News Flash

प्रतिमांचे कैदी..

शाहरूख खान गेली दोन दशकं तरुणाईला भुरळ घालत आला आहे.

आपले दोन बाहू पसरून.. मान थोडी खाली झुकवत नायिकेला आपल्या प्रेमात ओढणारा शाहरूख खान गेली दोन दशकं तरुणाईला भुरळ घालत आला आहे. त्याच्या याच सिग्नेचर पोझचं कौतुक जगभरातल्या त्याच्या चाहत्यांना आजही आहे. आजही बॉलीवूडचा बादशाह, किंग ऑफ रोमान्स अशी कितीतरी नावं असलेल्या शाहरूखची ओळख त्याची हीच प्रेमी हिरोगिरी आहे. बॉलीवूडचा हिरो म्हणजे हेच समीकरण जमायला हवं, असा जर लोकांचाच काय नव्याने येणाऱ्या अभिनेत्यांचाही समज झाला तर त्यात वावगं ठरणार नाही. त्याआधी असाच एक काळ शतकाचा सुपरहिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी अँग्री यंग मॅन म्हणून गाजवला होता. आपल्याच प्रतिमेत अडकून पडण्याचा हा खेळ खरं म्हणजे कलाकारांसाठी जीवघेणाच.. कोणाची कारकीर्दच यात संपते. तर काहींची बहरली तरी कलाकार म्हणून त्यांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह असतंच.. प्रतिमांचा हा खेळ आजच्या कलाकारांच्या बाबतीत मात्र पूर्णपणे बदललेला आहे. रणवीर सिंगचा रामलीला ते बाजीराव आणि आत्ताच्या खिलजीपर्यंतचा प्रवास बरंच काही सांगून जातो. रणवीर ऐतिहासिक भूमिकांमध्येच अडकून पडणार की काय अशी शंका व्यक्त करणाऱ्यांनाही आपल्या अभिनयावर कमालीचा विश्वास ठेवायला लावणाऱ्या रणवीरने येत्या काळात कलाकारांना आपल्या प्रतिमा आणि प्रतिभेचा समतोल साधतच चमत्कार घडवावा लागणार हे सिद्ध केले आहे.

रणवीर सिंग बॉलीवूडमध्ये आला तोच मुळी यशराज प्रॉडक्शनच्या बँड बाजा बरात या चित्रपटातून. यशराजचा असला तरी तो त्यांच्या नेहमीच्या पठडीतला सिनेमा नव्हता तर दिल्लीच्या गल्लीबोळातून आपली कारकीर्द घडवू पाहणाऱ्या दोन तरुण जिवांचा होता. त्यात महत्त्वाकांक्षा होती. त्याच वेळी प्रेम आणि स्पर्धेच्या नादात नात्यांनाही वापरून खरं प्रेम गमवू पाहणाऱ्या गोंधळलेल्या पिढीचं प्रतिनिधित्वही होतं. या चित्रपटात यश मिळाल्यानंतर खरं म्हणजे त्याने चॉकलेट बॉय म्हणून वाटचाल केली नाही. लेडीज व्हर्सेस रिकी बेहल, बॉम्बे टॉकीज असे प्रयोग रणवीर क रत राहिला. अगदी विक्रम मोटवानेचा लुटेरा कुठलाही व्यावसायिक मसाला नसताना स्कीकारायचं धाडस त्याने केलं. आता रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत असे चित्रपट केल्यानंतर तो या ऐतिहासिक किंवा पिरिअड चित्रपटांच्या व्यक्तिरेखांमध्ये अडकतो की काय.. अशी शंका त्याच्या चाहत्यांमध्ये व्यक्त होऊ लागली होती. काही काळ आपण जे करतो आहोत ते योग्य आहे का, याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याचं रणवीरनेही मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. मात्र लुटेरासारख्या आशयघन चित्रपटाला यश मिळाल्यानंतर त्याचा विश्वास दृढ झाला, असं त्याने म्हटलं. आज त्याच विश्वासाच्या जोरावर त्याने खिलजीही रंगवला आहे आणि तो सिम्बासारख्या तद्दन मसाला चित्रपटाकडेही वळला आहे.

आजच्या काळात कलाकारांना हा प्रतिमा बदलांचा खेळ खेळतच पुढे जावं लागणार, असं चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर सांगतात. आपल्या पडद्यावरच्या प्रतिमांमध्ये न अडकता सतत वैविध्यपूर्ण काम करत राहिलेले कलाकार म्हणून दोनच नावं डोळ्यासमोर येतात ती म्हणजे कादर खान आणि अनुपम खेर. पण हे दोघेही चरित्र अभिनेते होते आणि चरित्र अभिनेत्यांना सातत्याने भूमिकांच्या बाबतीत प्रयोग करत राहणं तुलनेने सोपं जातं. मात्र हिरोच्या बाबतीत ते तितकं सहजशक्य आहे असं म्हणता येत नाही, हा मुद्दा मांडताना ठाकूर यांनी अभिनयाचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमार यांचं उदाहरण दिलं. दिलीप कुमार यांना कायम ट्रॅजेडी किंग अशीच ओळख मिळाली, मात्र ते फक्त देवदाससारख्याच भूमिकांमध्ये अडकून पडले नव्हते. त्यांनी राम और श्यामसारखा विनोदी चित्रपटही केला होता. त्यांची चित्रपटांमध्ये सेकंड इनिंग सुरू झाली तेव्हा विधाता, कर्मा अशा चित्रपटांमधून एक करारी, अँग्री यंग मॅन अशाच त्यांच्या भूमिका होत्या. खरं म्हणजे त्या वेळी अँग्री यंग मॅन म्हणून अमिताभ बच्चनचा उदय झाला होता तरीही दिलीप कुमार अशा भूमिकांमधून लोकांना आवडले होते. पण त्यांची ओळख आयुष्यभर ट्रॅजेडी किंग अशीच राहिली. शाहरूख खाननेही कारकीर्दीच्या सुरुवातीलाच डर, अंजाम अशा चित्रपटांमधून नकारी भूमिका साकारत प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे चित्रपट यशस्वी ठरले तरी प्रेक्षकांचं दिल त्याच्या चॉक लेट हिरो भूमिकांवरच पागल होत राहिलं. याला बऱ्याच अंशी त्या वेळच्या प्रेक्षकांची आणि दिग्दर्शकांची कलाकारांच्या पडद्यावरच्या प्रतिमांनाच चिकटून राहण्याची मानसिकता कारणीभूत होती, असं ठाकूर सांगतात.

अनेकदा कलाकाराची इच्छा असली तरी त्याची पडद्यावरची प्रतिमा काय आहे हे लक्षात घेऊनच त्यांना भूमिका दिल्या जात असत. प्रेक्षकांनाही कलाकार त्याच नेहमीच्या ओळखीच्या रूपात समोर यावा, असं वाटायचं. आत्ताचे प्रेक्षक मात्र आपल्या आवडत्या कलाकाराला त्याच त्याच प्रतिमांमध्ये बघू शकत नाहीत. त्यामुळे भूमिकांमध्ये सतत प्रयोग करत राहणं तेही व्यावसायिक चित्रपटांच्या चौकटीत राहूनच.. हे आव्हान कलाकारांसमोर आहे. मागच्या पिढीत हे गणित अक्षय कुमार आणि अजय देवगण दोघांनाही उत्तम साधलेलं आहे. अजय देवगणने जख्म, हम दिल दे चुके सनम चित्रपटांनंतर आपली वाट बदलली. त्याने गोलमाल, सिंघम हे त्याच्या चाहत्यांना हवे असणारे विनोदी चित्रपटही यशस्वी के ले. त्यामुळे साहजिकच त्यांचा एक चाहतावर्ग तयार झाला आणि याच वर्गाने मग गंभीर भूमिका असलेल्या त्याच्या चित्रपटांनाही साथ दिली. अक्षय कुमारच्या बाबतीतही हे ठळकपणे म्हणता येईल. त्याचा रुस्तूम वेगळा असतो, स्पेशल २६ वेगळा असतो. एकीकडे टॉयलेट एक प्रेमकथा आणि पॅडमॅन आहे. तर दुसरीकडे जॉली एलएलबी २सारखा हलकाफुलका चित्रपटही आहे. हा समतोल साधणं ही आत्ताच्या कलाकारांची गरज झाली आहे. नव्या कलाकारांमध्ये सध्या तरी हे गणित रणवीर सिंग आणि रणबीर कपूर दोघांनाच साध्य झालं आहे. हृतिक रोशनमध्ये अशा प्रकारे वैविध्यपूर्ण भूमिका करण्याची ताकद आहे, गुणवत्ताही आहे, मात्र तो फार कमी चित्रपट करत असल्याने त्याचा पुरेपूर फायदा त्याला उठवता आलेला नाही, असं मत दिलीप ठाकूर व्यक्त करतात. शाहीद कपूर, सैफ अली खान या दोघांनाही याबाबतीत अजून झगडा द्यावा लागतो आहे. त्या तुलनेत फार कमी कालावधीत रणवीर सिंगने आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. रणवीर कुठल्याही प्रकारची भूमिका आपल्या शैलीत वेगळेपणाने साकारू शकतो, हा विश्वास त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचा लोकप्रियतेत कसा परिणाम होतो हे येत्या काळात लक्षात येईल. रणबीरकडेही ती क्षमता आहे. यह जवानी है दिवानी, तमाशा, रॉकस्टार, जग्गा जासूस.. अशा चित्रपटांमधून रणबीरनेही आपली प्रतिमा कायम हलती ठेवली आहे. मात्र अजून तो पूर्णपणे यशस्वी ठरलेला नाही. संजय दत्तवरचा त्याचा चित्रपट कदाचित हे चित्र पालटू शकेल. मात्र आजचे दिग्दर्शकही कलाकारांच्या प्रतिमेत अडकून पडणारे नसल्याने समतोलाचा हा प्रयोग आत्ताच्या कलाकारांसाठी तुलनेने सोपा आहे. मात्र त्यासाठी आपल्या पद्धतीने भूमिका निवडून त्यावर मेहनत घेत लोकांपर्यंत ती प्रभावीपणे पोहोचवणं, त्यांच्या मनात कलाकार म्हणून विश्वास निर्माण करण्यासाठी या कलाकारांना आपली कमाल दाखवावीच लागणार आहे. प्रतिमांचा हा खेळ पडद्यावर रंगला तरच त्यांची प्रतिभा रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ टिकून राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 1:41 am

Web Title: articles in marathi on bollywood actor signature style
Next Stories
1 हॅट्ट्रिक!
2 दिग्गज कलाकारांचा ‘गुलमोहर’
3 गडद प्रेमफॅण्टसी!
Just Now!
X