सध्या लॉकडाउनमध्ये अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पहायला मिळते. अशात मिळालेल्या वेळात बॉलिवूड स्टार सलमान खान पाठोपाठ आता दिग्गज गायिका आशा भोसले यांनी स्वत:चं यूट्यूब चॅनेल लाँच केलं आहे. आशा यांनीच सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या ६४व्या वाढदिवशी आशा भोसले यांनी हा यूट्युब चॅनेल लाँच केला आहे. आशा भोसले यांनी त्यांच्या पहिल्यावहिल्या व्हिडीओतून गुरु श्री श्री रविशंकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.
यूट्यूबवर पदार्पण करण्याबाबत आशा भोसले यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सांगितलं की, “लॉकाडउनमुळे घरात बसून माझ्या नातवंडांना इंटरनेटचा वापर करत काम करताना पाहिले आणि हे सर्व काही माझ्यासाठी नवीन होते. मी त्यांच्याकडूच सर्व काही शिकले”. “अनेकांनी मला माझे विचार, अनुभव लिहिण्याचा सल्ला दिला होता. पण तेव्हा माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता. आता मी घरीच आहे. त्यामुळे मी माझा ८६ वर्षांचा अनुभव रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांना तो आवडेल, काही लोकांना विचार करायला भाग पाडेल तर काही लोकांना हसू येईल,” असे त्या पुढे म्हणाल्या.
आशा भोसले यांच्या पहिल्या गाण्याचे नाव ‘मै हू’ असे आहे. हे गाणं रजिता कुलकर्णी यांनी शब्दबद्द केलं असून रोहित श्रीधर यांनी संगीत दिलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 7:36 pm