असिफ बागवान

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अवघं जग भयचकित झालं आहे. चीनपासून सुरू होऊन जगभर पसरत गेलेल्या या विषाणूने सध्या युरोपात कहर चालवला असून येत्या काही दिवसांत हे महासंकट भारताला विळखा घालेल, असे चित्र आहे. करोनाला रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि सर्वच यंत्रणा अहोरात्र झगडत आहेत. अशा स्थितीत नागरिकांवर केवळ एकच जबाबदारी सोपवण्यात आली आहे ती म्हणजे, घराबाहेर न पडण्याची. एरवी अशी आयती सुट्टी मिळाली की, आपण हर्षभरित होऊन परगावी किंवा फिरायला जाण्याचे बेत आखतो. पण सध्याच्या परिस्थितीत तसं करणंही धोक्याचं आहे. आपापल्या घरातच थांबणं, हाच यावरचा सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. तसं तर घरातच बसून राहायचं म्हटलं तर आपल्याला कुटुंबासोबत जास्तीतजास्त वेळ व्यतीत करता येणार आहे. आईवडील मुलं, भावंडं, वडीलधारी मंडळी मिळून मनसोक्त गप्पा मारणं याच्यासारखा उत्तम विरंगुळा कोणताच नाही. पण तरीही तुम्हाला वेगळा विरंगुळा हवा असेल तर टीव्ही आहेच. सध्या टीव्हीवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवरही करोनामुळे मर्यादा आल्या आहेत. एरवीही या कार्यक्रमांमधील वैविध्य आणि मनोरंजनमूल्य हरवत चालल्याची ओरड होतेच. अशा वेळी ओव्हर द टॉप अर्थात ऑनलाइन स्ट्रिमिंग पुरवणाऱ्या सेवांचा पर्याय चांगला आहे. ओटीटीच्या नवरंजन फलाटावरील कार्यक्रम सहकुटुंब पाहण्यासारखे नसतात, असा तुमचा अनुभव असेल तर तुमच्यासाठी काही अशा मालिका, चित्रपटांचे पर्याय आम्ही सुचवत आहोत, जे तुम्हाला सहकुटुंब पाहता येतील आणि मनोरंजन करता येईल.

* होस्टेज- ‘हॉटस्टार’वर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेली ही वेबमालिका खरंतर आपल्याला सध्याच्या नजरकैदेच्या अवस्थेत अस्वस्थ करून जाईल. एक निष्णात सर्जन तिच्या रुग्णालयात राज्याच्या मुख्यमंत्र्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करणार असते. शस्त्रक्रिया साधीच असली तरी, ती होण्याआधी तिच्या आयुष्यात एक मोठ्ठं वादळ निर्माण होतं. काही जण तिच्या संपूर्ण कुटुंबाला तिच्याच घरात ओलीस ठेवतात आणि तिच्यावर शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण करून मुख्यमंत्र्याचा मृत्यू निश्चित करण्यासाठी दबाव आणला जातो. एकीकडे कुटुंबाचे प्राण तर दुसरीकडे कर्तव्याशी प्रतारणा अशा कात्रीत सापडलेली ही डॉक्टर नेमकं काय करते, याचा थरार मांडणारी ही वेबमालिका कौटुंबिक मनोरंजन म्हणता येणार नसली तरी, ती पाहता पाहता तुमचे काही तास कसे संपले, हे कळणारही नाही.

*  द फॅमिली मॅन – मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेली ही वेबमालिकाही गेल्या वर्षीचीच. भारतीय गुप्तचर विभागात गोपनीयपणे काम करणाऱ्या एका ऑफिसरच्या आयुष्यात कौटुंबिक प्रश्न सर्वसामान्यांसारखेच आहेत. ते सोडवता सोडवता त्याच्यावर देशात विघातक कृत्ये करू पाहणाऱ्यांना रोखण्याचीही जबाबदारी आहे. ही दुहेरी जबाबदारी तो कशी पार पाडतो, हे या दहा भागांच्या मालिकेतून तुम्हाला पाहता येईल. या वेबमालिकेतील काही प्रसंग आणि संवाद लहान मुलांसाठी योग्य नाहीत. मात्र, एकंदरीत ती कौटुंबिक मनोरंजनाचा चांगला पर्याय आहे.

* द टेस्ट- तुम्ही खेळांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी हा एक मस्त पर्याय आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. स्पोर्ट्स वाहिन्यांवर दाखवण्यात येणारे सामन्यांचे पुनप्र्रसारण कंटाळवाणे वाटू लागले असेल तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची जवळून ओळख करून घेण्याची हीच संधी आहे. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विकेट मिळवण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार वॉर्नर आणि एक गोलंदाज यांना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर ऑस्ट्रेलियासह अवघ्या क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. ऑस्ट्रेलियाचे भविष्यातील आधारस्तंभ समजले जाणारे स्मिथ आणि वॉर्नरच यात अडकल्याने ऑस्ट्रेलियाचं क्रिकेटच आता कोलमडणार, अशी चर्चा असताना नव्या पिढीने संघाचा डोलारा सांभाळला. तो सगळा काळ जसाच्या तसा कॅमेऱ्यात टिपणारी ही डॉक्युसीरिज पाहण्याचा अनुभवच आगळा आहे. यात क्रिकेट हा केंद्रबिंदू आहेच पण त्यासोबतच थरार आणि भावनांचे मिश्रणही आपल्याला पाहायला मिळेल.

*  धिस इज फुटबॉल-  क्रिकेटवरील डॉक्युसीरिज पाहायची नसेल तर फुटबॉलवरची ही सहा भागांची डॉक्युमेंट्री पाहाच. जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक देशांत खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलची मोहिनी जगावर कशी पसरत गेली आणि आता ती उरलेलं जग कसं भारून टाकत आहे, हे या डॉक्युमेंट्रीतून तुम्हाला पाहायला मिळेल.

जुनं ते सोनं

ओटीटीवर ढिगाने दाखल होत असलेल्या वेबमालिकांबद्दल एक नेहमीची तक्रार असते ती म्हणजे, त्या सहकुटुंब पाहणं अवघड आहे. हिंसक दृश्ये, अश्लील संवाद, शिवीगाळ, प्रणयदृश्ये किंवा बोल्ड विषय अशा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे यातील बहुतांश मालिका ‘१८+’च्या वर्गात जाऊन बसतात. अशा वेळी येथे काय पाहायला मिळणार, असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय आहे. अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार किंवा नेटफ्लिक्सवर तुम्हाला दूरदर्शनच्या जमान्यातील अनेक मालिका पाहायला मिळतील. जबान संभालके, शक्तिमान, मालगुडी डेज, ये जो है जिंदगी, फौजी, राजा और रॅण्चो, साराभाई व्हर्सेस साराभाई, खिचडी अशा असंख्य जुन्या मालिका तुम्हाला नवरंजनाच्या फलाटावर पाहायला मिळतील. त्या पाहताना जाहिरातींचा स्वल्पविराम नसल्याने आणखी मजा येते. शिवाय मुलांसोबत बसून त्या पाहात असताना तुम्ही त्या काळच्या आठवणींतही सहज रमून जाल. तसं तर यूटय़ूबवरही तुम्हाला अशा जुन्या मालिकांचे पर्याय उपलब्ध आहेतच.

तानाजी, पंगा, छपाक

ओटीटी वाहिन्यांचं सबस्क्रिप्शन घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, त्यावर नवनवीन चित्रपटही टीव्हीपेक्षा आधी पाहायला मिळतात. सध्या या वाहिन्यांवर तानाजी, पंगा, छपाक या अलीकडच्या काळातील सिनेमांचा बोलबाला आहे. तुम्ही सिनेमागृहात जाऊन हे चित्रपट पाहू शकला नसाल तर, आता घरातच सिनेमागृहासारखं वातावरण तयार करून तुम्ही घरबसल्या हे चित्रपट पाहू शकता. एवढंच नव्हे तर, तुम्ही अनेक जुने हिंदीमराठी चित्रपटही विनासायास पाहू शकता. झी फाइव्हवर तुम्हाला मि. इंडिया, राम लखन, हिरो, कर्मा यांसह असंख्य हिंदी मराठी चित्रपटांचे पर्याय उपलब्ध आहेत.

करोनाबाबत गंभीर नसाल तर..

पुढील काही दिवस तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला घरातच बसून काढायचे आहेत. त्यातून कोणतीही सुटका नाही. करोनासारख्या गंभीर आजारापासून स्वत:ला संरक्षित ठेवण्याचा सध्या तरी तोच उपाय आहे. वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांतूनही वारंवार हे सांगितलं जात आहे. पण तरीही तुम्ही त्याबद्दल गंभीर नसाल तर मग नेटफ्लिक्सवरील ‘पॅनडेमिक’ही डॉक्युमेंट्री तुम्ही पाहायलाच हवी. ‘पॅनडेमिक: हाऊ टू प्रिव्हेंट अ‍ॅन आउटब्रेक’ ही डॉक्युमेंट्री म्हणजे जगभर सध्या सुरू असलेल्या करोनासंकटाचा आरसा आहे. सुमारे शंभरहून अधिक वर्षांपूर्वी जगभरातील पाच ते दहा कोटी नागरिकांचे प्राण घेणाऱ्या फ्लूनंतर मानवासमोर अनेक महामारी संकट म्हणून उभ्या ठाकल्या. मानवाने त्यांचा मुकाबला कसा केला आणि आताच्या या संकटाला तोंड देण्यासाठी आपण समर्थ आहोत का, याचा शोध घेणारा हा लघुपट नक्की पाहा. काही नाही तर घरातच बसण्यात किती शहाणपण आहे, हे तरी तुम्हाला समजेल.