‘तंबाखू’ हा जगातील सर्वात प्राचीन व्यसनी पदार्थ म्हणून ओळखला जातो. खूप वर्षांपूर्वी वस्तुविनिमय प्रणाली अस्तित्वात असताना तंबाखूचा वापर ‘चलन’ म्हणूनही केला जात असे. परंतु धूर ओढणे, चघळणे, तपकीर वगैरे पद्धतींनी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूत ‘निकोटिन’ नावाचे अत्यंत विषारी रसायन असते. जे लाळेतून, श्वासातून तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात मिसळते. रक्तवाहिन्यांवर निकोटिनच्या होणाऱ्या दुष्परिणामांमुळे अनेक अवयव बिघडतात. परिणामी ओठ, जीभ, गाल, श्वसननलिकेचा ‘कर्करोग’ होतो. परंतु हे माहीत असतानादेखील जगातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये तंबाखू अग्रेसर आहे, कारण आज त्याची विक्री अजय देवगण, अक्षयकुमार, शाहरुख खान, सैफ अली खान यांसारख्या अनेक मोठय़ा नामवंत कलाकारांमार्फत केली जाते. अशी प्रतिष्ठित मंडळी जर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असतील तर आपणही करण्यास काय हरकत आहे? हा गैरसमज मनात बाळगल्यामुळे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात असतानाच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने ‘जेम्स बॉण्ड’फेम अभिनेता पिअर्स ब्रॉसननला नोटीस बजावली आहे. ब्रॉसननने पान मसाल्याचे ब्रॅण्डिंग त्वरित थांबवावे यासाठी दिल्ली सरकारच्या ‘तंबाखू नियंत्रण समिती’मार्फत ही नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पुढील दहा दिवसांत त्याने या नोटीसला उत्तर देणे अपेक्षित आहे. अन्यथा ‘तंबाखू उत्पादन अधिनियम ५’अंतर्गत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही पिअर्स ब्रॉसननला देण्यात आली आहे.पिअर्स ब्रॉसनन सध्या ‘पान बहार’ या पानमसाल्याच्या जाहिरातीत झळकतो आहे. ‘पान बहार’ हा जगातील सर्वात महाग पान मसाल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पानमसाल्याच्या निर्मितीसाठी सुपारी व तंबाखूचा वापर केला जातो. त्यामुळे कोणत्याही पदार्थाची जाहिरात केली जात असताना त्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाची ओळख ग्राहकाला करून देणे हे अनिवार्य आहे, मात्र पान बहारच्या जाहिरातीत कोठेही हा तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे नमूद केलेले नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या जाहिरातींमध्ये मूळ उत्पादन न दाखवता इतर पदार्थाची जाहिरात केली जात असल्याने ग्राहक त्याकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. म्हणून जाहिरात करणाऱ्याने त्यातील पदार्थाचे नाव घेणे गरजेचे समजले जाते. परंतु पान बहार कंपनीने या नियमाला बगल देऊन आपली जाहिरात केल्यामुळे त्यांचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर पिअर्स ब्रॉसननला ही नोटीस बजावण्यात आली आहे.