‘ढळढळीत सूर्यप्रकाशात समोर उभा असणारा पर्वतही पहायचाच नाही असं ठरवलं तर तो दिसत नाही. यांना दु:खं नेमकं आहे कशामुळे? म्हणजे खरं तर असं, की जे खरं दु:खकारक आहे त्याला हे भिडतच नाहीत. एक वेगळंच छानसं, स्वत:चं ग्लोरिफिकेशन होऊ शकेल असं दु:ख ते कवटाळून बसले आहेत. आणि श्रेयस आणि प्रेयस याबद्दल चर्चा करत नियतीकडून पराभूत झालेले महानायक होऊ पाहताहेत. हे काय करणार सत्वशील नवनिर्मिती? यांना तर दोन्ही डगरींवर हात ठेवून सोयीस्कर मार्ग काढायचा आहे. मुळात ते ज्याची निर्मिती करण्यासाठी तडफडले असा दावा करतात, तेच इतकं मर्यादित आहे!’
आविष्कार निर्मित, मकरंद साठे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आषाढ बार’मध्ये नाटककार शूद्रकाने त्याच्याच काळातील नाटककार कालिदास आणि आजच्या काळातील प्रयोगशील नाटककार व चित्रपटकर्ता सिद्धार्थ यांच्या कलाकृती आणि त्यांच्या प्रत्यक्ष जगण्याचा विपर्यासी लसावि काढताना काढलेले हे जळजळीत उद्गार! शूद्रकाचं हे चिकित्सक अन् मार्मिक विधानच ‘आषाढ बार’ या नाटकाचं बीज आहे. मात्र, शूद्रकाच्या ‘मृच्छकटिकम्’ची नायिका वसंतसेना त्यावर थेट शूद्रकालाही सवाल करते की,‘तू स्वत:ला दीनदलितांचा कैवारी म्हणवतोस, त्यांच्यावर नाटकं लिहिली म्हणतोस. परंतु मी कायम तुझ्या आजूबाजूला होते. तुला जेव्हा जेव्हा मदतीची जरूर पडली तेव्हा मी हमखास हात पुढे केले. माझ्यावरूनच तू नाटकातलं पात्र रचलं. मीही सुंदर होते. संपन्न होते. पण मी पडले गणिका! तुला कायम ओढ राहिली ती (कालिदासाची प्रेयसी) मल्लिकासारख्या स्त्रियांची! मला कायमच नाकारलेस तू. कायमच माझा मनोभंग केलास..’
‘आषाढ बार’मध्ये प्राचीन काळातील नाटककार कालिदास आणि शूद्रक तसंच अर्वाचीन नाटककार मोहन राकेश आणि सिद्धार्थ यांना आषाढातल्या एका कुंद सायंकाळी बारमध्ये एकत्र आणलं आहे- त्यांच्या कलाकृतींची, त्यांच्या आयुष्याची, त्यांच्या सृजनधारणांची आणि त्यातल्या फोलपणाची चर्चा करण्यासाठी.. त्यातलं वैय्यथ्र्य दाखविण्यासाठी! विशेषत: कालिदास आणि सिद्धार्थ या दोन वेगवेगळ्या कालखंडातल्या नाटककारांना आमनेसामने आणून त्यांच्यातलं साम्य आणि त्या अनुषंगानं काळ बदलला तरी कलावंताची वृत्ती, त्याची मनोधारणा कशी बदलत नाही, हे दर्शविण्याचा प्रयत्न मकरंद साठे यांनी या नाटकात केला आहे. त्याकरता त्यांनी कालिदासाचं ‘शाकुंतल’, मोहन राकेशांचं ‘आषाढ का एक दिन’, शूद्रकाचं ‘मृच्छकटिकम्’ आणि सिद्धार्थच्या एका नाटकातील प्रवेश वानगीदाखल समोर ठेवून ही साधार चिकित्सा केली आहे. त्यातही मोहन राकेश यांनी कालिदासाच्या जीवनावर लिहिलेलं ‘आषाढ का एक दिन’ आणि सिद्धार्थचं नाटक तसेच या दोघांची आयुष्यं कशी समांतर आहेत, हे साठे यांनी यात दाखवलं आहे.
कलाकाराचा कलानिर्मितीसंबंधातील अंतरीचा झगडा आणि त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील जगण्याचा संघर्ष हे एकाच वेळी सुरू असतं. या संघर्षांचा त्यांच्या मनोभूमिकेवर, त्यांच्या सृजनावर कळत-नकळत परिणाम होतच असतो. स्वाभाविकपणेच त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतींतही पाहायला मिळतं. या सगळ्याशी झगडतच त्यांना यशस्वी व्हायचं असतं. आणि एकदा का यश मिळालं, की त्यांना अधिक मोठं अवकाश खुणावू लागतं. तिथंही यशस्वी होण्याचं आव्हान स्वीकारण्यास ते सिद्ध होतात. या साऱ्या प्रवासात ते आपल्या कलेचं आणि आयुष्याचं श्रेयस आणि प्रेयस हरवून बसतात. कलावंतच ते! आपल्या या अपयशाचं, पराभवाचं उदात्तीकरण करत लोकांच्या मनात आपल्याप्रती सहानुभूती निर्माण करून स्वत:ला महानायक बनवण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. आणि त्यात ते यशस्वीही होतात. कालिदास आणि सिद्धार्थ ही याची वानगीदाखल उदाहरणं (हे नाटककार साठे ‘आषाढ बार’मध्ये सिद्ध करू इच्छितात.)! त्यादृष्टीनंच त्यांनी या नाटकाची रचना केली आहे. त्याकरता वेगवेगळ्या काळातील या चार नाटककारांना एकत्र आणून त्यांनी त्यांच्यात संवाद व वादविवाद घडवून आणला आहे. वर त्यांचीच नाटकं यासाठी त्यांनी पुरावे म्हणून सादर केलीत. फक्त त्यांच्यात फरत आहे तो काळानुरूप बदललेल्या व्यवस्थेचा! कालिदासाच्या काळात राजसत्ता याकामी आपली भूमिका बजावत होती, तर आज ‘मार्केट इकॉनॉमी’ हे काम करते आहे! मोहन राकेश आणि शूद्रक यांनी या वादात फिर्यादीची भूमिका निभावली आहे. कालिदास आणि सिद्धार्थच्या आयुष्यातील प्रियतमा मल्लिका आणि नेहा यांनीही त्यांना जाब विचारण्याची संधी सोडलेली नाही. या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करताना, आपल्या कृतीचं समर्थन करताना हे नाटककार मात्र उघडे पडत गेले आहेत. अर्थात त्यांची म्हणून एक बाजू आहेच. तीही प्राप्त परिस्थिती आणि संभाव्यतेचा विचार करता ग्राह्य़च वाटते. नियती आणि परिस्थिती बऱ्याच वेळा माणसासमोर अवघड पेच उभे करते. अशावेळी साधकबाधक विचारांती सुचलेला फायद्याचा आणि परवडणारा मार्गच माणसं चोखाळतात. त्यात जसा त्यांचा स्वार्थ कार्यरत करत असतो, तसाच भविष्याचा विचारही. कालिदास काय वा सिद्धार्थ काय, त्यांनी पत्करलेले मार्ग दुसऱ्यांना आपमतलबी वाटले तरी त्यांच्याकरता ते कदाचित अपरिहार्यही असू शकतात. त्यांच्या भूमिकेतून विचार करता ते उचितही ठरू शकतात.
तथापि नाटककार मकरंद साठे यांनी यासंदर्भात उभा केलेला नैतिकतेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘आषाढ बार’मध्ये साठे यांना सर्जनशील कलावंतासमोरचे पेच आणि त्यांना भिडण्याची कलावंतांची मनोवृत्ती यांतली समानता अधोरेखित करायची आहे. मग काळ कुठलाही असो. अर्थात त्यापल्याड जात काही बंडखोर कलावंत या सापळ्यावरही मात करत आपला स्वतंत्र मार्ग चोखाळतात, हेही त्यांना मान्यच आहे. लेखक साठे यांनी या नाटकात कला, कलावंत, त्यांचं आयुष्य, त्यातले संघर्ष, कला आणि प्रत्यक्ष जीवनाचे परस्परांवर होणारे परिणाम आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या कलाकृती, त्यांचा दर्जा, नैतिकता, नियती व परिस्थितीचे तिढे अशा अनेकानेक विषयांवर चर्चा घडवून आणली आहे.
आजच्या माणसाची शतखंडित अवस्था आणि अस्मितेबद्दलचे संभ्रम या मुद्दय़ालाही त्यांनी हात घातला आहे. यात संहितेच्या रचनेचे प्रयोगही त्यांनी केले आहेत. पौराणिक नाटकासारखी नटी-सूत्रधार-विदूषक यांची पारंपरिक चौकट घेऊनही त्यांच्या तोंडी कालविसंगत विचार पेरून त्यांनी आपला नाटक लिहिण्यामागचा हेतू स्पष्ट केला आहे. या नाटककारांच्या नाटकांतले प्रवेश आणि त्यांच्या प्रत्यक्षायुष्यातले फ्लॅशबॅक, निवेदन, वादविवाद अशा विविध तंत्रांचा वापर करत त्यांनी नाटकाला एक वेगळाच घाट दिला आहे. वरकरणी जरी हे चर्चानाटय़ वाटत असलं, तरीही ते तितपतच मर्यादित नाहीए.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासाठीही हे नाटक म्हणजे एक मोठं आव्हान होतं. त्यातले प्राचीन-अर्वाचीन संदर्भ, भिन्न व्यक्तिरेखा, त्यांची वैचारिक- सामाजिक-सृजनशील बैठक, त्यातून उमललेल्या त्यांच्या कलाकृती, त्यांतले तिढे, या साऱ्याशी समांतर जाणारी या नाटककारांची आयुष्यं, त्यांतले पेच आणि त्यांना सामोरे जाताना या कलावंतांची सर्वार्थानं होणारी फटपट.. हे सारं यथार्थतेनं मांडताना या सगळ्याचा गोंधळी काला होऊ न देता त्याची कलात्मक मांडणी करणं, ही जीवघेणी कसरत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी अत्यंत आत्मविश्वासानं पेलली आहे. या नाटकात उच्चारित प्रत्येक शब्द आणि त्याला ओठंगून येणाऱ्या भावभावना आणि विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही सर्वाधिक कठीण बाब होती. पात्रांच्या बाह्य़ आणि अंतर्यामीच्या कल्लोळांची एकाच वेळी अभिव्यक्तीची मागणी करणाऱ्या या नाटकात ती पेलणारे कलावंत निवडणं ही अर्धी लढाई जिंकणारी गोष्ट होय. त्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. मानवी भावभावना, संवेदना, त्यांचं प्रत्यक्ष जगणं आणि त्यांचं सर्जन, त्याचं अर्थनिर्णयन, कलाविचार, कला व आयुष्याची सांधेजोड अशा अनेक पातळ्यांवर हे नाटक स्वैर संचार करतं. या सगळ्याबद्दलची वैचारिक घुसळण रंगमंचावर तसंच प्रेक्षकांच्या मनातही होत राहते. प्रेक्षागृहाबाहेर पडल्यावरदेखील ती पाठलाग सोडत नाही. यातच या नाटकाचं यश आहे.
प्रदीप मुळ्ये यांनी नाटकाचं केलेलं नेपथ्य स्थळकाळाचे तपशील व संदर्भ जिवंत करण्याबरोबरच प्रयोगाला आवश्यक ती लवचिकताही बहाल करतं. राहुल रानडे यांनी पाश्र्वसंगीतातून हेच काम केलं आहे. प्रतिमा जोशी (वेशभूषा) आणि रवि-रसिक (प्रकाशयोजना) यांनीही यात मोलाची साथ केली आहे.
यात मोहन राकेश यांचा अपवाद करता अन्य कलावंतांना दुहेरी भूमिका साकाराव्या लागल्या आहेत. एक- त्यांची प्रत्यक्षातली व्यक्तिरेखा आणि दुसरी- नाटय़ांतर्गत प्रवेशातील पात्र म्हणून! आशीष पाथोडे (कालिदास/ दुष्यंत), नितीन भजन (शूद्रक/ चारुदत्त), संतोष वेरुळकर (मोहन राकेश), सुव्रत जोशी (सिद्धार्थ/ राकेश), कल्याणी मुळ्ये (मल्लिका/ अनसुया), पूर्वी भावे (प्रियंवदा/ नेहा), प्रसाद बर्वे (विदूषक/ वेटर) आणि प्रज्ञा शास्त्री (नटी/ अंबिका/ वसंतसेना/ निवेदिता/ शकुंतला) या सर्वच कलावंतांनी सर्वस्व झोकून कामं केली आहेत. पात्रांचं बाह्य़ रूप तर त्यांनी साक्षात् दाखवलंच; परंतु त्यांचं अंतरंग, त्यातील खळबळ, उच्चारित शब्दांतले अनुच्चारित भाव, त्यामागचं सोसलेपण, कलेबद्दलची आच अन् ती साध्य करताना होणारी आत्मिक पडझड सर्वच कलावंतांनी अत्यंत तन्मयतेनं मूर्त केली आहे. नाटक प्रेक्षकांसोबत घरी येतं ते त्यामुळेच. मकरंद साठे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नाटय़प्रवासातील हे एक महत्त्वाचं नाटक आहे यात शंका नाही.
रवींद्र पाथरे