‘हजारो ख्वाहिशे ऐसी’सारख्या आशयघन चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या चित्रांगदा सिंग या अभिनेत्रीने नंतरच्या काळात ‘देसी बॉईज’, ‘इन्कार’ अशा व्यावसायिक चित्रपटांमधून ग्लॅमरस भूमिका साकारल्या. सध्या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’च्या चौथ्या सीझनची परीक्षक म्हणून ती प्रेक्षकांना छोटय़ा पडद्यावर दिसेल. या निमित्ताने तिच्याशी साधलेल्या संवादातून तिच्या नृत्याच्या आवडीविषयीचे आणि अभिनयाविषयीचे अनेक कंगोरे समोर आले. ‘जोकर’, ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटात चित्रांगदाने उडत्या चालीच्या गाण्यांवर (आयटम साँग) नृत्य केले आहे. यापुढेही उत्तम नृत्यदिग्दर्शक मिळाल्यास आयटम साँग करेन, त्यात काही वावगे नसल्याचे स्पष्ट मत तिने व्यक्त केले..

नृत्याची लहानपणापासूनच आवड असलेल्या चित्रांगदाने नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. उडत्या चालीच्या गाण्यातील नृत्यप्रकाराकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन ती धुडकावून लावते. ‘जोकर’मध्ये जशी ‘काफिराना’ या उडत्या चालीच्या गाण्यावर नृत्य करण्याची संधी मिळाली तशी यापुढेही मिळाली तर निश्चितच करेन. मात्र, त्याला उत्तम गीत आणि चांगल्या नृत्य दिग्दर्शकाची जोड असावी अशीही अपेक्षा तिने व्यक्त केली. आयटम साँग करण्यात काही चुकीचे नाही असेही ती म्हणाली. कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून तिच्याकडे प्रस्ताव आला तेव्हा माझी निवड का केली जावी, असा प्रश्न तिलाही पडला. त्यावेळी चांगला कलाकारच उत्तम परीक्षण करू शकतो, कारण चांगल्या कलाकारालाच इतर कलाकारांमधील कौशल्ये चांगली ठाऊ क असतात किंवा ती समजून घेता येतात, असे उत्तर तिला मिळाले. टेलिव्हिजन माध्यमाचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे त्यामुळे या प्रेक्षकवर्गाला सामोरे जाण्याची चांगली संधी तिला या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे तिने या छोटय़ा दोस्तांच्या डान्स रिअ‍ॅलिटी शोचे परीक्षण करण्याचे ठरवले.

प्रसिद्धीपासून काहीशी लांब असलेली आणि फारच थोडय़ा चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या चित्रांगदाला सुरुवातीच्या काळात काही व्यक्तिगत कारणांमुळे चित्रपटात भूमिका करता आल्या नाहीत. बऱ्याचदा तुमचं व्यक्तिगत आयुष्य आणि करिअर यातील एक वाट तुम्हाला निवडावी लागते. माझ्याबाबतीत तसंच झालेलं त्यामुळे मी काही काळ रुपेरी पडद्यापासून दूर होते. केवळ प्रसिद्धीखातर भूमिका किंवा चित्रपटांची निवड न करण्यामागे काही विशेष कारण नाही असेही ती म्हणाली. तिच्या मते प्रत्येक कलाकाराची स्वत:ची आवडनिवड असते आणि त्याप्रमाणे त्या भूमिकांची निवड तो अथवा ती करत असते. काही वेळा आम्ही भूमिका निवडतो तर काही वेळा काही चित्रपटांतील भूमिकांसाठी दिग्दर्शक अथवा लेखक आम्हाला निवडतात.

चित्रांगदाने सुरुवात जरी आशयघन चित्रपटांपासून केली असली तरी नंतरच्या काळात व्यावसायिक चित्रपटांतून तिने ग्लॅमरस भूमिकाही केल्या. त्यामुळे तिच्या प्रवासातील टेलिव्हिजनचा टप्पा हा प्रतिमा बदलण्याचा एक भाग आहे का, असा प्रश्न संवाद साधताना उद्भवलाच. त्यावर चित्रांगदाने रिअ‍ॅलिटी शोमध्ये मी माणूस म्हणून जशी आहे तशीच प्रेक्षकांसमोर दिसेन. परीक्षक म्हणून काम करताना माझे विचार आणि माझ्या भावना त्यांना समजतील. यात माझ्यातील अभिनेत्री प्रेक्षकांना दिसणार नाही, त्यामुळे ग्लॅमरस दिसण्याचा प्रश्नच येत नाही असे तिने म्हटले.

अनेक भाषिक सिनेमांमध्ये चांगल्या विषयांचे सिनेमे येत आहेत आणि त्यातही मला भूमिका करायला आवडतील अशी इच्छाही चित्रांगदाने यावेळी व्यक्त केली. विशेषत: मराठी, बंगाली, पंजाबी सिनेमांमध्ये उत्तम भूमिका आणि कथा असलेल्या चित्रपटांतून विचारणा झाली तर नक्कीच विचार करणार असल्याचे चित्रांगदाने सांगितले. सद्यकाळात भाषेचे बंधन राहिलेले नसून समांतर अथवा व्यावसायिक सिनेमा यातील फरकही आता गळून पडला आहे. सध्या चांगल्या विषयांसाठी निश्चितच उत्तम काळ आहे, असेही तिने सांगितले.