News Flash

ऐतिहासिक चित्रपटांचे पर्व

येत्या काळात अंदाजे १३ ऐतिहासिक मराठी चित्रपट येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

इतिहासाला नव्या युगाशी, नव्या पिढीशी जोडण्याचे काम ऐतिहासिक चित्रपट करत असतात. कधीतरी त्यातली अतिरंजकता दिशाभूल करते ही बाब तितकीच खरी असली तरी आपल्या जाज्वल्य इतिहासाची पानं त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चाळली जातात हेही लक्षात घेण्यासारखे आहे. जोपर्यंत हा ट्रेंड मर्यादित आहे तोवर प्रेक्षक याचे कौतुक करतीलच, परंतु एकामागोमाग एक असा ऐतिहासिक चित्रपटांचा भरणा झाला तर मात्र प्रेक्षक या चित्रपटांना स्वीकारतील का, स्वीकारले तर त्यातले आडाखे काय असतील असा सगळाच प्रश्नजाल सध्या चित्रपटांच्या नगरीत डोकावत आहे. अर्थात याचं कारणही तसंच आहे.

पद्मावत, बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका, पानिपत, हिरकणी, फर्जंद, फत्तेशिकस्त, तान्हाजी या चित्रपटांनंतर येत्या काळात अंदाजे १३ ऐतिहासिक मराठी चित्रपट येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. रितेश देशमुख निर्मित आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित शिवचरित्रावर आधारित तीन चित्रपट येणार आहेत. दिगपाल लांजेकर याचा ‘जंगजौहर’ हा तिसरा इतिहासपट येणार असून अजून दोन चित्रपट तो करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे ‘पावनखिंड’ साकारणार आहेत तर खासदार अमोल कोल्हे ‘शिवप्रताप’ या नावाअंतर्गत ‘वाघनख’, ‘वचपा’ आणि ‘गरुडझेप’ असे तीन चित्रपट करणार आहेत. दिग्दर्शक राहुल जाधव ‘महाराणी ताराबाई’ यांचा जीवनपट चितारणार असल्याचीही चर्चा आहे. ही चित्रपटांची यादी अगदी थोडक्यात आहे. या यादीपलीकडे अजून बऱ्याच चित्रपटांची भट्टी चित्रसृष्टीत धगधगत आहे.

‘सैराट’नंतर सैराटच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट आले. परंतु एकसुरीपणामुळे प्रेक्षकांनी त्या चित्रपटांना आठ दिवसांतच चित्रपटगृहातून उतरवले. हेच नाही तर अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. मग या घटनांचा विचार करता, हे एकामागोमाग एक येणारे ऐतिहासिक चित्रपट लोक कसे स्वीकारतील ही चिंतेची बाब आहे. याविषयी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे सांगतात, इतिहास जाणून घ्यावा तेवढा कमीच आहे. आपला इतिहास इतक्या प्रेरणादायी घटनांनी भरला आहे की यावर तेरा काय एकशे तीस सिनेमे तयार होतील.  महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता हे तेरा चित्रपट काहीच नाही, कारण इथला तीन ते चार टक्के प्रेक्षकच चित्रपट पाहतो. पण जर त्याची मार्मिक मांडणी झाली नाही तर तीन हजार चित्रपटही फोल ठरतील. तर या ट्रेंडविषयी ते म्हणतात, एक चित्रपट चालला म्हणून आपणही चित्रपट करू या आशेने कुणी स्पर्धा म्हणून चित्रपट करत असेल तर ते लोकांच्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही. आपला प्रेक्षक तितका सुजाण आहे. त्यामुळे सगळेच चित्रपट सुपरहिट होतील असे नाही. चित्रपटाची नावं जाहीर झाली म्हणजे चित्रपट डोळ्यांपुढे येत नाही. त्याची बांधणी, निर्मिती, प्रकाशन, प्रसिद्धी या सगळ्याच गोष्टी चित्रपटाच्या यशात महत्त्वाची कामगिरी बाजवतात. पण एवढय़ा मोठय़ा संख्येने जर चांगले आणि अभ्यासपूर्ण चित्रपट येत असतील तर ती आनंदाची बाब आहे. पण ते करताना नट, निर्माते, दिग्दर्शकांनी इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि अर्थात ती भव्यता जपणेही अनिवार्य असल्याचे ते सांगतात.

‘इतिहासपटांचे वारे हे आजचे नाही. महाराजांवर अनेक नाटक, सिनेमे आले आहेत. फक्त त्या इतिहासाचे महत्त्व लोकांना प्रकर्षांने जाणवू लागले आहे,’ असे इतिहास अभ्यासक प्रताप गंगावणे सांगतात. त्यांच्या मते,  चित्रपट कितीही यावेत. महाराजांचा इतिहास पोहोचवायला ते कमीच पडतील. परंतु ते मांडत असताना हल्ली हॉलीवूडच्या ‘स्टंट स्टाइल’ आपल्या इतिहासाला जोडून अतिरंजकता आणली जाते त्यामुळे इतिहास कलुषित होतो. याचे भान मात्र प्रत्येक दिग्दर्शकाने बाळगायला हवे. इतिहास समजून घेणे आज गरजेचे आहे, पण तो मांडणाऱ्यांनी आधी समजून घ्यायला हवा. इतिहासात घडणारी लावणी वेगळी होती, तिचे स्वरूप शृंगार वेगळा होता, पण इतिहासपटात आताची लावणी येते कुठून. कारण आपला अभ्यास कमी पडतोय. इतिहासातल्या प्रत्येक गोष्टीला एक महत्त्व आहे. महाराज घोडय़ावर कसे बसायचे, भाषा कशी होती,  कोणत्या प्रांतात काय घडामोडी घडल्या, तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा झालेला परिणाम या आणि अशा अनेक सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास यात आहे. या चित्रपटांनंतर एकसुरीपणा येईल यात शंका नाही. पण प्रत्येक निर्मात्याची आणि दिगदर्शकाची ती कथा सांगण्याची पद्धत वेगळी असल्याने प्रत्येक सिनेमा हा वेगळा असेल, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 3:26 am

Web Title: article on upcoming historic movies abn 97
Next Stories
1 पाहुणे असंख्य पोसते मराठी
2 रणबीरच्या प्रेमात!
3 नाट्यरंग : ‘भूमिकन्या सीता’ शोषितेचं आक्रंदन
Just Now!
X