News Flash

रंग माझा वेगळा!

अलिया भट्टच्या वाढदिवसाबरोबर आणखी एक चर्चा रंगली होती.

बॉलीवूडमध्ये सध्या कलाकारांच्या तीन पिढय़ा गुण्यागोविंदाने रुपेरी पडद्यावर नांदताना दिसतायेत. प्रत्येक पिढीची वैशिष्टय़े वेगळी तशी त्यांच्यातील स्पर्धाही वेगळी आहे. पहिल्या पिढीत अर्थातच आता पन्नाशी उलटलेले ‘स्टार’ कलाकार आघाडीवर आहेत. त्यांच्यासाठी शंभर कोटींच्या खाली उतरायचे नाही, ही स्पर्धा आहे. दुसऱ्या फळीत सध्या हृतिक रोशनपासून आत्ताची सिद्धार्थ मल्होत्रा, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, रणबीर कपूर, वरुण धवन, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, अलिया भट्ट, सोनम कपूर, परिणीती चोप्रा, राजकुमार राव, कंगना राणावत ही मंडळी आहेत. या पिढीला सध्या चित्रपटांच्या आणि स्वत:च्या कारकीर्दीसाठी खूप झगडावं लागतंय. त्यामुळे एकीकडे व्यावसायिक चित्रपटही करायचे आणि त्यातल्या त्यात भूमिकांमध्ये प्रयोगही करायचे अशी त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. तर तिसरी पिढी ही अगदीच नव्याने येणाऱ्या इशान अख्तर, सारा अली खान, जान्हवी कपूर या मंडळींची आहे. कलाकारांची यादी ही सध्या इतक्या झपाटय़ाने वाढतेय की या गर्दीत आपला वेगळेपणा उठून दिसण्यासाठी भूमिका, दिग्दर्शकांच्या बाबतीत अनेक प्रयोग होत आहेत.

गेल्या आठवडय़ात अलिया भट्टच्या वाढदिवसाबरोबर आणखी एक चर्चा रंगली होती. अलियाने अगदी लहान वयात आघाडीची कलाकार म्हणून यश मिळवले आहे, मात्र यात तिच्या व्यावसायिक चित्रपटांचा हात जेवढा आहे त्यापेक्षा जास्त ‘हायवे’, ‘उडता पंजाब’सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचा आहे. आणि आता तिची नैय्या चांगलीच धावत असतानाही चित्रपट स्वीकारताना त्यातलं वेगळेपण काय आहे, विषय, भूमिका, दिग्दर्शक अशा सगळ्याच फुटपट्टय़ांवर तपासून मग होकार देण्याचं तिचं तंत्र तिनं कायम ठेवलं आहे. त्याचा मोठा फटका बसला तो दिग्दर्शक रोहित शेट्टीला. विनोदी किंवा यशस्वी व्यावसायिक मसाला चित्रपट देण्यात हातखंडा असलेल्या रोहित शेट्टीला त्याच्या ‘सिंबा’ या चित्रपटासाठी रणवीर सिंगची नायिका म्हणून अलिया भट्ट हवी होती. मात्र अलियाने चित्रपटाला स्पष्ट नकार दिला नसला तरी तारखांचे कारण पुढे केले तर श्रद्धाने पूर्ण पटकथा मागितली. अखेर हा चित्रपट परिणीतीकडे गेला. रोहित शेट्टीला मात्र हा प्रतिसाद अनपेक्षित होता. सहसा प्रथितयश दिग्दर्शकांच्या बिग बजेट चित्रपटांना नकार ऐकण्याची सवय नसलेल्यांना हा धक्काच असला तरी कलाकारांसाठी ते गरजेचे होत चालले आहे. अलियाकडे त्या अर्थाने या वर्षी एकही तद्दन मसाला चित्रपट नाही. तिने मेघना गुलजारचा ‘राजी’ हा चित्रपट केलाय ज्यात विकी कौशल तिच्याबरोबर आहे. तर रणवीर सिंग आणि ती झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉय’मध्ये काम करतायेत. धारावीतील एका रॅप ग्रुपची वास्तव कथा सांगणारा हा चित्रपट आहे. या दोन चित्रपटांबरोबर ती शाहरूखच्या ‘झीरो’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

व्यावसायिक मसाला चित्रपट आणि आशयघन चित्रपटांचा किंवा भूमिकांचा समतोल साधणं ही फक्त अभिनेत्रींची गरज आहे असंही नाही. रणवीर सिंग स्वत: ‘सिंबा’ आणि ‘गल्ली बॉय’ असे दोन वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट एकाच वेळी करतोय शिवाय चरित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे ते वेगळेच. ‘जुडवा’ने गल्लापेटीवर बक्कळ कमाई करून दिली असली तरी त्यानंतर वरुणने शूजित सिरकारचा ‘ऑक्टोबर’ हा चित्रपट पूर्ण केला आहे. शिवाय, यशराज प्रॉडक्शनचा चित्रपट असला तरी शरत कटारियासारखा ग्रामीण भागातील विषयांवर चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाचा ‘सूई धागा’ हा चित्रपट तो अनुष्काबरोबर करतो आहे. आपल्या चित्रपटांच्या निवडीबद्दल स्पष्टपणे बोलणं त्याने टाळलं असलं तरी ‘ऑक्टोबर’सारखी वेगळी पटकथा असलेल्या चित्रपटाची इतर कोणापेक्षाही मला जास्त गरज होती, असं त्याने म्हटलं आहे. आत्तापर्यंत आपलं संपूर्ण आयुष्य दिग्दर्शक म्हणून विनोदी चित्रपटांना वाहिलेले वरुणचे वडील डेव्हिड धवन यांना त्यांच्या मुलाच्या या निवडीने फक्त  गोंधळात टाकलंय असं नाही, तर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ते चक्क गंभीर विषयावर चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत. घराणेशाही आंदण मिळालेली असो किंवा बाहेरून आलेला कलाकार असो सध्या सगळ्याच छोटय़ा-मोठय़ा कलाकारांना चित्रपटांच्या बाबतीत ‘प्रयोग’ करून पाहणं गरजेचं झालं आहे.

जागतिक चित्रपट पाहणारा आणि चांगल्या-वाईट चित्रपटाची पारख असलेला प्रेक्षकवर्ग हे कदाचित या बदलामागचं मोठं कारण असू शकतं. मात्र दिग्दर्शक आणि भूमिका या दोन्ही बाबतीत प्रयोग करत विचारपूर्वक आपली कारकीर्द घडवणं हे या कलाकारांसमोरचं मोठं आव्हान ठरू पाहतंय. एकीकडे व्यावसायिक चित्रपटांतील कलाकारांना आशयघन चित्रपटांकडे वळावं लागतंय तर त्याच्या उलट चित्रही दिसतंय. आशयघन चित्रपटांमधूनच अभिनेता म्हणून आपलं नाणं खणखणीतपणे सिद्ध करणाऱ्या राजकुमार रावसारख्या कलाकाराला व्यावसायिक चित्रपटांमधून काम करण्याचं भानही बाळगावं लागतंय. त्यामुळे एकीकडे राजकुमार आपल्या नेहमीच्या शैलीतील हंसल मेहता दिग्दर्शित ‘ओमेर्ता’, एकता क पूरची निर्मिती असलेला ‘मेंटल है क्या’ करतोय तर दुसरीकडे तो ऐश्वर्या रायबरोबर ‘फॅनी खान’, अनिल कपूर-जुही चावला-सोनम कपूर यांचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ करतोय तर श्रद्धा कपूरबरोबर ‘स्त्री’ करतोय. कलाकार म्हणून वैविध्यपूर्ण आणि वेगवेगळ्या स्तरावरचे चित्रपट करायला मिळतायेत, याबद्दल आनंद वाटतोय अशी प्रतिक्रिया राजकुमारने दिली आहे. रणवीर-दीपिका यांचंही म्हणणं तसंच असलं तरी वेगळेपणाची ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढतेय हे प्रत्येकानेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या क बूल केलं आहे. ‘पद्मावत’नंतर दीपिकाने अजूनही चित्रपट स्वीकारलेला नाही, ‘झीरो’मध्ये ती छोटेखानी भूमिकेत दिसणार आहे तर विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘सपना दीदी’ हा चित्रपट तिने स्वीकारला असला तरी इरफान खानच्या आजारामुळे सध्या तरी या चित्रपटाचे भवितव्य अधांतरी आहे.

आघाडीचे कलाकार आणि नवीन कलाकार या वेगळेपणाच्या मोजपट्टीवर सध्या समानच झाले आहेत. यशराजच्या प्रेमपटांमधून कित्येक वर्षांनी बाहेर पडलेल्या शाहरूख खानने चित्रपटांच्या बाबतीत ‘फॅ न’, ‘डीअर जिंदगी’, ‘रईस’ असे वेगवेगळे प्रयोग करून न पाहिले, पाहतोय तरी त्याला फारसे यश हाती लागत नाही आहे. आनंद एल. राय यांचा ‘झीरो’ हाही त्याचा नवीन प्रयोगपट ठरणार आहे. तर दुसरीक डे आमिरला मात्र हे व्यावसायिकतेच्या चौकटीत आपल्या भूमिका चपखल बसवण्याची कला साध्य झाली आहे. त्यामुळे ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ असे चित्रपट देऊनही त्याच्या वर्षांतून एकदाच येणाऱ्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’सारख्या चित्रपटांकडे प्रेक्षक उत्सुकतेने डोळे लावून बसलेले असतात. ‘स्टार’ कलाकार आहेत आणि अजून चित्रपटांमध्ये पहिले पाऊल टाकायचे आहे त्यांनाही या वेगळेपणाच्या कसोटीने सध्या ग्रासले आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या मुलीच्या बॉलीवूड पदार्पणाची सूत्रं करण जोहरच्या हातात दिली होती. मात्र करणलाही खुशीला पदार्पणाच्या चित्रपटासाठी ‘सैराट’चा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’ची निवड करावी लागली. श्रीदेवीला हे फारसे रुचले नव्हते मात्र खुशीला यशस्वीपणे पाय रोवायचा असेल तर अशाच भूमिकांची गरज आहे यावर करण जोहर मात्र पहिल्यापासून ठाम होता. अगदी सारा अली खाननेही पदार्पणासाठी अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’सारख्या आशयात्मक चित्रपटाचाच आधार घेतला आहे.

आशय-मांडणीतील वैविध्य ही नेमकी कलाकारांची गरज आहे की प्रेक्षकांमुळे त्यांना हा विचार करावासा वाटतोय? नव्या विचारसरणीचे दिग्दर्शक याला कारणीभूत आहेत का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजून स्पष्टपणे मिळाली नसली तरी हा वेगळेपणा प्रेक्षकांच्या पथ्यावर पडणारा आहे हे निश्चित. विषयांमधले, कलाकारांच्या जोडय़ांमधले, दिग्दर्शकाच्या मांडणीतील या सगळ्या प्रयोगांमुळे येत्या वर्षांत खूप हटके चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2018 2:01 am

Web Title: articles in marathi on bollywood movies 2
Next Stories
1 मराठी ‘बिग बॉस’ महेश मांजरेकर
2 नायक नहीं, खलनायक हूँ मैं!
3 मराठी मालिकांचा गुढीपाडवा
Just Now!
X