रवींद्र पाथरे

नेहमी खरं बोलणं योग्य की अयोग्य?

व्यवहारवाद्यांचं म्हणणं : आपला स्वार्थ त्यामुळे साध्य होत असेल तर खोटं बोलायला हरकत नाही. नैतिकतावाद्यांच्या मते मात्र.. हे घोर पाप होय! काही वेळा माणसं दुखावू नयेत म्हणून, कधी सामाजिक संकेत म्हणून, तर कधी त्यापायी व्यक्तिगत/ कौटुंबिक/ सामाजिक विध्वंसाची शक्यता असल्याने खरं बोलणं टाळलं जातं. कधी नात्यात वाईटपणा कशाला, म्हणूनही काही गोष्टींबद्दल खरं बोललं जात नाही. ज्याने काही साध्य होण्यापेक्षा नको तो पेचच निर्माण होण्याची शक्यता जास्त असेल तरीही मग कशाला खरं बोला, असा विचार केला जातो. केव्हा केव्हा सत्य बोलणं टाळलं तरच कौटुंबिक/ सामाजिक शांतता टिकू शकते. प्रत्येक माणूस कधी खरं बोलावं, कधी बोलू नये, हे तारतम्यानं ओळखायला शिकतो. आणि मगच ठरवतो की- कधी खरं बोलणं योग्य!

‘प्रवेश’ आणि ‘मोतलिंगज् प्रॉडक्शन्स’ निर्मित, तेजस रानडे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘तेरी भी चूप’ हे नाटक या द्विधावस्थेचं हसतखेळत धमाल दर्शन घडवतं. एका पाश्चात्य कलाकृतीवर आधारित हे नाटक स्त्री-पुरुष संबंधांतील गोपनीयता आणि त्यातला नैतिक पेच यांवर आधारलेलं आहे, एवढं सांगितलं तरी नाटकाचा विषय आणि त्याची व्याप्ती समजू शकते.

ऋजुता आणि वरुण हे जोडपं साहील-समीराचं अत्यंत जवळचे मित्र आहे. म्हणजे साहीलची इत्थंभूत माहिती वरुणकडे असते. आणि याच्या उलटही! तीच गोष्ट समीरा-ऋजुताचीही!

एके दिवशी समीरा एका मॉलमधून बाहेर पडत असताना वरुणला एका भलत्याच स्त्रीचं चुंबन घेताना पाहते आणि ती भयंकर संतापते. नेमक्या त्याच दिवशी साहीलने वरुण व ऋजुताला पार्टीला बोलावलेलं असतं. पण वरुणच्या या धक्कादायक वर्तनानं चिडलेली समीरा साहीलला पार्टी रद्द करण्यासाठी फर्मावते. पण ‘वरुणचा तो खासगी मामला आहे; आपण त्यात का पडा?’ असं साहीलचं म्हणणं असतं. शिवाय ‘असं एखाद्या वेळी पुरुषानं फ्लर्टिंग केलेलं चालतं,’ असंही तो समीराला समजवायला जातो आणि माती खातो. ‘म्हणजे साहीलला हे सारं क्षम्य, तात्कालिक वाटतंय तर?’ या नव्या भुंग्यानं समीराचं डोकंच फिरतं. समीराला घडली गोष्ट लगेचच ऋजुताला सांगून ‘वरुण तिला फसवतोय..’ हे तिच्या कानी घालायचं असतं. पण साहीलला हे होऊ द्यायचं नसतं. यामुळे चांगल्या चाललेल्या ऋजुता-वरुणच्या संसारात विष कालवलं जाईल असं साहीलचं म्हणणं असतं. परंतु अत्यंत जवळची मैत्रीण असलेल्या ऋजुताला याबाबतीत अंधारात ठेवणं समीराला पटत नाही. त्यावरून समीरा-साहीलमध्ये चांगलीच जुंपते. शेवटी समीरा कशीबशी साहीलचं म्हणणं मानायला राजी होते. आणि तेवढय़ात ऋजुता-वरुण पार्टीसाठी येऊन थडकतात.

पण समीराचा काही भरवसा नाही याची साहीलला पुरेपूर कल्पना असते. त्यामुळे तो वरुणला प्रोटेक्ट करण्याच्या प्रयत्नांत असतो. आणि समीराही जमेल तसं वरुणला अडचणीत आणणारे प्रश्न आडून आडून विचारत राहते. तिच्या भडिमारापासून वरुणला वाचवता वाचवता साहीलच्या नाकी नऊ येतात. गमतीचा भाग म्हणजे ऋजुताला समीराच्या प्रश्नांतली खोच लक्षात येत नाही आणि ती समीराला अपेक्षित उत्तरं न देता भलतीच उत्तरं देते.

या सगळ्या प्रकारात साहीलचं जे वागणं असतं त्यातून समीराच्या मनात तोही आपल्या पश्चात ‘असलं’ काहीतरी करत असावा असा संशय निर्माण होतो. ती त्याला खोदून खोदून विचारते. पण तो साफ कानावर हात ठेवतो. शेवटी समीरा त्याला घोळात घेते. ‘असं काही असलं तर खरं खरं  सांग.. मी बिलकूल रागावणार नाही. उलट, त्यातून आपल्या नात्यात पारदर्शकता येईल,’ असं ती त्याला समजावते. आधी सावध पवित्रा घेतलेला साहील या आश्वासनावर पिघळतो आणि ‘असं एक प्रकरण काही दिवसांपूर्वी आपल्या आयुष्यात घडल्याचं’ कबूल करून बसतो. आणि नको तिथं माती खातो.

त्यानंतर समीरा त्याची इंटरपोल काय घेईल, अशी झडझडून झाडाझडतीच घेते. तेव्हा एकदम बचावात्मक पवित्र्यात जात साहील ‘आपण ही रचून सांगितलेली गोष्ट होती,’ अशी सारवासारव करू बघतो. मात्र, समीराला आता ते पटणं शक्यच नसतं. साहीलची पोलखोल झालेली असते. वरुणला वाचवता वाचवता तो स्वत:च गोत्यात येतो.

आपला संसार आता तुटलाच.. या निष्कर्षांप्रती आलेल्या साहीलवर दुसऱ्या दिवशी समीरा ऑफिसला जाता जाता आणखीन एक बॉम्बगोळा टाकते. आपलंही असंच एक प्रकरण अलीकडे झाल्याचं ती त्याला कोरडय़ा, थंड आवाजात सांगते. तिच्या या भीषण गौप्यस्फोटानं साहील पुरताच हादरतो. उद्विग्न, असहाय, हतबल होतो. अक्षरश: कोसळतोच. ‘समीराच्या आयुष्यातला हा पुरुष कोण?’ या प्रश्नाचा भुंगा त्याला पोखरू लागतो.

या तणावात असतानाच वरुण त्याच्या घरी येतो. साहील त्याला घडलेलं सगळं रामायण सांगतो. तेव्हा वरुण त्याला, समीराच्या या गौप्यस्फोटामागचं कारण निव्वळ सूड उगवणं हेच असणार, असं छातीठोकपणे सांगतो. ‘तिचं असं कुठलंही अफेअर असणंच शक्य नाही, केवळ तुझ्यावर सूड उगवण्यासाठी तिने ही बनवलेली ‘गोष्ट’ आहे,’ असं त्याचं म्हणणं असतं. वरुण त्याला हेही सांगतो की, ‘तुला पुरतं घायाळ करण्यासाठी ती आपलं तुझ्या निकटच्या मित्राशीच अफेअर असल्याचं सांगेल; जेणेकरून तुझा चांगलाच धक्का बसावा. पण ते अर्थातच खरं नसेल.’

वरुणच्या या फुंकरीनं साहीलला थोडासा ‘सुकून’ मिळतो.

मात्र..

लेखक तेजस रानडे यांनी ही लफडय़ाची गोष्ट आणि त्यातला नैतिक पेच हास्यस्फोटक प्रसंगांतून छान फुलवत नेला आहे. नवरा-बायकोतल्या संभाषणाचा पहिलाच प्रवेश त्यांच्या परस्परांना घोळात घेण्याच्या खडाखडीत छान रंगत जातो आणि तिथूनच नाटक पकड घेतं. नवऱ्याच्या मित्राच्या- वरुणच्या अध:पतनाबद्दल संतप्त झालेली समीरा त्याला वाचवू पाहणाऱ्या नवऱ्याबद्दलच संशय येऊन, गोड गोड बोलत त्याचं बिंग फोडते. आणि नंतर ‘नवरा-बायकोच्या नात्यात पारदर्शीपणा हवाच,’ असं म्हणत आपलंही असं एक ‘प्रकरण’ झाल्याची कबुली देते. त्यातून जे गुंते निर्माण होतात, ते म्हणजेच ‘तेरी भी चूप’ हे नाटक होय. खरं तर या बीजात नवं काहीच नाहीए. यापूर्वीही या प्रकारची नाटकं येऊन गेली आहेत. गंमत आणि वेगळेपण आहे ते त्याच्या रचनेत आणि हाताळणीत. खरं बोलणं योग्य की अयोग्य, या मुद्दय़ाभोवती नाटक फिरतं. आणि त्याची उकल होताना ‘ज्यानं त्यानं आपल्या परीनं त्यातून जो काही बोध घ्यायचा असेल तो घ्यावा (वा घेऊ नये.)’ या नोटवर ते संपतं. लेखक तेजस रानडे यांनी पात्रांच्या वर्तन-व्यवहारातले तिढे छान गुंफले आहेत. त्यातून एक प्रकारची उत्सुकता, सस्पेन्स निर्माण होतो आणि प्रेक्षक त्यात गुंतत जातो. माणसाच्या नैतिकतेला चिमटीत पकडून (उंदराला मांजरानं शिकार करण्याआधी मानगुटीला धरून उचलावं तसं!) त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं करण्याची यातली युगत भन्नाटच आहे.

दिग्दर्शक विजय केंकरे हे विनोदी तसंच सस्पेन्स नाटकांचे हुकमी दिग्दर्शक म्हणून आता सर्वश्रुत झाले आहेत. या दोन्हीची एकत्रित मागणी करणारं हे नाटक त्यामुळे त्यांनी लीलया बसवलं आहे. अचूक पात्रनिवडीनं त्यांचं बरंचसं काम हलकं केलं आहे. क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रियांचा योग्य तो ताळमेळ साधणारे कलाकार यात गरजेचे होते. हृषिकेश जोशी (साहील) आणि प्रियदर्शन जाधव (वरुण) या जात्याच हुशार, तल्लख आणि लवचीक अभिनयात वाकबगार कलावंतांनी हे आव्हान सहजी पेललं आहे. त्यांना फक्त त्यांचा त्यांचा ‘प्रदेश’ (एरिया) काय आहे, एवढंच सांगितलं की काम फत्ते होऊ शकतं. त्याप्रमाणे दिग्दर्शक केंकरे यांनी त्यांच्या हद्दी ठरवून दिल्या आहेत. त्या सीमेत त्यांचा होणारा मुक्त वावर धमाल आणतो. त्यांच्या बायका वेगवेगळ्या वृत्तीच्या दाखवल्या आहेत.  म्हणजे समीरा (मयुरा रानडे) तडकभडक. सत्याची कैवारी. त्यासाठी वाट्टेल त्या परिणामांस सामोरं जायला लागलं तरी चालेल, या मताची. याच्या उलट ऋजुता (सुखदा खांडकेकर)! तिचं म्हणणं.. ज्या सत्याच्या आग्रहानं घरसंसार मोडत असेल त्याचा उच्चारही न केलेला बरा! आता अशा स्त्रीला ‘बाई, तुझा नवरा बाहेरख्याली आहे,’ असं सांगण्यानं काय साध्य होईल? तर ते असो.

संदेश बेंद्रे यांनी साहील-समीराचं मॉडर्न घर उभं केलं आहे. त्यातल्या नाटय़स्थळांसाठी योजलेल्या जागा उन्मेखून लक्ष वेधतात. विशेषत: नाटय़पूर्णतेत भर घालणाऱ्या म्युझिक सिस्टमचं कल्पक उपयोजन खासेच. अजित परब यांचं संगीत आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना नाटकाची मागणी पुरवणारी. मंगल केंकरे यांच्या वेशभूषेतून एक प्रसन्नता डोकावते. संदीप नगरकर-प्रदीप दर्णे यांची रंगभूषा पात्रांना उठाव देणारी आहे.

हृषिकेश जोशी यांनी मनोकायिक व बौद्धिक अभिनयाची मेजवानीच साहीलच्या भूमिकेत दिली आहे. त्यांचं संवादफेकीचं आणि विरामांचं टायमिंग कमाल आहे. साहीलमध्ये ते घुसलेत असंच म्हणायला हवं. प्रियदर्शन जाधव यांनी बेरकी, पण वरकरणी साधेपणाचा आव आणणारा वरुण त्याच्या चालूगिरीसह उत्तम उभा केला आहे. मयुरा रानडे यांनी प्रारंभीची सत्याची आग्रही आणि नंतर नवऱ्याला नैतिक पेचात पकडून त्याला झुलवणारी समीरा यथार्थ आकारली आहे. सुखदा खांडकेकर ऋजुताचं निरागसतेचं बेअरिंग शेवटपर्यंत छान वठवतात. या पात्राला वेगळी छटा नाही, ही संहितेतली मर्यादा होय.

एकुणात, चार घटका हसतखेळत, मजेत घालवायला ‘तेरी भी चूप’ पाहायला हरकत नसावी.