हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकार अनुभवी असो, नवोदित असो, तरुण असो वा ज्येष्ठ असो.. प्रत्येकाला कायम संघर्ष करत राहावा लागतो, असं अनुभवी मत अभिनेत्री नीना गुप्ता यांनी मांडलं. मला काम करायचे आहे, अशी पोस्ट टाकत आपल्यासाठी काम खेचून आणणाऱ्या नीना गुप्ता गेल्या काही वर्षांत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या या जाहीर पोस्टनंतर त्यांना खरोखरच कामे मिळत गेली आणि त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या अभिनेत्रीला ‘बधाई हो’, ‘पंगा’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’सारख्या चित्रपटांमधून हटके  भूमिका करताना पाहता आले. सध्या नीना गुप्ता आणि त्यांची फॅशन डिझायनर कन्या मसाबा ‘नेटफ्लिक्स’वर आधारित ‘मसाबा मसाबा’ या वेबमालिके तून प्रेक्षकांसमोर आले आहेत.

ऐंशीच्या दशकात ‘जाने भी दो यारो’, ‘त्रिकाल’, ‘मंडी’, ‘उत्सव’सारख्या समांतर चित्रपटांतून काम केलेल्या नीना गुप्ता त्या काळात मुख्य धारेतील चित्रपटांतून कधीच प्रेक्षकांसमोर आल्या नाहीत. त्यासाठी त्या स्वत:लाच दोषी ठरवतात. त्यानंतर छोटय़ा पडद्यावरही ‘साँस’ आणि ‘सिसकी’सारख्या चांगल्या मालिका दिल्यानंतर त्या पुन्हा गायब झाल्या. मात्र त्या वेळी पैसे कमावण्यासाठी काम करायची इच्छा नव्हती. लग्न झाल्यानंतर मला शांतपणे जगायचं होतं, आयुष्य अनुभवायचं होतं, त्यामुळे मधल्या काळात तब्बल दहा वर्ष मी मालिका-चित्रपटांपासून जाणीवपूर्वक दूर राहिले, असं त्या सांगतात. मात्र या काळात एक कलाकार म्हणून स्वत:साठी काम करायला हवं आहे, याची तीव्रतेने जाणीव झाल्याचं त्या सांगतात. आपल्याला काम करायला हवं, ही इच्छा सतत मनात डोकावत राहिली आणि म्हणून मी २०१७ साली समाजमाध्यमांवर मला काम हवं आहे, अशा अर्थाची पोस्ट टाकली होती. त्या वेळी इतकी वर्ष लांब राहिल्यानंतर आता तुला पुन्हा काम का करायचं आहे, अशी विचारणाही पतीकडून झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्या वेळी आपल्याला काम करायला हवं यावर आपण ठाम होतो, असं त्या सांगतात.

हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांना संघर्ष नवीन नाही. एखादा आघाडीचा कलाकार असला तरी किंवा एखादा फारसा प्रसिद्ध नसलेला कलाकार असला तरी त्यांच्यासाठी संघर्ष कधीच संपत नाही. त्यांचा संघर्षही थोडय़ाफार प्रमाणात सारखाच असतो, असं त्या सांगतात. तुमचा एखादा चित्रपट हिट झाला, की पुढची एक-दोन वर्ष तुम्ही प्रसिद्धीच्या वलयात असता, पण त्यानंतर काय, असा प्रश्नही त्या करतात. इथे प्रत्येक कलाकाराला काम मागून घ्यावं लागतं. त्यांनी जेव्हा कामाची मागणी केली तेव्हा अनुभव सिन्हांचा ‘मुल्क’सारखा चांगला चित्रपट त्यांना मिळाला. पाठोपाठ त्यांनी ‘शुभमंगल ज्यादा सावधान’सारखा हिट आणि वेगळ्या विषयावरचा चित्रपट केला; पण प्रत्येक कलाकार काम मागून घेत नाही, असं त्या सांगतात. मी अनेक असे प्रसिद्ध कलाकार पाहिले आहेत, ज्यांना अचानक काम मिळेनासं होतं. त्यांच्यापैकी काही जण स्वत:हून काम मागून घेतात, जे काम मागत नाहीत ते काही काळातच या इंडस्ट्रीतून लुप्त होतात. संघर्षांचं हे स्वरूप कित्येक वर्ष कायम आहे, असं त्या सांगतात.

‘मसाबा मसाबा’ हा त्यांच्यासाठी फार वेगळा अनुभव आहे. अश्विनी यार्दी यांची निर्मिती असलेली ही मालिका एका अर्थी या मायलेकींच्या वास्तव आयुष्यापासून प्रेरणा घेऊन बनवली आहे, मात्र अर्थातच वास्तव घटनांना काल्पनिकतेची जोड देत ही वेबमालिका तयार करण्यात आली आहे. यात नीना गुप्ता आणि खुद्द मसाबाने काम केलं आहे. मसाबा पहिल्यांदाच अभिनय करणार असल्याने थोडी धाकधूक वाटत होती, पण सेटवर ती ज्या आत्मविश्वासाने वावरली ते पाहून आपली भीती दूर पळाली, असं त्या सांगतात. नीना आणि मसाबा या दोघींचेही आयुष्य साधेसरळ रेषेतील नव्हते. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब या मालिके तही उमटणं साहजिक आहे; पण या मालिके चे कथालेखन सुरू असताना लेखिका-दिग्दर्शिका सोनम नायर यांना आमच्या आयुष्यातील सगळे सुखदु:खाचे प्रसंग हातचे न राखता ऐकवल्याचे त्या सांगतात; पण तरीही कु ठल्या गोष्टी उलगडाव्यात आणि कुठल्या गोष्टींची मूठ झाकली ठेवावी, याचा पूर्ण विचार करूनच लेखन करण्यात आले, असं त्या सांगतात. अगदी पटकथा हातात आल्यानंतर एखादी व्यक्तिरेखा फार टोकाची वाटते आहे हे लक्षात आल्यानंतर लेखिके शी चर्चा करून त्यात फे रफार करण्यात आले, असं त्या सांगतात. ही वेबमालिका विनोदी आहे खरी, परंतु कोणावर विनोद करतानाही आपण आपली पायरी सोडून वागू नये हे आपलं स्पष्ट मत असल्याचं त्या सांगतात. त्यामुळे कोणालाही न दुखावता तरी फॅ शन आणि चित्रपटसृष्टीतील व्यवहार, जीवन यांची झलक पाहायला मिळेल अशा पद्धतीने ही मालिका लोकांसमोर आणली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची ‘मसाबा मसाबा’ ही वेबमालिका २८ ऑगस्टपासून ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे.