05 June 2020

News Flash

उत्कट रोमॅण्टिक थ्रिलर 

पूर्णिमा ओक यांची कालनिदर्शक वेशभूषा आणि शरद व सागर सावंत यांची प्रयोगाला अस्सलता प्राप्त करून देते.

नाटय़रंग

औंध संस्थान.. काळ : १९३६ चा. संस्थानचा तरुण राजगायक मोहन आणि नृत्यशाळेतील नृत्यांगना शकिला यांचं परस्परांवर प्रेम बसतं. परंतु धर्मपीठाला ते नामंजूर असतं. एक हिंदू राजगायक आणि मुस्लीम नर्तिका यांचं प्रेम? तोबा! शकिला हा ताण असह्य़ होऊन संस्थान सोडून परागंदा होते. मोहन तिच्या अकस्मात बेपत्ता होण्यानं वेडापिसा होतो. तिच्या शोधासाठी इतस्तत: भटकतो. परंतु तिचा कुठंच ठावठिकाणा लागत नाही.

याच दरम्यान मोहनच्या गायकीवर लुब्ध असलेली भोर संस्थानची राजकन्या अ‍ॅड. भारतीदेवी हिचं मोहनशी लग्न ठरवलं जातं.. आणि होतंही. यथावकाश त्यांना आशुतोष होतो. कालगतीने दिवस पुढे सरकत राहतात. परंतु मोहनच्या मनातून शकिला कधीच पुसली जात नाही. ती ज्या दिवशी संस्थान सोडून गेली तो दिवस संकष्टीचा असतो. तिच्या विरहात आला दिवस  ढकलणारा मोहन दर चतुर्थीला संध्याकाळी आरती सुरू झाली की नकळत बेभान होतो. त्या उन्मादात तो न्यायाधीशाचा पेहेराव करून समाजाला, लोकांना त्यांच्या दांभिक नैतिकतेबद्दल दुषणं देतो. त्यावेळी समोर असलेल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून शिक्षा सुनावतो. त्याचे हे झटके थांबावेत म्हणून भारतीदेवी सगळे उपाय करून थकते. शकिला सोडून गेल्यापासून त्यानं गाणंही बंद केलेलं असतं. धूम्रपान आणि दारूनं त्याचा कब्जा घेतलेला असतो. भारतीदेवी त्याला व्यसनांतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यानं पुन्हा गायला लागावं म्हणून जंग जंग पछाडते. पण व्यर्थ!

एके दिवशी औंधचे कारभारी सरंजामे हे मोहननं संस्थानच्या यमाईदेवी संगीत महोत्सवात गावं म्हणून निमंत्रण द्यायला घरी येतात. मोहन त्यांच्याशीही रूक्षपणे वागून त्यांना आपण गाणं सोडल्याचं सांगतो. तरीही ते त्याला गाण्याचा आग्रह धरतात. तेव्हा चिडून तो त्यांना धुडकावून लावतो. यानिमित्तानं का होईना, पुन्हा मोहननं गाण्याकडे वळावं यासाठी भारतीदेवी त्याला विनवते. पण तिलाही तो उडवून लावतो. ती सरंजामेंची समजूत काढून, त्याला मी गायला राजी करेन, असं आश्वासन देते.

त्याचवेळी भारतीदेवीची एक अशील शारदा आपल्या जमीन प्रकरणात तिला भेटायला येते. भारतीदेवी तिची मोहनशी ओळख करून देते. तोंडदेखलं तो तिच्याशी बोलतो. पण तितपतच. दुसऱ्या दिवशी शारदा पुन्हा आपल्या केसची कागदपत्रं देण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी येते. भारतीदेवी तेव्हा घरात नसते. मोहन शारदेला तिचं खरं नाव काय, असं विचारतो. ‘तू शारदा नसून शकिला आहेस..’ असं ठासून म्हणतो. आधी ती ते नाकारते. पण शेवटी नाइलाज होऊन ती आपण शकिलाच असल्याचं कबूल करते. तब्बल १४ वर्षांच्या वनवासानंतर त्याची शकिला आज त्याच्या समोर असते. एकाच वेळी आनंद आणि दु:खावेगानं मोहन तिच्यावर बरसतो. तिला दुषणं देतो. धर्मपीठाच्या आदेशामुळे निरुपाय होऊन त्याच्या भल्यासाठीच आपण त्याच्यापासून दूर गेल्याचं ती सांगते. मोहन तिला आता आपण पुन्हा नव्यानं आयुष्याला सुरुवात करू, म्हणतो. ती त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून देते. ‘तू आता विवाहित आहेस. आणि भारतीदेवींनी मला जमिनीच्या कोर्ट केसमध्ये मोलाची मदत केली आहे. त्यामुळे मी त्यांची ऋणाईत आहे. सबब आपलं एकत्र येणं आता अशक्य आहे,’ हे ती त्याला समजावू पाहते. पण तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो.

भारतीदेवीच्या वकिली सहाय्याच्या निमित्तानं शारदेचं मोहनच्या घरी येणं-जाणं सुरूच राहतं. हळूहळू १४ वर्षांपूर्वीची प्रणयज्वाला उभयतांत भडकून उठते. मोहनचे लुप्त झालेले सूर शकिलाच्या येण्यानं पुन्हा बहरतात. त्याच्या सान्निध्यानं तिची पावलंही थिरकायला लागतात. स्वर-ताल-लयींचा उत्सव सुरू होतो. भारतीदेवीची मदतनीस असलेली मालती भारतीदेवीला मोहन आणि शारदेच्या जवळिकीबद्दल सावध करायचा प्रयत्न करते. परंतु भारतीदेवी तिचं म्हणणं मनावर घेत नाही.

..आणि एका चतुर्थीला शकिला सोबत असतानाच मोहनला उन्मादाचा झटका येतो. त्या भरात तो शारदेवर बळजबरी करू बघतो. तिनं त्यास विरोध केल्यानं झटापटीत तो तिचा गळा आवळतो. त्याचवेळी बागेत खेळणारा आशुतोष आरडाओरडीमुळे तिथं धावत येतो. तो मोहनला न्यायाधीशाच्या वेशात शकिलाचा गळा दाबताना पाहतो. त्या आघातानं शकिला कोमात जाते. पोलीस केस होते. मोहनला बलात्कार व खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपात अटक होते. भारतीदेवी आपलं वकिली कसब पणाला लावून त्याची जामीनावर सुटका करते खरी; परंतु यातून मोहनची निर्दोष सुटका होणं अशक्य आहे, हेही ती जाणते. कारण प्रत्यक्ष आशुतोषनंच त्याला हे अधम कृत्य करताना पाहिलेलं असतं.

मात्र मोहन परोपरीनं कळकळून सांगतो, की मी शकिलेवर बलात्कार केलेला नाही. मी तिचा खून करण्याचा तर प्रश्नच नाही. जिच्यावर मी आजवर जीवापाड प्रेम केलं, तिचाच मी खून कसा काय करू शकेन? आणि मुख्य म्हणजे शकिला आणि मी मनानं एकत्र आलेलो असताना तिच्यावर बलात्कार करायची मला गरजच काय? तिनं कधीही स्वत:ला स्वखुशीनं माझ्या स्वाधीन केलं असतं. त्यासाठी बळजोरी करायची काही गरजच नव्हती.

पण त्याचं हे म्हणणं कोर्टात टिकणारं नसतं. कारण परिस्थितीजन्य सगळे पुरावे त्याच्या विरोधात जाणारे असतात. भारतीदेवी त्याला यातून सोडवण्यासाठी त्याच्या मानसिक अवस्थेची ढाल पुढं करायचं ठरवते. त्याला येणारे उन्मादी झटके तिला याकामी उपयोगी पडणार असतात. मात्र ते सिद्ध करण्यासाठी मोहननं तिला सहकार्य करणं आवश्यक असतं. पण मोहन ते अमान्य करतो. उलट, कोर्टात तो आपल्या शकिलावरच्या निस्सीम प्रेमाची ग्वाही देऊन त्याच्यावरचे आरोप साफ नाकारतो. या साऱ्या प्रकरणात भारतीदेवी आणि मोहनच्या वैवाहिक आयुष्याचेही जाहीर धिंडवडे निघतात. त्यानं भारतीदेवी होरपळून निघते. तशात ज्याला आयुष्यात पुनश्च उभं करण्यासाठी तिनं इतकी र्वष मनोभावे सर्वतोपरी प्रयत्न केलेले असतात तो नवराच त्याचं आपल्यावर यत्किंचितही प्रेम नाही, असं जाहीरपणे कोर्टात सांगतो. त्यानं तर ती कोसळतेच. अर्थात तरीही मोहनची सुटका करण्याचा तिचा निर्धार अढळ असतो. आजपर्यंत तिनं त्याचे सगळे अपराध पोटात घालून त्याच्यावर फक्त आणि फक्त प्रेमच केलेलं असतं. त्याच्यासाठी वाट्टेल ते करायची तिची तयारी असते.

..काय होतं पुढे? भारतीदेवी मोहनला सोडवू शकते? तेही सारे पुरावे त्याच्या विरोधात असताना? शकिलावर आपलं प्रेम आहे असं त्यानं जाहीरपणे कोर्टात सांगितलेलं असतानाही?.. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ‘तिन्हीसांज’ हे नाटक प्रत्यक्ष बघणंच उचित ठरेल.

लेखक शेखर ताम्हाणे यांनी हा पीरियड प्ले रूढ पठडीपेक्षा वेगळ्या तऱ्हेनं हाताळला आहे. या रोमॅण्टिक गोष्टीत त्यांनी धक्कातंत्राचा वापर करत थ्रिलरचाही अनुभव दिला आहे. म्हटलं तर ही तिघांची (की चौघांची?) अनवट, तरल, भावस्पर्शी प्रेमकहाणी आहे. ती आकारास येत असताना ज्या भावनिक, मानसिक वादळांना त्यांना सामोरं जावं लागतं, त्यानं त्यांची आयुष्यं व मूल्यंही पणाला लागतात. नैतिक आणि मनोकायिक तरंगांचा सुप्त मुद्दाही ऐरणीवर येतो. लेखकानं अतिशय सफाईने यात काही नाटकीय ठोकताळे योजले आहेत. त्यामुळे एक अलवार, रोमॅण्टिक कहाणी उलगडली जात असतानाच अकस्मात ती नाटय़पूर्ण वळण घेते आणि थेट थ्रिलरच्या दिशेनं जाते. प्रेक्षकानं मनाशी बांधलेले आडाखे त्यापायी उद्ध्वस्त होतात. हेच या नाटकाचं वैशिष्टय़ आहे. यातलं आशुतोष हे नाटकाला कलाटणी देणारं अत्यंत महत्त्वाचं पात्र कोर्टातील खटल्यात प्रत्यक्षात काहीच भूमिका बजावताना दिसत नाही, हे चांगलंच खटकतं. तसंच मोहनला सोडवण्यासाठी भारतीदेवीने योजलेला वकिली युक्तिवाद आपल्या कोर्टातील साक्षीत मात्र ती वापरत नाही. त्याऐवजी तिच्या भावनांचा उद्रेक होतो. त्यानंतर ती मोहनला खरं काय घडलं, याबद्दल खोदून खोदून विचारते. तो जे घडलं ते सांगतो. आपल्या निर्दोषित्वासाठी बागेतील जूईची साक्ष काढायला तो तिला सांगतो.

..आणि इथंच घटनांना नाटय़पूर्ण वळण मिळतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे बागेतली ती मूक वेलच मोहनच्या बाजूनं साक्ष देते. यातली तरल भावगर्भता संवेदनशील प्रेक्षकच जाणू शकतात.

दिग्दर्शक संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी नाटकाची जातकुळी ओळखून त्याला एक संथ, हळुवार अशी लय दिली आहे. पहिल्या अंकाच्या अखेरीस कहाणीस नाटय़पूर्ण वळण मिळतं खरं; परंतु त्यातला अलवार भावप्रक्षोभ, उत्कट रोमॅण्टिकपण हरवणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आहे. एक गायक आणि नृत्यांगना यांच्या प्रेमकहाणीत स्वाभाविकपणेच गाणं व नृत्याला स्थान असणार. स्वत: दिग्दर्शिका या उत्तम नर्तिका असल्यानं सूर-तालाचं, लयीचं भान त्यांनी ‘तिन्हीसांज’मध्ये सुंदररीत्या प्रतिबिंबित केलं आहे. पात्रांच्या स्वभावगत खाचखोचा ठाशीव करण्याऐवजी त्यात मुग्धता राखल्यानं प्रेक्षकांची उत्कंठा वाढते. आशुतोषच्या तबलावादनास वाव देताना त्याच्या ‘नाटय़गत भूमिके’लाही वाव मिळाला असता तर नाटकातील एक त्रुटी वजा झाली असती. मोहनच्या हातातील बंदुकीतून नेमकं काय सुचवायचं आहे, हे मात्र कळत नाही. अशा काही त्रुटी वगळता प्रयोग एखाद्या मैफिलीसारखा कळसाकडे जातो.

परिक्षित भातखंडे यांच्या श्रुतीमधुर संगीतानं नाटकात रंगत भरली आहे. तीच गोष्ट संपदा जोगळेकरांच्या नृत्य-दिग्दर्शनाचीही. यातली नृत्याधारित गाणी उत्कट, गहिरं वातावरणनिर्मिती करतात. राजन ताम्हाणे यांनीही प्रकाशयोजनेतून कथेला न्याय दिला आहे. पूर्णिमा ओक यांची कालनिदर्शक वेशभूषा आणि शरद व सागर सावंत यांची रंगभूषा प्रयोगाला अस्सलता प्राप्त करून देते.

शीतल क्षीरसागर यांनी भारतीदेवीचं निर्धारी वकिली रूप आणि मोहनवर उत्कटपणे प्रेम करणाऱ्या पत्नीचं संयमित, उदात्त रूप संवादांतील आरोह-अवरोहांतून समूर्त केलं आहे. मनातलं भावनांचं वादळ दाबून ठेवत समोरच्याशी शक्य तितक्या सहजतेनं वागण्याचा भारतीदेवीचा प्रयास त्यांनी वास्तवदर्शी केला आहे. भावनोद्रेक आणि क्षणात स्वत:वर काबू मिळवून वास्तवाला सामोरं जाण्याची परिपक्वताही त्यांना साधली आहे. अंगद म्हसकर यांनी मोहनमधील मनस्वी कलावंत आणि तितकाच उत्कट प्रियकर त्याच्या भावोद्रेकासह उत्तमरीत्या साकारला आहे. समोरच्या व्यक्तीशी तुसडेपणी वागतानाही तिचा अनादर होणार नाही याची दक्षताही तो नकळतपणे घेताना जाणवतो. शारदा तथा शकिलाचं कलावंतपण, तिच्यातली उत्कट प्रणयिनी आणि परिस्थितीच्या कचाटय़ात सापडल्यानं होणारी तिची फरफट व कुचंबणा शाल्मली टोळ्ये यांनी यथार्थ दाखविली आहे. त्यांची नृत्यनिपुणता या भूमिकेस पोषक ठरली आहे. सायली परब यांनी धांदरट आणि सतत गोंधळलेली मालती ज्या तऱ्हेनं साकारली आहे, तद्वत उत्तरार्धात मनोगंडातून निर्माण झालेली मालतीची विकृतीही तितकीच प्रभावी केली आहे. आशुतोष झालेल्या श्रीराज ताम्हणकरचं तबलावादन लोभस आहे. गौतम मुर्डेश्वर व सचिन शिर्के यांनीही छान साथ केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2016 2:49 am

Web Title: article romantic thriller drama
टॅग Drama
Next Stories
1 पडद्यावरचे नटरंगी लेणे!
2 जलरंगातील स्थापत्याविष्कार!
3 ‘मुहूर्तावर मुहूर्त’
Just Now!
X