छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील प्रत्येक पात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. निवेदिता सराफ साकारत असलेल्या आसावरीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेसुद्धा या मालिकेच्या प्रेमात पडल्या आहेत.

निवेदिता यांनी आशा भोसलेंची भेट घेतली असून या भेटीचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘त्यांनी जेव्हा सांगितलं की ते अग्गंबाई सासूबाई ही मालिका पाहतात, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी माझ्या कामाचंही कौतुक केलं,’ असं निवेदिता यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

आणखी वाचा : स्वप्नील जोशीच्या लेकीची नेटकऱ्यांना भुरळ; व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रेमाला कोणतीही परिसीमा किंवा व्याख्या नसते. त्याचप्रमाणे प्रेमाला वयाची मर्यादा किंवा समाजाची बंधनंही नसतात. असली, तरीही साथीदाराचा विश्वास आणि आपल्या माणसांची साथ या संघर्षालाही काहीशी सुकर करुन जाते. अशीच कथा या मालिकेची आहे. अनोखी कथा, दमदार कलावंत आणि उत्तम दिग्दर्शन यांमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली आहे. टीआरपीच्या यादीतही या मालिकेने बाजी मारली आहे.