नाटक-चित्रपट या माध्यमात आपल्या वेगळ्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता अगाथा ख्रिस्तीची कथा असलेल्या ‘द मिरर क्रॅक्ड’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मेली स्टीलचे दिग्दर्शन असलेल्या या नाटकात मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ममता ही भूमिका साकारते आहे. या पाश्र्वभूमीवर ती प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक करते आहे. वेल्स मिलेनियम सेंटर आणि विल्टशायर क्रिएटिव्ह यांची निर्मिती असलेल्या ‘द मिरर क्रॅक्ड’ या नाटकात सुहास आहुजा, झेरवान बुनशाह, शेरनाझ पटेल, झिनीया रांजी यांची प्रमुख भूमिका  आहे. यानिमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीशी केलेली बातचीत..

‘दमिरर क्रॅक्ड’ हे अगाथा ख्रिस्तीचे नाटक असून याचे आधी इंग्लंडमध्ये सादरीकरण झाले आहे. मागच्या वर्षी या नाटकासाठी कलाकारांची निवड चाचणी घेण्यात आली होती. एका वर्षांपासून या नाटकाच्या तालमी चालू आहेत. या नाटकानिमित्ताने मला दिग्दर्शिका आणि विदेशी तंत्रज्ञानाची प्रशंसा करावीशी वाटते. मी इंडो – फ्रेंच, इंडो-इटालियन आणि अमेरिकन चित्रपट केले असून नाटक प्रथमच करते आहे, असे ती म्हणते. रंगभूमीवर प्रयोग करण्यास सोनाली सज्ज झाली असून तिचे सर्वोत्तम देण्यास ती तयार आहे. या नाटकाविषयी विस्ताराने बोलताना ती सांगते, मरिना ग्रेड हे या मूळ नाटकातील व्यक्तिरेखेचे नाव आहे. मरिनाचे भारतीय शैलीत रूपांतरण करताना तिला ममता हे नाव देण्यात आले आहे. ममता एक प्रथितयश अभिनेत्री असून तिचा स्वभाव, बोलण्याची पद्धत लोकांना भुरळ पाडणारे त्याच वेळेस हवेहवेसे वाटणारे आहे. अगाथा ख्रिस्तीचे नाटक म्हणजे मृत्यूबाबत गूढपणा कायम ठेवून कथा गुंफण्यात आली आहे. या व्यक्तिरेखेच्या विविधांगी छटा यात पहायला मिळतात. तिच्या आयुष्यात एक घटना घडते ती प्रेक्षकांना नाटक पाहिल्यावरच समजेल.

माझ्या दिग्दर्शिका मेली स्टील सोबत मेहेर आचारिया, अवंतिका आकेरकर, डेन्झील स्मिथ, शेरनाझ पटेल यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना वेगळीच मजा येते आहे. इंग्रजी नाटकाचे भारतीय शैलीत रूपांतरण करताना कोणती काळजी घ्यायची याची मला जाणीव नाही. कारण अशा प्रकारचे नाटक करण्याची माझी पहिलीच वेळ आहे. आजमितीस पु. ल. देशपांडेंनी अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आणली आहेत. प्रेक्षकांना हे इतर भाषेतील नाटक असल्याचे कळत नाही. यात लेखक आणि दिग्दर्शकाचाही तेवढाच हातखंडा असावा लागतो, असे सोनाली म्हणते. शांता शेळकेंची ‘चौघीजणी’ ही कादंबरी रूपांतरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. लुईसा अ‍ॅल्कॉट या अमेरिकन लेखिकेने ‘लिटील वुमेन’ ही कादंबरी लिहिली. यातील मेग, ज्यो, बेथ आणि एॅमी यांची नावे, सण तसेच ठेवण्यात आले आहेत. पुस्तकाचा अनुवाद सुंदररित्या केला आहे की वाचकांना ती कथा आपलीच वाटते, असे सोनाली सांगते.

ममताच्या भूमिकेसाठी कलाकारांची कार्यशाळा घेण्यात आली. कोणतीही कलाकृती करताना कलाकाराने निरोगी असले पाहिजे. यासाठी नाटकातील कलाकारांचे दररोज शारीरिक प्रशिक्षण घेण्यात येत होते. याचबरोबर संवाद प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी संवादफेक, उच्चार यावर काम करण्यात आले. साधारणपणे नाटकाच्या तालमीला आल्यावर संहितेचे वाचन केले जाते. मी ज्या कलाकारांसोबत काम करते आहे ते इंग्रजी रंगभूमीवरील दिग्गज कलाकार आहेत. विदेशी तंत्रज्ञांसोबत काम करताना कलाकाराला नवीन शिकायला मिळते. याबद्दल ‘द मिरर क्रॅक्ड’ या नाटकाची दिग्दर्शिका मेली स्टील हिचे कौतुक करावे तेवढे कमीच. तिच्या दोन महिन्यांच्या वास्तव्यात तिने एकदाही तक्रार केली नाही, असा अनुभवही तिने सांगितला. मुंबईतील गर्दी, प्रदूषण, बदलते हवामान, आणि जेवण या गोष्टींविषयी मेली स्टील हिने कधी कुरकुर केल्याचे ऐकिवात नाही. सर्वसामान्य माणसाला सवयीच्या गोष्टी नसल्यास अस्वस्थ व्हायला होते. परंतु तिने समस्यांविषयी हू का चूही केले नाही. तिची ही गोष्ट शिकण्यासारखी आहे, असे सांगत नाटक दिग्दर्शित करण्याच्या तिच्या हातोटीबद्दलही सोनालीने कौतुक केले.

‘मला न्याय हवा’, ‘सखाराम बाइंडर’, ‘आम्ही खरंच निष्पाप होतो’, ‘व्हाइट लिली नाइट रायडर’ ही नाटके करणाऱ्या सोनालीसारख्या चतुरस्र अभिनेत्रीला रंगभूमी नेहमीच खुणावते. पाच वर्षांपूर्वी ‘व्हाइट लिली नाइट रायडर’ नावाच्या नाटकाची निर्मिती आणि अभिनयही केला होता. प्रेक्षकांना हे नाटक आवडले होते. ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रात मी यावर लेखही लिहिला होता. नंतर ‘गर्दिश के तारे’ हे नाटकही केले. दहा वर्षांपूर्वी ‘अ‍ॅन अ‍ॅक्टर डाइज पार्ट’ या नावाने मी आणि सत्यजित दुबे यांनी नाटक केले. दुबेजी आजारी पडल्याने या नाटकाचे कमी प्रयोग झाले, अशी माहिती तिने दिली. हे नाटक स्वीकारण्यामागे माझी दोन कारणे होती. पहिले हे नाटक इंग्लिशमध्ये आहे आणि दुसरे कारण म्हणजे परदेशी दिग्दर्शिका होय. मला सतत विविध प्रयोग करायला आवडते. मी मराठी आणि हिंदी प्रेक्षकांशी संवाद साधू शकते, परंतु इंग्रजी भाषेत करण्याचे माझ्यासमोर आव्हान आहे. हे जागतिक स्तरावरील असल्याने नाटक लगेच स्वीकारले, असेही तिने सांगितले.

नवीन वर्षांला काहीतरी नवीन तंत्रज्ञान येणारच, त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर ही काही नवीन गोष्ट नाही. नाटकात रंगमंचीय अवकाश उभे करताना तंत्रज्ञानास शरण जायचे, की त्यांच्याशी खेळत रंगमंचीय आविष्कार निर्माण करायचा हे महत्त्वाचे आहे. नाटकात नवीन पिढी येत राहाणार. त्यांच्यातील निरागसता, काम करण्याची ऊर्जा, नवीन प्रयोग करण्याची धडपड मला प्रेरणा देत असल्याचे सोनाली कुलकर्णीने सांगितले. तंत्रज्ञानालाही एक ऊर्जा असते. त्याचा योग्य रितीने उपयोग केल्यास संहिता खुलत जाते. तंत्रज्ञानाचा वापर हा माणसाच्या हातात आहे, असेही तिने नमूद केले.

काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेने नाटय़गृहात जॅमर लावण्याचा निर्णय घेतला. यामुळे नाटक चालू असताना कोणाशीही संपर्क साधता येणार नाही. सरकारी कार्यालय, दवाखाना, नाटय़गृहे येथे लोकांनी फोन बंद ठेवायला पाहिजे. कारण मोबाइलच्या आवाजाने दुसऱ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. नाटकादरम्यान मोबाइल वाजल्यास दर्जेदार कलाकृतीचा रसभंग होऊ शकतो. नागरिकांना समाजभान असणे गरजेचे आहे, कारण सार्वजनिक जागेत मोठय़ा आवाजात बोलू नये असे नियम नागरिकांना सक्ती केल्याशिवाय समजत नाही. महापालिकेचा या निर्णयाचे मी स्वागत करते. फक्त नाटकाच्या वेळी नाही तर राष्ट्रगीत सुरू आहे अथवा शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत मोबाइल वाजल्यास अडथळा नर्माण होतो. या निर्णयामुळे प्रेक्षकांना मोबाइल बंद ठेवण्याची सवय लागेल, असे ती म्हणते.

डिसेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे निवेदन सोनाली कुलकर्णी आणि दिव्या दत्ता यांनी केले. सोनाली या अनुभवाबद्दल सांगते, माझ्या अनेक चित्रपटांना सुवर्णकमळ आणि अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत. देशातील चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकारांचा हा एक गुणगौरव सोहळा असतो. विज्ञान भवनात राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट पुरस्कार सोहळ्यात निवेदन करण्याचा मान वेगळाच असतो. बाकीचे पुरस्कार सोहळे एकीकडे आणि दुसरीकडे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा. निवेदक म्हणून मराठी कलाकारांचे नाव उच्चारताना माझी छाती गर्वाने फुलून गेली. याचे दुसरे एक वैशिष्टय़ म्हणजे हे सोहळे वेळेवर सुरू होतात ही गोष्ट मला जास्त आवडते, असे ती सांगते.

सावित्रीबाईंनी लावलेली चिरी हे साक्षरतेचे प्रतीक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘सावित्री उत्सव’ ही संकल्पना सुरू केली. अलीकडे अनेक गोष्टींचा इव्हेंट केला जातो आहे. व्हॅलेंटाइन, थँक्सगिव्हिंग हे दिवस आपण उत्साहाने साजरा करतो. लहान मुलांमुळे अनेक गोष्टींची मला नव्याने माहिती मिळाली. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी सामाजिक व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील सहकाऱ्यांच्या चर्चेतून सावित्री उत्सवाची कल्पना सुचल्याचे सोनालीने सांगितले. मी ही संकल्पना मांडल्यावर अनेकांनी ही उचलून धरली होती. सावित्रीबाईंनी कपाळावर लावलेली चिरी हे केवळ कुंकू नसून शब्दांवर मारलेली रेघ आहे, असे मला वाटते. चिरी हे साक्षरता आणि शिक्षणाचे प्रतीक आहे. माझ्या एका छोटय़ा प्रयत्नातही मोठा अर्थ सामावलेला आहे. या संकल्पनेमुळे आजच्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व कळेल. याद्वारे सावित्रीबाईंचे कार्य जपण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सोनालीने सांगितले.

शारीरिक तंदुरुस्तीसोबतच सोनाली दिसण्यालाही तेवढेच महत्त्व देते. साडी हे तिचा आवडता पेहराव असून त्यामुळे स्त्रीचे सौंदर्य अधिकच खुलते असे तिला वाटते. ‘मिशन काश्मीर’ चित्रपटाच्या रेड कार्पेटवर मी साडी वापरली होती. वेशभूषेमध्ये साडी हे माझे पहिले प्रेम आहे. कोठेही कार्यक्रम असल्यास मी साडी वापरण्याला प्राधान्य देते. गेल्या काही वर्षांत फॅशन जगतात बरेच ट्रेण्ड येत आहेत. यानिमित्ताने जुनी फॅशन नव्याने रुजताना दिसत असल्याचे निरीक्षणही सोनाली नोंदवते. पूर्वी चित्रपट क्षेत्र सोडल्यास इतर लोकांमध्ये दिसण्याला महत्त्व नव्हते. परंतु आता एक सर्वसामान्य मुलीपासून ते सेलिब्रिटीपर्यंत फॅशनविषयी जागरूकता दिसूत येते. फक्त मुलीच नाही तर मुलेही चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चांगले दिसणे ही फक्त अभिनेत्यांची मक्तेदारी राहिली नाही. प्रत्येक माणूस हा सुंदर असून त्याला चांगले दिसण्याचा अधिकार असल्याचे सोनालीला वाटते. माणसाच्या एकंदर व्यक्तिमत्त्वात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मोलाची भूमिका बजावते. सोनाली तिच्या सदरातून तसेच समाजमाध्यमावरही मानसिक संतुलनावर लिहिती आणि बोलती झाली आहे. देशात मानसिक स्वास्थ्य हा दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. मानसिक संतुलनाची शेवटची स्थिती आल्यास समुपदेशन घेतले जाते. मी अनेक छोटय़ा गोष्टीसाठी समुपदेशकाची मदत घेतली होती. वेळेचे नियोजन कसे करावे यासाठी समुपदेशकाचा सल्ला घेतला होता. आजच्या काळात नातेसंबंध, अपेक्षा पूर्ण न झाल्याने अथवा अपेक्षित यश न मिळाल्याने मन दुखावले जाते. मनातले सांगण्यासाठी नातेवाईकांकडे पुरेसा वेळ असेलच असे नाही. तेव्हा समुपदेशकाची गरज भासते असा सल्लाही सोनाली देते. या धावपळीच्या जगात छोटय़ा गोष्टींमुळे नैराश्य येते. यासाठी मानसिक संतुलन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी जीवनाच्या विविध टप्प्यावर समुपदेशनाची मदत घेतल्यावर स्वत:ला नव्याने उमगले. माझा स्वत:कडे पाहण्याच्या दृष्टीत बदल झाला असल्याचे मत तिने व्यक्त केले.