ज्येष्ठ पाश्र्वगायिका पुष्पा पागधरे यांनी मराठी आणि हिंदीव्यतिरिक्त बंगाली, भोजपुरी, गुजराथी, मारवाडी, ओडिया, गुजरी आदी भाषांतूनही गाणी गायली आहेत. त्यांनी आजवर गायलेल्या गाण्यांची संख्या सातशेहून अधिक आहे. राम कदम यांनी ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेली ‘तोतापुरी आंबा तोडू नका थांबा, त्याच्या कोयीत लपलाय भुंगा’ ही लावणी पुष्पा पागधरे यांनी गायली. चित्रपटासाठी पाश्र्वगायन केलेले त्यांचे हे पहिले गाणे. पुढे राम कदम यांच्यासह पं. यशवंत देव, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, बाळ पळसुले, श्रीकांत ठाकरे, अशोक पत्की, स्नेहल भाटकर, राम लक्ष्मण आणि अनेक संगीतकारांकडे चित्रपट व गरचित्रपट गाणी त्यांनी गायली. ‘लता मंगेशकर’ पुरस्काराच्या निमित्ताने पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या ‘अहो राया मला पावसात नेऊ नका’, ‘अगं पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी’ आणि ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’या गाण्यांविषयी..

अहो राया मला पावसात नेऊ नका..

deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Loksatta career article about A career in singing
चौकट मोडताना: गोड गळय़ाच्या मल्हारचे बाबा
Shigeichi Negishi
व्यक्तिवेध: शिगेइची नेगिशि

एखादे गाणे ललाटी भाग्य घेऊन येते. जे ठरविलेले असते ते होत नाही, नियती वेगळेच काहीतरी घडविते आणि एखाद्याचे नशीब उजळते. दादा कोंडके यांच्या ‘सोंगाडय़ा’ चित्रपटासाठी वसंत सबनीस यांनी लिहिलेले आणि राम कदम यांनी संगीतबद्ध केलेले ‘ते’ गाणे खरे तर लताबाई गाणार होत्या. दादांचीही तशी इच्छा होती. पण काही कारणाने लताबाई ते गाणे गाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे राम कदम यांनी ते गाणे पुष्पा पागधरे यांच्याकडून गाऊन घेतले. ‘ते’ गाणे लोकप्रिय झालेच, पण पुष्पा पागधरे यांच्यासाठी त्या गाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत पाश्र्वगायनाचे दरवाजे उघडले गेले. ललाटी भाग्य घेऊन आलेले ते गाणे ‘अहो राया मला पावसात नेऊ नका’ हे होते. दादांचा राम कदम यांना दूरध्वनी गेला. ‘सोंगाडय़ा’ चित्रपटातील या गाण्याचे चित्रीकरण कोल्हापुरात करायचे आहे. तेव्हा लताबाईंशी बोलून, त्यांची वेळ घेऊन गाण्याचे ध्वनिमुद्रण करून घ्या आणि गाणे घेऊन इकडे या. राम कदम लताबाईंकडे गेले. त्यांना त्या वेळी गाणे गायला जमणार नव्हते. त्यांनी नाही म्हटल्यानंतर राम कदम यांनी ते पुष्पा पागधरे यांच्याकडून गाऊन घ्यायचे ठरविले. कदम यांच्याकडे ढोलकीवादन करणाऱ्या पंडित विधाते यांना त्यांनी पुष्पा पागधरे यांच्या घरी पाठविले आणि मुंबईत बॉम्बे लॅबमध्ये ध्वनिमुद्रणासाठी यायला सांगितले. दादांच्या चित्रपटासाठी गाणे गायची संधी मिळाली यांचा आनंद होताच, पण चांगल्या प्रकारे गाऊ का, अशी भीतीही त्यांच्या मनात होती. ध्वनिमुद्रणापूर्वी गाण्याची तालीम झाली. राम कदम यांनी तू गाणे चांगलेच गाशील असा आत्मविश्वास दिला आणि गाण्याचे ध्वनिमुद्रण पार पडले.

गाण्याची टेप घेऊन राम कदम कोल्हापूरला गेले. उषा चव्हाण यांच्यावर हे गाणे चित्रित झाले. चित्रीकरण पार पडल्यानंतर राम कदम यांनी दादांना, हे गाणे लताबाईंनी नव्हे तर पुष्पा पागधरे यांनी गायले असल्याचे सांगून आपण हे गाणे पुन्हा लताबाईंकडून गाऊन घेऊ, असे सांगितले. पण दादांनाही पुष्पा पागधरे यांनी गायलेले ते गाणे आवडले. त्यांच्या खास शैलीत त्यांनी राम कदम यांना पुष्पाने गाणे छान गायले आहे. तिच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेले हे गाणे ठेवू या, असे सांगितले.

अगं पोरी संभाल दर्याला तुफान..

पुष्पा पागधरे यांनी मोहमद रफी यांच्याबरोबर गायलेले ‘अगं पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी’ हे द्वंद्वगीतही लोकप्रिय आहे. ‘अगं पोरी’चे संगीत श्रीकांत ठाकरे आणि गीतकार वंदना विटणकर यांचे आहे. ठाकरे यांनी हे गाणे रफीसाहेबांबरोबर गायचे आहे असे पुष्पा पागधरे यांना सांगितले तेव्हा त्यांना भीती वाटली. इतक्या मोठय़ा गायकाबरोबर गायचे दडपण त्यांच्यावर आले. पण रफीसाहेबांनी मोकळेपणाने बोलून त्यांच्यावरील दडपण दूर केले. ते स्वभावाने खूप साधे होते. मोठेपणाचा थोडाही गर्व त्यांना नव्हता. याचा प्रत्यय पागधरे यांना त्यांच्याबरोबर हे गाणे गाताना आला. त्या गाण्यातील एका कडव्यात ‘तू माझी नवरी’ अशी एक ओळ आहे. त्या ओळीला रफीसाहेबांनी शिट्टी वाजविली. पण नंतर लगेचच तुम्हाला राग नाही ना आला, असे त्यांनी पुष्पा पागधरे यांना विनम्रपणे विचारले.

इतनी शक्ती हमे दे न दाता..

‘अंकुश’ चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ याचे संगीत कुलदीप सिंह यांचे आहे. हे गाणे पुष्पा पागधरे यांनी गायले तेव्हा ते इतके लोकप्रिय होईल, असे त्यांनाही वाटले नव्हते. पण आज इतक्या वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. काही शाळांमधून आजही हे गाणे प्रार्थना म्हणून म्हटले जाते किंवा याची ध्वनिमुद्रिका लावली जाते. अनेकांच्या भ्रमणध्वनीवर हे गाणे ‘रिंगटोन’ किंवा ‘कॉलरटय़ून’ म्हणून ठेवलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सनिकांसमोर पुष्पा पागधरे यांनी ते गाणे म्हटले तो अनुभव अविस्मरणीय होता. नवी दिल्ली येथील पंजाब नॅशनल बॅंकेत कार्यालयीन कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी हे गाणे लावले जाते. त्यांचा गाण्यांचा कार्यक्रम ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ या गाण्याशिवाय पूर्णच होत नाही.

(संकलन-शेखर जोशी)