वाच्या कंपनीत तो पदरी पडेल ती भूमिका करी. कधीकाळी आपणही बालगंधर्वासारखे मोठे नट होऊन स्वत:ची नाटक कंपनी काढायची अशी मनिषा नाना बाळगून असलेला. पण एके दिवशी नाटक मंडळीच्या व्यवस्थापनाने नानाला त्याचा नाटक मंडळीतील शेर संपल्याचं सांगितलं आणि तो सैरभैर झाला. याउप्पर आपलं आयुष्य काळोख्या रात्रीसारखं भयाण असणार, हे प्राक्तन त्यानं जड अंत:करणानं स्वीकारलं आणि तो बहिणीला- माईंना अखेरचं भेटायला तिच्या घरी आला. एका पेटाऱ्यात जपलेला लंगडा बाळकृष्ण, बालगंधर्वाच्या गाण्याच्या तबकडय़ा आणि नाटक काढण्यासाठी पै-पै करून जमवलेली रक्कम बहिणीच्या स्वाधीन करून हिमालयात जायचं त्यानं ठरवलेलं. मात्र, दादांसमोर कुठल्या तोंडानं जायचं, हे त्याच्यापुढचं भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह. माई त्याच्यावतीनं दादांकडे रदबदली करते. शेवटी दादा त्याला भेटायचं मान्य करतात. नाना त्यांच्याकडे आपल्या कृत्यांची कबुली देतो आणि पहाटेच्या अंधारात घरातून निघून जातो. त्याच दिवशी त्यानं नदीत जीव दिल्याची खबर येते आणि सगळं घर हादरतं. दादा हट्टानं छोटय़ा विनायकाला नानाचे अंतिम संस्कार करायला लावतात. लहानग्या विनायकाच्या कोवळ्या मनावर ही घटना एखाद्या दु:स्वप्नासारखी कोरली जाते. तो दादांपासून.. घरापासून दुरावत जातो.

..ही एका नष्टचर्याची सुरुवात असते.

पुढे गांधीबाबाच्या खुनानंतर झालेल्या सार्वत्रिक जाळपोळीत दादांचा वाडाही गावकऱ्यांकडून जाळला जातो. माईच्या धीरोदात्ततेमुळे मुलं आणि ती स्वत: जिवानिशी वाचतात खरे; परंतु कुलदेवतेला विहिरीत टाकून त्यांना परागंदा व्हावं लागतं. दादांचे मित्र साधू याच्या नगरच्या घरी त्यांना आश्रय घ्यावा लागतो. आपण आपल्या कुलदैवतेचं रक्षण करू शकलो नाही, हा जबर धक्का दादांना सहन होत नाही. ते उन्मळून पडतात. माई मात्र खंबीरपणे आल्या संकटाला सामोरी जाते..

अर्थात पुढे जे घडतं ती अपरिहार्यतेची एक अटळ साखळी असते. ज्यात घडल्या प्रसंगात मनांना बसलेल्या गाठी/ निरगाठी, प्रत्येकाची त्या सगळ्याकडे पाहण्याची भिन्न वृत्ती, स्वभावगत गुणदोष आणि त्यातून त्यांचं घडणं/बिघडणं, वाहवत जाणं, परस्परांपासून दुरावणं.. असा एक ऱ्हासाचा प्रवास सुरू होतो. या सगळ्यात माणसांतल्या माणुसकीचीही एक किनार दिसून येते. पाण्यावर काठी मारून ते कितीही दुभंगलं तरी पुन्हा ते जसं एकाकार होतं, तसंच हे दुरावणंही पुढे संपतं.. शौनकच्या (विनायकच्या मुलाच्या) रूपानं! एका कुटुंबाचा हा प्रदीर्घ जीवनप्रवास आपल्याला बांधून ठेवतो. त्यातल्या काही खटकणाऱ्या गोष्टी दृष्टीआड सारल्यास ‘सोयरे सकळ’ एक अंतर्मुख करणारा अनुभव देतं यात शंका नाही. फ्लॅशबॅक तंत्रानं नाटकाची बांधणी केली गेली आहे. हल्ली सहसा हा प्रकार नाटकांत आढळत नाही.

बालपणीच्या कटु आठवणींमुळे घराशी, तिथल्या माणसांशी, आपल्या मातीशी कायमस्वरुपी काडीमोड घेऊन अमेरिकेत अट्टहासानं स्थायिक झालेल्या विनायकचा मुलगा शौनक आपल्या मुळांच्या शोधात भारतात येतो आणि ताईआत्याच्या तोंडून त्याला आपल्या घराण्याचा, घरातल्या माणसांचा भूतकाळ उलगडत जातो. अमेरिकेत जन्मलेल्या शौनकला वडिलांनी कटाक्षानं आपल्या मातृभूमीपासून, तिथली संस्कृती, परंपरांपासून दूर ठेवलेलं असतं. हट्टानं. पण इथले उरलेसुरले पाश मिटवायला आलेल्या शौनकला ताईआत्याकडून जे ऐकायला मिळतं, ते फारच अद्भुत असतं. त्याला आपल्या समृद्ध मूळांचं दर्शन घडवणारं असतं. त्याने त्याचं त्रिशंकूपण संपतं. ‘सोयरे सकळ’मधली सर्वच माणसं अस्सल हाडामांसाची आहेत. त्यांच्या श्रद्धा, समजुती आजच्या काळाच्या फूटपट्टय़ा लावता अनिष्ट असल्या तरी त्यांचा तत्कालिन काळाच्या संदर्भातच विचार करायला हवा. त्या वेळची माणसं, त्यांचे राग-लोभ, पीळ, त्यांच्या स्वभावांतले पेच, खाचाखोचा या जशा आहेत तशा स्वीकारणं भाग आहे. यातली तानीबाई (गंधर्व नाटक कंपनीत गाणं शिकायला आलेली आणि नानासमवेत ‘सं. स्वयंवर’ सादर करण्याचं स्वप्न पाहणारी!) ही त्या काळाचा विचार करता खटकते. कारण बालगंधर्वाच्या काळात नाटकांत स्त्रिया कामं करीत नसत. म्हणूनच तर बालगंधर्व अजरामर झाले. ही बाब वगळता नाटय़ात्म परिणामाच्या दृष्टीनं तानीबाईचं नाटकातील असणं महत्त्वपूर्ण आहे. ती नानांशी लग्न न करता पतिव्रतेप्रमाणे राहते. पुढे नानांच्या पश्चात परिस्थितीवश तिला देहाचा बाजार मांडावा लागला तरी ती मनानं नानांशीच एकनिष्ठ असते. दादा-माईंना संकटात मदत करताना तिचं त्यांच्याशी अप्रत्यक्ष असलेलं (पण त्यांनी न स्वीकारलेलं) आतडय़ाचं नातं प्रभावी ठरतं. असो.

लेखक डॉ. समीर कुलकर्णी यांनी हा पीरियड प्ले बारीकसारीक तपशिलांनिशी आकारला आहे. तत्कालीन माणसं, त्यांचे वर्तन-व्यवहार, तत्त्वनिष्ठा, त्याकरता सर्वस्व पणाला लावण्याची वृत्ती, नियतीच्या खेळानं त्यांचं ध्वस्त होणं अन् फिरून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं- या साऱ्या प्रवासातल्या वळणवाटा, पेच, अंतर्विरोध, त्यावरची त्यांची मात असा व्यापक पट त्यांनी अस्सलतेनं उभा केला आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी हा कॅनव्हास समूर्त करण्यात कसली कसर सोडलेली नाही. फ्लॅशबॅक तंत्रानं हा प्रवास रेखाटायचा असल्यानं दिग्दर्शक व कलावंतांनाही (दुहेरी भूमिका करीत असल्याने) तारेवरची कसरत करावी लागली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नाटकाचा ओघ किंचित अवरुद्धही होतो. प्रदीप मुळ्ये यांनी १९४० सालातला वाडा आणि साधूचं नगरचं घर वास्तवदर्शी साकारलं आहे. नाटकातल्या नाटय़पूर्ण घडामोडी प्रकाशयोजनेतून अधिक गहिऱ्या करण्यात ते यशस्वी झाले आहेत. अजित परब यांनी तो काळ व त्याच्याशी संबद्ध नाटय़ात्मकता पार्श्वसंगीतातून अधोरेखित केली आहे. गीता गोडबोले (वेशभूषा) व सचिन वारीक (रंगभूषा) यांचाही या घडणीतला वाटा महत्त्वपूर्ण आहे.

अविनाश नारकर यांनी ४० च्या दशकातील धर्मनिष्ठ, परंपरेचे कट्टर पुरस्कर्ते वकील दादासाहेब क्षीरसागरांचा परंपरानिष्ठेतून आलेला ताठा, त्यांची उपजत सहृदयता, प्रसंगोपात बदलणारी त्यांची रूपं उत्कटतेनं व्यक्त केली आहेत. विनायकचा कडवटपणा तसंच त्याआतला हळवा कोपराही त्यांनी वास्तवदर्शी केला आहे. ऐश्वर्या नारकर यांनी पतिपरायण, परंतु मूलत: कणखर वृत्तीची माई उत्तम साकारली आहे. पंच्याहत्तरीच्या ताईआत्याचा मऊ मुलायमपण, तिचं प्रसंगी करारी होणं, हे आवाजातील सूक्ष्म कंपनांतून त्यांनी यथार्थपणे दर्शविलं आहे. आदित्य इंगळे हे साधूच्या भूमिकेत चपखल बसले आहेत. धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे आणि प्रागतिक विचारांचे कोमलहृदयी साधू त्यांनी आब राखत रंगवले आहेत. अश्विनी कासार यांची तानीबाई लक्षवेधी झाली आहे. दोनच प्रसंगांत त्या छाप पाडून जातात. आशुतोष गोखलेंचा शौनक आजच्या पिढीचा प्रतिनिधी आहे. त्यांनीच नानामामाचा अपराधगंडही ताकदीनं व्यक्त केला आहे. सुनील तांबट (घरगडी सरकती, शिरू) आणि अनुया बैचे (जना) यांनीही आपली कामं चोख केली आहेत. वेगळ्या धाटणीचं हे नाटक त्याच्या वेगळेपणासाठी नक्कीच पाहायला हवं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 12:47 am

Web Title: article on soyare sakal marathi drama
Next Stories
1 चित्रचाहूल : अद्भुत सफर
2 चित्ररंग : हसत खेळत ‘धडा’
3 दोन मित्र
Just Now!
X