25 September 2020

News Flash

‘बाबासाहेबांना देव करून त्यांची मंदिरं करायच्या आधी…’

‘चला हवा येऊ द्या फेम’ अरविंद जगताप यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट व्हायरल

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट व्हायरल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती काल मोठ्या उत्साहात पार पडली. महामानवाच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांबरोबरच अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरही बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशाच सर्वच सोशल नेटवर्किंग साईट्सवर बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेकांनी पोस्ट आणि फोटोच्या माध्यमातून बाबासांहेबांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले. ‘चला हवा येऊ द्या’ फेम अरविंद जगताप यांनीही फेसबुकवर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विशेष पोस्ट केली होती. बाबासाहेबांचे वाचनावरील प्रेम, त्यांची चित्रकलेची आवड, जातीयवादाला त्यांचा असणारा विरोध अशा अनेक गोष्टींवर जगताप यांनी आपल्या पोस्टमधून भाष्य केलं आहे. काल रात्री उशीरा टाकलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

जगताप यांची फेसबुकवरील पोस्ट जशीच्या तशी…

बाबासाहेबांना डोळ्यांचा काहीतरी आजार झाला. नीट दिसेनासं झालं. लहान मुलासारखे अश्रू आले डोळ्यात. का? आता आपल्याला पुस्तकं वाचता येणार नाहीत म्हणून. पुस्तकांसाठी चक्क घर बनवणारा माणूस. आपण घराच्या कोपऱ्यात पुस्तकाचं एक कपाट असलं तरी किती थाटात सांगतो लोकांना. खरंतर बाबासाहेब खूप भावनिक होते. रागीट होते. टापटीप असणं आणि स्वच्छ राहणीमान आवडायचं त्यांना. किती छान माणूस होते. चित्रकलेत पण इंटरेस्ट. घर बांधायचं तर स्वतः बारकाईने लक्ष घातलं. मराठवाड्यात जाऊन शिक्षण संस्था सुरु केल्या तर बांधकामापासून प्राध्यापकांपर्यंत सगळ्या गोष्टीत बारीक लक्ष. एकदा तर म्हणाले माझ्यावर कर्जामुळे जप्ती आली तरी चालेल. पण बेलीफने पुस्तकांना हात लावला तर गोळी घालीन त्याला. उधार आणून वाचा पण पुस्तकं वाचा म्हणायचे. त्याकाळात बायको आधी आपली मैत्रीण असावी असे विचार होते. बरं गुरु कोण तर महात्मा फुले, कबीर आणि गौतम बुद्ध. बुद्धाला विपश्यनेचा आधुनिक मुलामा चढवलाय आज लोकांनी. कबीर नेमके काय म्हणाले होते हेच विसरून गेलेत लोक एवढा फिल्मी केलाय कबीराला. उरले महात्मा फुले. मला नेहमी वाटतं शिवाजी महाराज कसे असतील हे आपण चित्रात पाहतो. पण शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार पाहिला तर त्यांचे विचार जुळतात महात्मा फुलेंशी. म्हणून मराठी भाषेचे शिवाजी महात्मा फुले आहेत. एकदम थेट. शेतकऱ्यासाठी सच्ची तळमळ. बाबासाहेबांच्या गुरूला म्हणजे महात्मा फुलेंना आपण इथून पुढे मराठी भाषेचे शिवाजी म्हणायला पाहिजे. बरं त्यांनीच शिवाजी महाराजांची समाधी शोधलीय ना. जोतीरावांनी मूल दत्तक घेताना जात पाहिली नाही. बाबासाहेबांनी पण लग्न करताना जात पहिली नाही. आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की या सगळ्या महापुरुषांची जयंती सगळ्या जातीचे लोक साजरी करताना दिसताहेत. निदान फेसबुकवर तरी. पण या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय. पण सुरुवात झालीय याचा आनंद आहे. आपण एक आहोत. एक राहूया. मी आधी भारतीय आहे असं सांगणाऱ्या बाबासाहेबांना आपण एकमेकांच्या जातीचा उद्धार न करता आम्ही सगळे भारतीय आहोत असं मनापासून सांगणं ही खरी शुभेच्छा आहे. बाबासाहेबांना देव करून त्यांची मंदिरं करायच्या आधी त्यांना माणूस म्हणून समजून घेतले पाहिजे. कारण मंदिरांची आता भीती वाटायला लागलीय. आपल्या देवांना बदनाम करण्यात सगळ्यात पुढे आपला देश आहे.कुठल्याही मंदिराची दानपेटी कितीही मोठी असो मंदिरापुढे भिकारीच जास्त दिसतील. परदेशी लोक तेच फोटो काढून नेतील. मंदिराने देव जगभर पोचवला नाही आपलं दारिद्र्य जास्त पोचवलं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि हो बाबासाहेब तर स्वतःच म्हणाले होते मला देव करू नका. त्यांना आपला माणूस राहू द्या. देव करू नका. पुन्हा एकदा शुभेच्छा !

या पोस्ट खाली अनेकांनी कमेन्ट करुन जगताप यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2019 9:02 am

Web Title: arvind jagtaps facebook post about ambedkar jayanti went viral
Next Stories
1 ‘गेम ऑफ थ्रोन्स’… ही नक्की भानगड आहे तरी काय?
2 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निखिलचा मतदारांना मोलाचा सल्ला
3 … म्हणून आनंद आहुजा वडिलांऐवजी लावतो सोनमचं नाव
Just Now!
X