रेश्मा राईकवार

करोनामुळे सगळंच दैनंदिन जीवन ठप्प झालं आणि टाळेबंदीत भांडी घासण्यापासून ते वेगवेगळ्या पाककृती, व्यायाम, पुस्तकवाचन, कुटुंबाबरोबर वेळ घालवणे अशा सगळ्या एरव्हीच्या धावपळीत सहजी करता न येणाऱ्या गोष्टींमध्ये बॉलीवूडच्या कलाकारांनी मन रमवलं. टाळेबंदी नसती तर जे कलाकार त्यांच्या चित्रपटांमुळे आज चर्चेत असते, ते सध्या टाळेबंदीचे नियम शिथिल होऊ लागल्यानंतर नेमकं काय करत आहेत? चित्रीकरण पूर्ण जोमाने अजून सुरू झालं नसलं तरी अनेक कलाकार मंडळी त्यांच्या अर्धवट राहिलेल्या किंवा आगामी चित्रपटांच्या तयारीला लागल्याचं दिसून येतं आहे..

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘खान’ मंडळी काय करत आहेत, हे लक्षात घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यातही बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूखचं सध्या काय सुरू आहे, याची त्याच्या चाहत्यांना भलतीच उत्सुकता आहे. त्याला कारणही तसंच आहे. ‘झिरो’च्या अपयशानंतर गेली दोन वर्ष चित्रपटांपासून सुट्टी घेतलेल्या शाहरूख खानसाठी हे वर्ष पुनरागमनाचं ठरणार होतं. त्यासाठी तो कोणता चित्रपट स्वीकारणार, याची चर्चा सुरू असतानाच टाळेबंदी झाली आणि सगळ्यालाच विराम लागला. मात्र ही सुट्टी खऱ्या अर्थाने शाहरूखने सत्कारणी लावल्याचं बोललं जातं आहे. टाळेबंदीच्या या काळात त्याच्या रेड चिलीज या निर्मितीसंस्थेचे काम थांबले नव्हते. मे महिन्यात त्याची निर्मिती असलेली ‘बेताल’ ही वेबमालिका प्रदर्शित झाली होती. आता ‘क्लास ऑफ ८३’ ही बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेली वेबमालिका या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चार महिन्यांमध्ये त्याने अठरा पटकथा ऐकल्या आहेत. राजकु मार हिरानी, सिद्धार्थ आनंद, तिग्मांशू धुलिया, अमित शर्मा, मधुर भांडारकर, शिमित अमिन, अली अब्बास जफर अशा नामांकित दिग्दर्शकांकडून त्याने पटकथा ऐकल्या आहेत. त्यापैकी हिरानी आणि सिद्धार्थ आनंद यांच्या चित्रपटांना त्याने होकार दिला आहे. हिरानींच्या चित्रपटातून पुनरागमन करण्याचा त्याचा मानस होता, मात्र अजून हिरानींचे पटकथालेखनच पूर्ण झाले नसल्याने तो चित्रपट पुढे ढकलला गेला आहे. त्याऐवजी सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठान’च्या चित्रीकरणाला नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दीपिका पदुकोणही या चित्रपटात मुख्य भूमिके त असून सध्या या चित्रपटाची ऑनलाइन पूर्वतयारी जोरात सुरू असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, शाहरूखचीच निर्मिती असलेल्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटाचे चित्रीकरणही या वर्षी सुरू होणार होते. अभिषेक बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून त्याचेही चित्रीकरण आता पुढच्या वर्षी सुरू होणार आहे.

टाळेबंदीच्या काळात आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन पनवेलच्या फार्म हाऊसवरच तळ ठोकलेल्या सलमाननेही या टाळेबंदीच्या काळात चित्रपटाच्या चित्रीकरणाची तहान गाण्यांच्या चित्रीकरणावर भागवली आहे. या काळात सलमानने चार गाणी गायली आहेत. जॅकलिन फर्नाडिसबरोबर एका गाण्याचे चित्रीकरण करून ते प्रदर्शितही करण्यात आले आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गाणेही त्याने गायले आहे. अथक प्रयत्न करूनही सलमानला या ईदला चाहत्यांना कु ठलाही चित्रपट भेट देता आला नाही. ‘राधे’ या चित्रपटाचे चित्रीकरण बाकी असल्याने त्याची तयारीही सलमानने सुरू के ली होती, मात्र सध्याच्या परिस्थितीत चित्रीकरण शक्य नसल्याने ‘राधे’ मागेच राहिला असून त्याची जागा ‘बिग बॉस’ने घेतली आहे. या शोचे प्रोमोज सलमानने नुकतेच पनवेलमध्येच चित्रित के ले. सलमानसाठी आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या ‘किक २’साठी तो धडपडत होता, त्याचीही पटकथा निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांनी पूर्ण के ली असून त्याच्याही तयारीला या वर्षांखेरीस सुरुवात होणार आहे. या तिन्ही खानांमध्ये आता या क्षणी चित्रीकरणात व्यग्र आहे तो म्हणजे आमिर खान. टॉम हँक्स अभिनीत ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलीवूडपटाचा हिंदी रिमेक ‘लालसिंह चढ्ढा’चे चित्रीकरणही करोनाकाळात रखडले. त्यात चित्रपटाची नायिका करीना कपूर खान गर्भवती असल्याने या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळे आमिरने दोन-तीन दिवसांपूर्वीच तुर्कीला प्रयाण के ले असून पूर्वतयारीनंतर सप्टेंबरमध्ये करीनाही तिथे जाणार असल्याचं सांगितलं जातं.

टाळेबंदीमुळे अधिकच अडचणीत आलेला आणखी एक कलाकार म्हणजे अभिनेता रणबीर कपूर. २०१८ मध्ये ‘संजू’ प्रदर्शित झाल्यानंतर रणबीरचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सतत रखडतो आहे. या वर्षी तरी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन तो प्रदर्शित होईल अशी अटकळ होती. मात्र करोनामुळे ती योजना सफल झाली नाही. ‘ब्रह्मास्त्र’ रखडेल हे लक्षात आल्यानंतर रणबीरने ‘शमशेरा’चं चित्रीकरण सुरू के लं. हाही चित्रपट पूर्ण झाला असल्याची माहिती चित्रपटाची नायिका वाणी कपूरने दिली होती. प्रत्यक्षात या चित्रपटाचा संजय दत्तवर चित्रित होणारा काही भाग अजूनही बाकी आहे. त्याचं चित्रीकरण या महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा होती; पण आता उपचारानंतरच संजय दत्त उर्वरित चित्रीकरण करणार असल्याने हाही चित्रपट रखडणार आहे. गेली दोन वर्ष ‘ब्रह्मास्त्र’च करण्यात गुंतलेल्या रणबीरची आता घरच्यांनीही तू त्याव्यतिरिक्त काही करतोस की नाही.. अशा शब्दांत खिल्ली उडवायला सुरुवात के ली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ‘ब्रह्मास्त्र’च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याचा निर्णय दिग्दर्शक अयान मुखर्जीने घेतला आहे. दोन पाळ्यांमध्ये चित्रीकरण करून डिसेंबपर्यंत हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्धार अयानने के ला आहे. एकिकडे रणबीरचे चित्रपट रखडले आहेत, तर दुसरीकडे त्याची प्रेयसी अभिनेत्री अलिया भट्टच्या चित्रपटांना मात्र वेग आला आहे. अलियाचा ‘सडक २’ हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होतो आहे. टाळेबंदीआधीच तिच्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. त्याच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. याशिवाय, राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’, करण जोहरचा बहुचर्चित ‘तख्त’ आणि ‘बह्मास्त्र’ अशा लागोपाठ तिच्या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होणार आहे. अलियापाठोपाठ दीपिकाही ‘पठान’च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे, तर अनुष्का शर्मा सध्या अभिनयापेक्षा निर्मितीत जास्त रंगली असल्याची चर्चा आहे. तिच्या निर्मितीसंस्थेखाली कमीत कमी बारा चित्रपट-वेबमालिकांची निर्मिती होणार असल्याची चर्चा आहे.

टाळेबंदी झाली नसती तर हे वर्ष निश्चितपणे अभिनेता रणवीर सिंगसाठी फलदायी ठरलं असतं. ‘सूर्यवंशी’ आणि ‘८३’ हे त्याचे दोन्ही चित्रपट प्रदर्शनाअभावी रखडले आहेत. मात्र दिवाळी आणि नाताळ या दोन सणांच्या मुहूर्तावर दोन्ही रखडलेले चित्रपट प्रदर्शित होऊ शकतील, अर्थात त्यासाठी करोनातून बाहेर पडून चित्रपटगृहं पूर्वपदावर येण्यासाठी थोडी कळ सोसावी लागणार आहे. मात्र यादरम्यान रणवीर शांत बसलेला नाही. करण जोहरच्या ‘तख्त’मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे, पण ऐतिहासिक चित्रपट असल्याने त्याची घाई न करता त्याआधी करणने रणवीर आणि अलिया भट्ट या जोडीला समोर ठेवून एक प्रेमकथा लिहिली आहे. त्याची तयारी सुरू होणार असल्याचे बोलले जाते. शिवाय, झोया अख्तरच्या आगामी चित्रपटातही रणवीरची मुख्य भूमिका असल्याने सध्या ऑनलाइन लुक टेस्टची तयारी झोयाने करून घेतली आहे. रणवीरबरोबरच विकी कौशल, आयुषमान खुराणा, राजकु मार राव ही नव्या फळीतील मंडळीही आपापल्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहेत. या सगळ्या कलाकारांच्या गर्दीत एकदम शांतपणे सर्वाधिक चित्रपटांचे चित्रीकरण व्यवस्थितपणे सांभाळणारा अक्षय कु मार टाळेबंदीआधी, टाळेबंदीत आणि नंतरही सातत्याने चित्रीकरणात व्यग्र असलेला एकमेव कलाकार आहे. एक-दोन नाही, तब्बल सात चित्रपटांचे चित्रीकरण तो लागोपाठ करतो आहे. सध्या तो स्कॉटलंडमध्ये ‘बेल बॉटम’चे चित्रीकरण करतो आहे, तिथून परतल्यावर आनंद एल. राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ आणि या वर्षांखेरीस ‘पृथ्वीराज चौहान’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या चित्रीकरणाला तो सुरुवात करणार आहे. त्यामुळे टाळेबंदीचा अगदी सुरुवातीचा काळ घरात रमलेल्या या मंडळींनी त्याच सुट्टीत आगामी चित्रपटांची बेगमी करत ही सुट्टीही सत्कारणी लावली आहे.