सुहास जोशी

इंटरनेटच्या माध्यमातून मनोरंजनाचे साधन देणारे विदेशातील प्लॅटफॉर्म भारतात आले त्याला आता दोनएक वर्षे झाली. पैसे मोजून केवळ इंटरनेटच्या माध्यमातूनच पाहायला मिळतील अशा भारतीय भाषांमधील मालिकांची निर्मिती होऊ  लागली. परदेशी कंपन्यांबरोबर भारतीय कंपन्यादेखील त्यात उतरल्या. मराठीतही वेबसीरिज, वेबफिल्मदेखील प्रदर्शित झाली. पण या माध्यमाद्वारे प्रेक्षकांना नेमके कसे आकर्षित करायचे याची जाण अगदीच थोडक्याजणांना आली. मराठीत एक चांगली वेबसीरिज प्रदर्शित करणाऱ्या ‘झी ५‘ या प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वी पहिला हिंदीमिश्रित मराठी वेब चित्रपट ‘वीरगती’ प्रदर्शित झाला. तर याच प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्ये काही मालिकादेखील आल्या. पण हे माध्यम नेमके कसे हाताळावे याची पुरेशी जाण या ठिकाणी दिसत नाही. परिणामी एका चित्रपटाच्या कथानाकाला खेचून त्याची मालिका करणे आणि खूप काही सांगतो आहोत या अविर्भावात एखाद्या बोधपटाच्या साच्यातून चित्रपट करणे असेच घडताना दिसते. ‘फायनल कॉल’ ही वेबसीरिज आणि ‘वीरगती’ हा वेबचित्रपट पाहताना हे प्रकर्षांने जाणवते.

‘फायनल कॉल’ ही मालिका एखाद्या हॉलीवूडी चित्रपटासारखी बेतलेली आहे. आकाशातील थरार अशा यादीत विमानातील अपहरणनाटय़ वगैरे बाबींचा भरणा असतो. त्यातील एक वेगळा मार्ग येथे चोखाळला आहे. भारतीय हवाई दलातील नोकरी सोडून प्रवासी विमानाचे सारथ्य करणारा पायलट हा या कथेचा नायक आहे. हवाई दलातील एका मोहिमेदरम्यान निवासी वस्तीवर टाकाव्या लागलेल्या बॉम्बमुळे तो प्रचंड अस्वस्थ होतो आणि ती नोकरी सोडतो. त्याच्या एकूणच ढळलेल्या मानसिक संतुलनामुळे तो स्वत:चे आयुष्य विमान उडवत असतानाच संपवण्याची योजना आखतो. पण त्या योजनेप्रमाणे कथानक पुढे जात नाही. त्यातून अनेक अनपेक्षित घटना घडतात आणि हे सारे प्रकरण वेगळ्याच वळणावर जाते. अर्थात ही कथा केवळ पायलटपुरतीच मर्यादित न राहता विमानातील इतर प्रवाशांच्या आयुष्यातदेखील डोकावते. सुटलेले अनेक धागे एकत्र जोडण्याचा प्रयत्न करते.

विषय म्हणून हे कथानक जरा पठडीबाहेरचे असले तरी त्यात पुरेसा रंजकपणा नाही. त्यामुळे ही कथा पकडच घेत नाही. नेहमीच्या २५-३० मिनिटांपेक्षा यातील भाग मोठय़ा कालावधीचे असले तरी कथा विमानाप्रमाणेच असंख्य हेलकावे खात राहते. आणि हे हेलकावे खूपच विसंगत असल्याने कथेतील विमानाप्रमाणेच कथादेखील भरकटत जाते. मुख्य पात्राच्या कथानकांतर्गत अनेक कथा घुसडल्या जातात तेव्हा त्यामध्ये एक सुसूत्रता अपेक्षित असते. तिचा येथे पूर्णपणे अभाव आहे. जरा काही तरी वेगळे पाहतोय असे वाटेपर्यंत पुन्हा कथेची दिशा बदलते. या सर्वातून कथेवरची पकड ढिली होत जाते. एका व्यक्तीच्या कथेत अनेक कथानकांना वाव देणे हा प्रयोग म्हणून चांगला असला तरी त्यातून प्रेक्षकाला गुंगवून ठेवण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. त्यात ही सीरिज कमी पडते. त्यात पुन्हा अनेक ठिकाणी टिपिकल मालिका लुक देण्याची पठडीबाज सवय सीरिजकर्त्यांना टाळणे कठीण गेल्याचे दिसून येते. एक मात्र निश्चित की प्रत्यक्ष विमान प्रवासाचे वातावरण उभे करण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. पण त्यातदेखील अनेक गोष्टी केवळ कागदावर मांडून व्याप्ती किती मोठी आहे असे प्रतीत करण्याचा प्रयत्न होतो. येथे ‘फायनल कॉल’ ही वेबसीरिज चांगलीच गडबडते.

अर्थात टीव्हीवरील घरगुती भांडणावर आधारलेल्या मालिकांच्या बाहेर जात काही तरी मांडायचा ही वेबसीरिज प्रयत्न करते इतकेच समाधान म्हणता येईल. पण याच प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला ‘वीरगती’ हा पहिलावाहिला मराठी-हिंदी वेब चित्रपट मात्र पूर्णत: गडबडलेला आहे. काश्मीरमधील सीमावर्ती भागातील एका मराठी लष्करी अधिकाऱ्याची ही कथा आहे. अगदीची छोटी, तासभरात संपणारी. संपूर्ण चित्रपटातून लेखकाला खूप साऱ्या गोष्टींवर भाष्य करायचे आहे. काश्मिरी तरुणांची मानसिकता, सैनिकांच्या घरातल्यांची मानसिकता हे मांडताना इतक्या मुद्दय़ांचा भरणा केला आहे की आपण अनेक तुकडे पाहतोय हेच जाणवत राहतं. कथा सांगण्याचा सारा भर हा चित्रपटापेक्षा काही तरी बोधपर सांगणाऱ्या सरकारी बोधपटासारखा आहे. किंबहुना सिनेमाकर्त्यांना बोधपटच करायचा होता की काय असे एकूणच हे सर्व पाहून वाटू लागते.

वेब आधारित मनोरंजनाचे क्षेत्र हे सध्या अत्यंत वेगाने धावू लागले आहे. पण एकमेकांच्या स्पर्धेत केवळ आकडेवारीचीच स्पर्धा करायची असेल तर आशयाला तिलांजली दिली तरी हरकत नाही असं काहीसं वातावरण सध्या या क्षेत्रात दिसून येत आहे. अर्थात अशी आकडेवारी म्हणजे केवळ सूज असते हे लवकर कळणे आणि आशयाला प्राधान्य देत निर्मिती होणे महत्त्वाचे आहे.