गेल्या दोन-तीन वर्षांत सातत्याने चर्चेत असलेल्या आणि प्रदर्शित झालेल्याही मराठी चित्रपटांकडे नजर टाकली तर त्यामागचे चेहरे तरुण आहेत. त्यांच्या चित्रपटांची भाषा, त्यांचे दिग्दर्शन हे मराठीत आजवरच्या चित्रपटांबद्दलच्या रूढ चौकटी मोडणारे आहेत हे सहज लक्षात येईल. केवळ राज्य चित्रपट पुरस्कार, झी मराठी चित्रपट पुरस्कारच नव्हेत तर राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधून नावाजलेल्या चित्रपटांमागे तरुण दिग्दर्शक आहेत. हेच चित्रपट व्यावसायिकरीत्याही प्रदर्शित करण्याची धमक या दिग्दर्शकांमध्ये आहे. अर्थात, तरुण दिग्दर्शकांचे चित्रपट धो धो चालतायेत असं म्हणणं धाष्टर्य़ाचं ठरेल. पण त्यांनी मराठी चित्रपटांची परिभाषा बदलली आहे आणि येत्या काळात हेच चेहरे मराठी चित्रपटांचं भविष्य आहेत यात शंका नाही..

‘मामि’ मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘मराठी टॉकीज’ हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. ज्याची सुरुवातच संदीप मोदी दिग्दर्शित ‘चुंबक’ या चित्रपटाने होते आहे. याच फेस्टिव्हलमध्ये दीपक गावडे दिग्दर्शित ‘ईडक’ हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या ‘कोर्ट’चा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याची ‘डेथ ऑफ अ फादर’ ही शॉर्टफिल्म या फेस्टिव्हलमध्ये स्पर्धेत आहे. रंगमंच ते रुपेरी पडदा असा प्रवास करणाऱ्या निपुण धर्माधिकारीचा ‘बापजन्म’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘मुरांबा’ या चित्रपटाने हिंदीच्या तोडीस तोड उभे राहात चित्रपटगृहांमधून कमाईही केली आहे. ओम राऊत हिंदीत अजय देवगणला घेऊन ‘तानाजी’ करतोय. तर दरवेळी वेगळा विषय हाताळणारा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ‘फास्टर फेणे’सारखा चित्रपट करतोय. नागराज मंजुळेंनीही हिंदी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. ‘रिंगण’चा दिग्दर्शक मकरंद माने, ‘लपाछुपी’कार विशाल फुरिया, निखिल महाजन, सुजय डहाके, सचिन कुंडलकर, समीर विद्वांस, लक्ष्मण उतेकर, पुनर्वसू नाईक, अविनाश अरुण, जयप्रद देसाई, प्रकाश कुंटे अशी अनेक तरुण दिग्दर्शकांची एक फळीच्या फळी मराठी चित्रपटसृष्टीत सक्रिय झाली आहे. या प्रत्येक दिग्दर्शकाबरोबर एक वेगळा विषय, वेगळी मांडणी मराठी चित्रपटातून पाहायला मिळते आहे. मराठी चित्रपटांची संख्या वाढली त्याबद्दल सध्या तक्रारीचा सूर आळवला जातो आहे. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत, या भावनेतून मराठी चित्रपटांक डे वळलेला निर्मात्यांचा मोर्चा आणि त्यातून वाढलेलं हे संख्याबळ यातूनच नव्या दिग्दर्शकांना मराठी चित्रपट करण्याची संधी मिळाली आहे हे वास्तव दुर्लक्ष करण्याजोगे नाही. निर्माते वाढले, मराठी दिग्दर्शकांना चित्रपटासाठी व्यासपीठ मिळालं आणि त्यामुळे समाजातील सगळ्याच स्तरातील लोकांना चित्रपट दिग्दर्शनाची संधी मिळते आहे. या क्षेत्रात मूठभर लोकांची जी मक्तेदारी होती ती आता उरलेली नाही आणि त्यामुळे हा बदल दिसतो आहे, असं मत चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केलं.

नवीन दिग्दर्शकांना निर्मात्यांकडून संधी दिली जाते आहे हे वास्तव आहे. पूर्वी अमुक एक दिग्दर्शक श्रेष्ठ हे जे काही निर्मात्यांचे ठोकताळे होते ते गळून पडले आहेत. निर्माते स्वत:हून नवीन दिग्दर्शकांना वाव देतायेत. संजय छाब्रिया आहेत ज्यांनी निपुण धर्माधिकारीच्या ‘बापजन्म’ला साथ दिली. सोलापूरच्या मकरंद मानेला ‘रिंगण’साठी ‘वजनदार’सारखे चित्रपट देणारी विधी कासलीवाल प्रस्तुतकर्ता म्हणून लाभली त्यामुळे आज नव्या दिग्दर्शकांचे नवे चित्रपट पाहायला मिळतायेत. पण ही प्रक्रिया पुढे कशी जाईल? याचं उदाहरण देताना चित्रपट समीक्षक अमोल परचुरे यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीच्या आजच्या प्रगतीकडे लक्ष वेधलं. काही वर्षांपूर्वी फक्त राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्याळम चित्रपट असं आता मराठीत जे चित्र दिसतंय तसं तिथेही होतं. आज तिथे जी क्रांती झाली आहे ती केवळ नवीन दिग्दर्शकांच्या चित्रपटामुळे झाली आहे. तिथल्या नवीन दिग्दर्शकांच्या चित्रपटांना पृथ्वीराजसारखा अभिनेता असेल, मामुटीचा मुलगा दलकेर सलमान यांच्यासारख्या नावाजलेल्या कलाकारांनीही साथ दिली. त्यांनी दिग्दर्शक जे सांगले त्या पद्धतीने काम केले त्यामुळे मल्याळम चित्रपट व्यावसायिकदृष्टय़ाही यशस्वी झाले. आज मुंबईतही मल्याळम चित्रपट सातत्याने प्रदर्शित केले जात आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीत जे घडलं आहे तीच नव्या विचारांची प्रक्रिया, संस्कृती मराठीतही येते आहे, असं परचुरे यांनी स्पष्ट केलं. मात्र अजूनही नव्या दिग्दर्शकांना चित्रपट व्यावसायिकदृष्टय़ा चालवण्याची समीकरणं अवघड जात आहेत अर्थात त्यामागची कारणंही तशीच असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

सध्या मराठीत जे तरुण दिग्दर्शक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने, प्रवाहातून पुढे आलेले आहेत. आदित्य सरपोतदारला चित्रपटनिर्मिताचा वारसा आजोबांकडून मिळाला आहे. घरातूनच मिळालेल्या अनुभवामुळे दिग्दर्शक म्हणून वावरताना तो व्यावहारिक दृष्टीनेही सजग आहे. यात बरेचसे दिग्दर्शक हे माध्यमांची जाण असलेले आहेत, काही टेलिव्हिजनकडून चित्रपटाकडे वळलेले आहेत तर काही महोत्सवांतील चित्रपट पाहून घडलेले आहेत. यात जे खरोखरच सक्षमतेने हे माध्यम हाताळू शकतील ते इथे टिकतील, असं दिलीप ठाकूर यांनी सांगितलं. तर वेगवेगळ्या प्रवाहातून आलेल्या या मंडळींना आपला चित्रपट निर्मात्यांपर्यंत कसा पोहोचवायचा हे चांगलं ठाऊक असल्याने ते त्याचा पुरेपूर वापर करून आपले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडतायेत, असं अमोल परचुरे यांनी सांगितलं. ‘चुंबक’चंच उदाहरण घ्यायचं तर संदीप मोदीने याआधी राम मधवानी या प्रसिद्ध जाहिरात-चित्रपट दिग्दर्शकाकडे काम केलेलं आहे. राम मधवानींना ‘नीरजा’ चित्रपटासाठी त्याने साहाय्य केलं होतं. त्यामुळे साहजिकच ‘चुंबक’साठी स्वत: राम मधवानी चित्रपटासाठी हजर राहिले होते. राम मधवानींनी चित्रपट पाहिला म्हणजे त्याची हिंदीतही चारचौघांकडे चर्चा होणारच. वरुण नार्वेकरचा ‘मुरांबा’ हा पहिलाच चित्रपट होता. म्हटलं तर हा व्यावसायिक चित्रपट पण तटस्थपणे पाहिलं तर तो महोत्सवातला चित्रपट आहे हेही जाणवतं. खुद्द वरुणने ‘कासव’साठी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर जोडीबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे या तरुण दिग्दर्शकांनी हे चित्रपटांमधले बारकावे नीट समजून घेतलेले आहेत. हिंदीत आनंद एल. राय, बोनी कपूर, अनुराग कश्यप यांच्यासारखी मंडळी आहेत जी चांगल्या विषयांना नेहमी आर्थिक पाठिंबा देतात त्यांच्यापर्यंत आपले विषय पोहोचवण्याचं कसब या दिग्दर्शकांकडे आहे. त्यांची दमछाक वेगळ्या कारणाने होते. दिग्दर्शकाला चित्रपट पूर्ण केल्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनमध्येही लक्ष घालावं लागतं, आपला चित्रपट मार्केटमध्ये कसा पोहोचेल यासाठीही त्यांनाच झगडावं लागतं आणि तिथे ते पार थकतात. हिंदीत दिग्दर्शक चित्रपट झाला की त्यात लक्ष घालत नाही. तिथे प्रत्येक कामासाठी वेगळी टीम असल्याने दिग्दर्शक आपली सर्जनशील शक्तीच पणाला लावतो. इथे तसं होत नसल्याने नवीन दिग्दर्शकांना चित्रपट चालवण्याचं गणित अवघड होऊन बसतं, असं मत परचुरे यांनी मांडलं.

नवीन दिग्दर्शकांसमोर चित्रपट निर्मितीचं गणित जसं अवघड आहे तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेक्षकांना चित्रपटापर्यंत आणणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. एकीकडे नव्या दिग्दर्शकांचे चित्रपट शहरी भागापलीकडे जाणारे नाहीत, अशी एक तक्रार असते. पण या दिग्दर्शकांनी सिनेमाची परिभाषा बदललेली आहे. व्यावासायिक चौकट सांभाळतानाही दिग्दर्शकीय मूल्य तितकीच दर्जेदार ठेवताना सिनेमाच्या तांत्रिक बाजूंचा प्रभावी विचार करून ते चित्रपट बनवतात. मात्र चित्रपट कशा पद्धतीने पाहायचा, समजून घ्यायचा हे अजूनही प्रेक्षकांना लक्षात येत नसल्याने हा बदल त्यांच्यासाठी जड जातो आहे. त्यामुळे तरुण दिग्दर्शकांच्या हातात मराठी चित्रपटांचं माध्यम असलं तरी ते व्यावसायिकरीत्या चित्रपट यशस्वी करण्याचं गणित साधण्यासाठी त्यांना काही अवकाश जावा लागेल, असं मत जाणकार व्यक्त करतात.