काश्मीर घाटीतली एक लाजाळू, सतत स्वत:त रमणारी एक मुलगी अपघाताने अभिनयाकडे वळली काय.. तिला शाळेत नाटकात काम करण्याची संधी मिळाली. नेहमी अशा गोष्टींपासून दूर राहणाऱ्या या मुलीने झायराने ते नाटक मनापासून केलं. ते लोकांना आवडलं. तिची छायाचित्रं तिच्याही नकळत त्यावेळी काश्मीरमध्ये ‘दंगल’ चित्रपटासाठी कलाकारांचा शोध घेणाऱ्या कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांच्याकडे पोहोचलं काय आणि तिला ऑडिशनला बोलावलं गेलं. ती ऑडिशनसाठी पोहोचली खरी, पण तेव्हाही आपल्यासारख्या आळशी आणि लाजाळू मुलीला कोणीही चित्रपटात घेणार नाही, यावर तिचा ठाम विश्वास होता. पण तरी तिची ऑडिशन चांगली झाली आणि ही मुलगी थोडय़ाच दिवसांत रुपेरी पडद्यावर ‘धाकड गर्ल’ म्हणून लोकप्रियही झाली. झायरा पुन्हा एकदा आमिर खानबरोबर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातून दिसणार आहे. ‘दंगल’पेक्षा यावेळी मी जरा अभिनेत्री म्हणून गांभीर्याने काम केल्याचं ती मिश्कीलपणे सांगते.

झायराबरोबर बोलताना ‘दंगल’ हा विषय पहिल्यांदा येतो. आत्तापर्यंत ‘दंगल’विषयी खूप बोलून झालं आहे आणि तरीही जेव्हा जेव्हा या चित्रपटाचा विचार मनात येतो किंवा तसा प्रश्न विचारला जातो तेव्हा एकच मनापासून सांगावसं वाटतं की ‘दंगल’ हा माझ्यासाठी चित्रपट उरलेला नाही. तो माझ्यासाठी आता एक अविस्मरणीय अनुभव आहे, एक आठवण आहे जी कायम लक्षात राहील. त्या आठवणीत शिरलं की पुन्हा पहिल्यापासून मनातल्या मनात सगळं आठवायला लागतं. त्यामुळे हा चित्रपट होऊन गेला आहे. त्यानंतर मी दुसरा चित्रपट केला. आमिर सरांबरोबर पुन्हा काम केलं तरी ‘दंगल’ विसरणं शक्य नाही, असं झायरा सांगते. झायरा वासिम हे नाव देशभर लोकप्रिय झालं आहे. तिच्याविषयी सातत्याने बोललं जातं. ‘दंगल’नंतरचं हे आयुष्य कसं आणि किती बदललं आहे विचारल्यावर या चित्रपटानंतर खूप लोकप्रियता मिळाली आहे. पण माझं व्यक्तिगत आयुष्य फार बदललेलं नाही. मी अजूनही तशीच लाजाळू आहे. पहिल्यापेक्षा आता लोकांशी जास्त बोलते, सहजतेने बोलू शकते पण तरीही माझा स्वभाव आत्मकेंद्री आहे. तो अजून तितकासा बदललेला नाही, असं ती स्पष्ट करते. मात्र झायरा आपण लाजाळू आहोत, बोलायला घाबरतो असं कितीही सांगत असली तरी समाजमाध्यमांवर ती अनेकदा महत्त्वाच्या विषयांवर कायम भूमिका मांडत आली आहे. एखाद्या घटनेवर ती कित्येकदा निर्भीडपणे आपलं मत मांडताना दिसते. याकडे तिचं लक्ष वेधलं असता समाजमाध्यमांवर किंवा एखाद्या विषयावर भूमिका घेणं ही फार वेगळी गोष्ट असल्याचं ती म्हणते. जिथे आपलं मत मांडणं महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं तिथे सहजपणे मी व्यक्त होते. त्यावेळी मी व्यक्त होऊ की नको, असा विचार करावा लागत नाही. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत असायला हवं. जिथे आपली भूमिका मांडणं गरजेचं असतं तिथे तुम्ही अन्य कोणाचाही विचार न करता आपल्याला जे समजतं ते मांडलं पाहिजे, असा आग्रह ती धरते.

‘सिक्रेट सुपरस्टार’ हा तिचा आमिर खानबरोबरचा आणि कारकीर्दीतीलही दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दलचा अनुभव कसा होता? यावर मुळातच कारकीर्द या शब्दावर आपण फारसा विचार केलेला नाही असं ती म्हणते. ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या ऑडिशन सुरू होत्या त्यावेळीही मला भूमिका मिळणार नाही, याची मला खात्री होती. पण माझी निवड झाल्यानंतर जरा मी गांभीर्याने काम सुरू केलं, असं ती सांगते. या चित्रपटात गायिका होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या मुलीची भूमिका झायरा करते आहे. ‘हा चित्रपट करताना मला दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे गिटार वाजवणं आणि दुसरं गाणं. मी खरोखर गिटार वाजवते आहे हे पडद्यावर दिसलं पाहिजे. हा दिग्दर्शकाचा आग्रह होता. आमिर सरांनी पण हीच गोष्ट सांगितली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी मी गिटार शिकले. आणि दुसरं म्हणजे मला गायचं होतं. माझ्यासाठी जिने गाणी गायली आहेत त्या मेघना मिश्राला मी जाऊन भेटले. प्रत्येक गाणं ती कशी गाते आहे, तिच्या ताना-आलाप या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. कारण त्यानुसार मला कॅमेऱ्यासमोर गाण्याचा अभिनय करायचा होता. या दोन गोष्टी मी प्रामुख्याने भर देऊन शिकून घेतल्या, असं तिने सांगितलं. ‘दंगल’नंतर काश्मीरमध्ये तिला लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला, याबद्दल बोलताना तिथली लोक खूप खूश आहेत माझ्यावर असं ती म्हणते. ‘दरवेळी मी तिथे गेली की लोकांचं खूप प्रेम मला मिळतं. ते माझ्याबरोबर बोलण्यासाठी उत्सुक असतात. माझ्याबरोबर छायाचित्र काढून घेतात. हे सगळं मला कधीकधी गोंधळात टाक तं’, असं तिने सांगितलं.

आमिर खान हा तिच्या आयुष्यातील परवलीचा शब्द झाला आहे. आमिर खान.. मी पहिल्यांदा ऑडिशनला गेले तेव्हा त्यांना पाहिलं. मी फार चित्रपट पाहते असं नाही, पण जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी ऑडिशन देतानाचे डायलॉगच विसरून गेले होते. त्यानंतरही ते समोर आल्यानंतर कित्येकदा मला डायलॉग बोलायला सुचायचेच नाहीत. पण आता माझ्यासाठी त्याचं एक खास स्थान मनात आहे. त्यांच्याबद्दल काय वाटतं हे मला शब्दांत कधीच व्यक्त करता येणार नाही, असं ती म्हणते. ‘सिक्रेट सुपरस्टार’नंतर झायराला पुन्हा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन चित्रपट पूर्ण केले आहेत. तिसराही करायची तयारी झाली आहे. मात्र अजूनही यातच कारकीर्द घडवायची आहे किंवा आणखी काय करायचं आहे, याबद्दल निश्चित काहीही ठरवता आलेलं नाही. मला अजूनही माझ्या जगण्याचा उद्देश, कामाचा हेतू सापडलेला नाही. जोपर्यंत तो सापडत नाही, तोपर्यंत जसं जगत आले आहे तसंच जगायचा मानस असल्याचं ती सांगते. झायरा सध्या चित्रपटांच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्याला असली तरी काश्मीर सोडणं आपल्याला अशक्य असल्याचं ती सांगते. मला पुढेही या क्षेत्रात आले तरी काश्मीरच काय.. माझं तिथलं घर, माझी माणसं, तिथलं वातावरण हे सगळं सोडणं कधीच शक्य होणार नाही. तसा विचारही मला करावासा वाटत नाही, अशी ही सध्याची पडद्यावरची छोटी सुपरस्टार ठामपणे सांगते.