मराठी नाटकांची सुरुवात संगीत रंगभूमीपासूनच झाली. विष्णुदास भावे यांना मराठी संगीत रंगभूमीचे जनक मानले जाते. १८४३ मध्ये सांगली येथे विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम खऱ्या अर्थी रुजवण्यात बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मोलाचे प्रयत्न केले. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत शाकुंतल’ने झाली. ‘संगीत रंगभूमी’ हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो. अनेक दिग्गज नाटककार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, अभिनेते-गायकांनी मराठी संगीत रंगभूमी समृद्ध केली आणि आपल्या प्रतिभेचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मराठी संगीत रंगभूमी आणि नाटय़पदे ही मराठी रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ आहे.

काळानुरूप संगीत रंगभूमीचे महत्त्व हळूहळू लोप पावत जाऊन संगीत नाटके सादर होण्याचे प्रमाणही कमी झाले. काही वर्षांपूर्वी नाटककार आणि पत्रकार दिवंगत विद्याधर गोखले यांनी काही संगीत नाटके लिहून संगीत नाटकांना पुन्हा एकदा पुनरुज्जीवन दिले. संगीत रंगभूमीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने काही संस्था आजही प्रयत्नशील असून जुनी संगीत नाटके पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर होत आहेत. यात नुकत्याच सादर झालेल्या ‘धि गोवा हिंदू असोसिएशन-कला विभाग’ निर्मित आणि ‘नाटय़संपदा कला मंच’ प्रकाशित ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकाचा समावेश आहे. प्रशांत दामले, राहुल देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेले ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटकही काही महिन्यांपूर्वी नव्या स्वरूपात रंगभूमीवर सादर झाले होते.

Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती

संगीत नाटकांची परंपरा हळूहळू लोप पावत चालली असताना आणि ते नाटक किती ‘चालेल’ याची खात्री नसतानाही नव्या संचात ‘संगीत मत्स्यगंधा’ रंगभूमीवर प्रकाशित केलेले ‘नाटय़संपदा कला मंच’चे अनंत पणशीकर म्हणाले, आम्ही या आधीही ‘अवघा रंग एक झाला’ आणि ‘जगणे व्हावे गाणे’ ही दोन नवी संगीत नाटके सादर केली होती. मराठी संगीत रंगभूमीवर ‘मत्स्यगंधा’ नाटकाला विशेष स्थान आहे. हे नाटक आणि त्यातील नाटय़पदे आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे जुन्या संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन व्हावे, नवीन पिढीला जुन्या व दर्जेदार संगीत नाटकाची ओळख व्हावी आणि जुन्या पिढीतील लोकांचे ‘स्मरणरंजन’ व्हावे हाही उद्देश यामागे होता. ‘वस्तू व सेवा’कराचा (जीएसटी) चा फटका नाटय़व्यवसायाला बसलेला असतानाही आम्ही या नाटकाचे दर सगळ्यांना परवडतील असे २५० व २०० रुपये असेच ठेवले आहेत. प्रेक्षकांचाही प्रतिसाद चांगला मिळतो आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस आमचे इंदूरला पाच प्रयोग लागले आहेत.

तर पन्नास वर्षांपूर्वी हे नाटक सादर करणाऱ्या ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ने पुन्हा एकदा हेच नाटक पुन्हा नव्याने का सादर केले, याविषयी असोसिएशनचे सचिव अभिजित सालेलकर यांनी सांगितले, तरुण पिढीला एका उत्तम संगीत नाटकाची ओळख व्हावी आणि या पिढीला पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळवून घेण्यासाठी आम्ही हे नाटक नव्याने रंगभूमीवर सादर करण्याचे ठरविले. संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचे वैभव असून त्याचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे हा विचार यामागे होता. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिक फायद्याचा विचार न करता आम्ही हे नाटक रंगभूमीवर पुन्हा एकदा नव्याने  सादर केले आहे.

मराठी संगीत नाटके रंगभूमीवर सादर होत असली तरी तरुण गायक-अभिनेते मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. याला ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या नाटक विभागाचे सुभाष भागवत यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले, संगीत नाटकांना चांगले गायक अभिनेते मिळावे यासाठी ‘मुंबई मराठी साहित्य संघा’तर्फे गेली चार वर्षे राज्यस्तरिय नाटय़संगीत स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेतून मिळालेल्या गुणी गायकांना घेऊन आम्ही ‘प्रीतिसंगम’, ‘संगीत कान्होपात्रा’ ही संगीत नाटके सादर केली. सध्या नव्याने सादर झालेल्या ‘मत्स्यगंधा’ नाटकातील नचिकेत लेले व केतकी चैतन्य हे दोघेही आमच्या स्पर्धेतील विजेते आहेत. अलीकडच्या तरुण गायकांना ‘गायक-अभिनेता’ म्हणून संगीत नाटकात काम करण्यात फारसा रस नसतो. संगीत नाटकांपेक्षा केवळ गाण्यांचे कार्यक्रम सादर करण्याकडे त्यांचा अधिक ओढा असतो. तिथे ‘मानधन’ही चांगले मिळते. तुलनेत संगीत नाटक किती चालेल, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत फारशी खात्री नसल्याने संगीत नाटकातून काम करणे ‘करिअर’ म्हणून आजच्या तरुण गायकांना कठीण वाटते. पण असे असले तरी संगीत नाटके मोठय़ा प्रमाणात सादर झाली पाहिजेत. त्या नाटकांना तरुण पिढीच्या प्रेक्षकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे, हे भागवत यांनी आग्रहाने सांगितले.

‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकातील तरुण अभिनेता नचिकेत लेले म्हणाला, ‘‘रामदास कामत यांच्याकडून नाटय़पदे शिकायची संधी मला या निमित्ताने मिळाली हे माझे भाग्य आहे. गाणे नेमके कसे सादर करायचे, त्यातील भाव प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचविला पाहिजे, यासाठी नाटकाच्या दिग्दर्शिका संपदाताई जोगळेकर-कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. मराठी भाषेचे सौंदर्य आणि पल्लेदार भाषा या निमित्ताने अभ्यासता व शिकता आली. यापुढेही संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळाली तर काम करायला मला नक्की आवडेल.

विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठानतर्फे नाटय़संगीताचा पदविका अभ्यासक्रम चालविण्यात येतो. पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना घेऊन प्रतिष्ठानतर्फे नाटय़संगीत किंवा संगीत रंगभूमीशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. संगीत नाटकांच्या भवितव्याविषयी बोलताना प्रतिष्ठानच्या शुभदा दादरकर यांनी सांगितले, जर नव्या संगीत नाटकांच्या संहिता  मिळत नसतील आणि जुनीच संगीत नाटके पुन्हा सादर होणार असतील तर ही जुनी नाटके नव्याने सादर करताना त्यात काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. ते संगीत नाटक असले तरीही त्यातील ‘नाटय़’ महत्त्वाचे आहे. संगीत हे साधन आहे ते साध्य नाही. नाटय़ापेक्षा संगीत वरचढ होऊ नये. तसेच संगीत नाटक हा ‘फॉर्म’ म्हणून जिवंत राहिला पाहिजे की त्यातील नाटय़संगीत याचाही विचार झाला पाहिजे. नाटकात एखादी बंदिश असेल तर ती आलाप, ताना घेत सादर करायला हरकत नाही पण जर ते भावगीत स्वरूपाचे असेल तर केवळ संगीत नाटक आहे म्हणून अट्टहासाने आलाप/ताना घेतल्या जाऊ नयेत. नव्या पिढीलाही संगीत नाटक आवडते. त्यामुळे ही काही पथ्ये जर पाळली तर संगीत रंगभूमीला नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे, असा विश्वास दादरकर यांनी व्यक्त केला.