सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे मत

पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांना देशभरातून विरोध आणि समर्थन होत असताना सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी पाकिस्तानी कलाकारांना समर्थन करणाऱ्यांना फटकारले आहे.

बॉलीवूडने पाकिस्तानी कलाकारांना महत्त्व देण्याची आवश्यकता नसून, त्यांनी देशाच्या सीमेवर जाऊन लढणाऱ्या जवानांच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक भारतीय सैनिक देशाच्या सीमेवर दहशतवादाविरोधात लढत आहे. हा विचार सर्व भारतीय जनतेचा आहे.

सैनिकांपेक्षा कलाकार हे क्षुल्लक आहेत. त्यामुळे कलाकार काय बोलतात याला महत्त्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

दहशतवाद हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्या शत्रुविरोधात भारतीय सैनिक लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.