अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख, सन्मानचित्र व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय स्वामीभूषण राज्य पुरस्कारासाठी मराठी चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ रानकवी ना. धों. महानोर यांना जाहीर झाला आहे. येत्या १६ जुलै रोजी गुरूपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

२९ जुलै १९८८ रोजी , गुरूपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली होती. यंदा मंडळाला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांनी अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ अक्कलकोटनिवासी ब्रह्मांडनायक स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्यस्तरीय आणि स्वामीसेवक जिल्हास्तरीय पुरस्कार महनीय व्यक्तींना दरवर्षी गुरूपौर्णिमेच्या दिवशी समारंभपूर्वक प्रदान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्काराच्या पहिल्या मानकरी प्रसिध्द गायिका आशाभोसले ठरल्या आहेत. तर राज्यस्तरीय स्वामीभूषण पुरस्काराचा पहिला मान चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी व ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना देण्यात येत आहे. जन्मेंजयराजे भोसले यांनी या पहिल्या पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर केली. राज्यस्तरीय स्वामीभूषण पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. हे पुरस्कार दरवर्षी दिले जाणार आहेत. त्यासाठी अन्नछत्र मंडळाने कायमस्वरूपी भरीव आर्थिक तरतूद केल्याचे भोसले यांनी सांगितले.

या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पं. ह्दयनाथ मंगेशकर आहेत. या समितीवर ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, संयोजक अनुषा अय्यर यांचाही समावेश आहे. गुरूपौर्णिमा तथा अन्नछत्र मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी धर्मसंकीर्तन तथा सांस्कृतिक संगीत सोहळ्याचेही आयोजन केले जाते. यात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांसह नामवंत कलावंत मंडळी सहभागी होतात, अशी माहिती जन्मेंजयराजे भोसले यांनी दिली.