रेश्मा राईकवार

ऑस्कर पुरस्कारांना जगभरातून महत्त्व का आहे हे सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून सहज लक्षात यावं. सिनेमा आणि राजकारण किंवा सिनेमावरून जेव्हा राजकारणाचा कलगीतुरा रंगतो आणि अमुक एखाद्या सिनेमाचा समाजावर काय-कशा पद्धतीने परिणाम होतो आहे, याविषयी हवेत तीर मारले जातात. तेव्हा जगभर त्यावर चवीने चर्चा होते आणि चित्रपट जर ऑस्कर पुरस्कार विजेता असेल तर बघायलाच नको! ऑस्कर सोहळा संपन्न होऊन दोन आठवडे झाले तरी ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या आणि कलाकारांच्या चर्चा थांबायचे नाव घेत नाही आहेत. त्यात ‘पॅरासाइट’ला मिळालेला पुरस्कार अनेकांना सुखावून गेला असला तरी तो काहींना खटकलाही आहे. आणि हे खटकणं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर बोलून दाखवलं आहे. ट्रम्प यांनी ‘पॅरासाइट’वरून केलेल्या विधानांचा सध्या समाजमाध्यमांवरून खरपूस समाचार घेतला जातो आहे. हॉलीवूड पलीकडच्या भाषेतला ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला चित्रपट म्हणून ‘पॅरासाइट’ची ऐतिहासिक नोंद झाली असली तरी ट्रम्प यांनी मात्र या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कोलोरॅडो येथील प्रचारसभेत त्यांनी यावर्षीचे ऑस्कर पुरस्कार किती वाईट होते, याची जाहीर चर्चा केली ओ. दक्षिण कोरियाशी व्यापारावरून आधीच अनेक अडचणी आहेत. त्यात आपण काय केलं तर.. यावर्षीचा सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार त्यांना देऊन टाकला, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर त्यांना हॉलीवूडी चित्रपटांच्या तथाकथित सुवर्णकाळाचीही आठवण झाली. ‘गॉन विथ द विंड’सारखे चित्रपट कुठे गेले? असे चित्रपट पुन्हा यायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावरून एकच हलकल्लोळ माजला आहे. ‘पॅरासाइट’ चित्रपट काय आहे हे ट्रम्पना क धीच कळू शकणार नाही, कारण त्यांना वाचताच येत नाही, अशा प्रकारच्या खोचक टीका त्यांच्यावर करण्यात येत आहेत.  याचा त्यांच्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता नसली तरी सिनेमावरून केलं जाणारं राजकारण किती वाईट असतं, याची प्रचीती जगभरच्या सिनेप्रेमींनी निश्चितच घेतली आहे.