वयाच्या ८१ व्या वर्षांतही तोच उत्साह आणि आवाजाची देणगी लाभलेल्या आशा भोसले यांनी आपण संगीतबद्ध केलेले गाणे गावे, असे मातब्बर संगीतकारांप्रमाणेच नवोदित संगीतकारांनाही वाटत असते. संगीतकार निखील महामुनी यांच्यासाठी हा ‘स्वराशा’योग ‘नटी’ चित्रपटासाठी जुळून आला आणि दीर्घकालावधीनंतर आशा भोसले यांनी मराठी चित्रपटाच्या एका गाण्यासाठी पाश्र्वगायन केले.   चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचा प्रवास आणि जीवनानुभव ‘नटी’मध्ये साकारण्यात आला आहे. चित्रपटातील ही नायिका मराठी चित्रपटातील सुमारे साठ ते सत्तर वर्षांपूर्वीची असल्याचे दाखविण्यात आले आहे. तिचा अभिनयप्रवास, नायिका होण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, जिद्द, येणाऱ्या अडचणी याचे सर्व सार चित्रपटाच्या शीर्षक गीतामध्ये दीपक अंगेवार आणि बाबा चव्हाण यांनी मांडले आहे. या गाण्याला खरा न्याय आशा भोसले याच देऊ शकतील, यावर निर्माते गिरीश भदाणे, संगीतकार आणि गीतकार यांचे एकमत झाले. संगीतकार निखील महामुनी यांनी आशा भोसले यांची भेट घेतली आणि चित्रपटातील हे शीर्षकगीत गावे, अशी विनंती त्यांना केली. त्यावर त्यांनी मला गाणे, शब्द आणि चाल आवडली तरच मी ते गाईन, असे महामुनी यांना सांगितले व गाणे आणि चाल पाठवून देण्याची सूचना केली आणि चार दिवसांनी फोन करायला सांगितले. आशा भोसले आपण संगीतबद्ध केलेले गाणे गातील का, त्यांना ते आवडेल का, अशी धाकधूक महामुनी यांना वाटत होती. पण दोन दिवसात त्यांचा दूरध्वनी आला आणि गाण्याचे ध्वनिमुद्रण कधी करायचे, असे त्यांनी विचारले आणि महामुनी यांच्यासह सगळ्यांना त्यांच्या कामाची पोहोचपावती मिळाली. आणि आशा भोसले यांनी चित्रपटातील हे गाणे गायले. त्यांनी गायलेल्या या गाण्याचे शब्द ‘मी नटी’ असे आहेत. हे गाणे अभिनेत्री तेजा देवकर यांच्यावर चित्रीत झाले आहे. चित्रपटाच्या सादरकर्त्यां नीता देवकर असून कथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.