कलर्स मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेला ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली असून या आठवड्यात होणाऱ्या भागामध्ये दोन खास व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

स्वरसम्राट अशी ख्याती असलेले पं. सुरेश वाडकर आणि अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला अवधूत गुप्ते या भागात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या भागामध्ये प्रेक्षकांना संगीत क्षेत्रातील ही गुरु-शिष्याची जोडी दिसून येणार आहे. या कार्यक्रमामध्ये ही जोडी जुन्या गोड आठवणी देखील सांगणार आहेत. तसेच काही किस्से आणि गोष्टी देखील प्रेक्षकांना कळणार आहेत.

कार्यक्रमामध्ये सुरेश वाडकर यांनी बऱ्याच जुन्या आठवणी सांगितल्या असून ज्यामध्ये सुरेशजींनी त्यांची आणि पंचमदांची एक आठवण सांगितली. तसेच बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर यांच्या लग्नाबद्दलची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, अवधूतने देखील झेंडा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. यात त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना भूमिगत व्हावं लागलं होतं. इतकंच नाही तर यानंतर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अवधूतला फोन करुन मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं सांगितलं होतं.

गप्पा आणि किस्से यांसोबतच सुरेल अशी मैफल देखील कार्यक्रमामध्ये रंगली . सुरेश वाडकरांनी “ए जिंदगी गले लगाले” गाण सादर केलं. तेव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुनेचा हा विशेष भाग येत्या गुरु आणि शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.