लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने ‘ती सध्या काय करतेय’ या चित्रपटाद्वारे मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. लक्ष्मीकांत यांचा मुलगा असल्याने त्याच्या पदार्पणाविषयी मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा झाली होती. ‘ती सध्या काय करतेय’नंतर नवीन काय, असा प्रश्नही विचारण्यात येत होता. निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा अभिनय मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटातून एकत्र काम केले होते. आता लक्ष्मीकांत यांच्या मुलासोबतही सचिन काम करणार आहेत. वडील आणि मुलगा या दोघांबरोबरही काम करण्याचा आगळा योग ‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने जुळून आला आहे. सचिन यांनी गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनय बरोबर हेमल इंगळे ही अभिनेत्री त्याची नायिका असणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ‘ती सध्या काय करतेय’या चित्रपटात काम केल्यानंतर अभिनयचा हा दुसरा चित्रपट असणार आहे.

‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’चा आज रौप्यमहोत्सवी प्रयोग

श्री वैश्वस्मै प्रॉडक्शन आणि वेद प्रॉडक्शन यांची निर्मिती असलेल्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या पुनरुज्जीवित नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग रविवार, ३ जून रोजी शिवाजी मंदिर येथे रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर हे या प्रयोगास उपस्थित राहणार आहेत. १९७३ मध्ये हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर सादर झाले होते. बबन प्रभू यांची या नाटकात मुख्य भूमिका होती.

नव्या संचात रंगभूमीवर सादर झालेल्या या नाटकाचे दिग्दर्शन संतोष पवार यांनी केले असून नयना आपटे, विनय येडेकर आणि संतोष पवार यांच्या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. संतोष पवार यांनी नाटकात ‘दिनू’ ही भूमिका साकारली आहे. विलास देसाई, इरावती लागू, रोनक शिंदे, वैभवी देऊलकर-धुरी, ऋतंभरा माने, दीपश्री कवळे आदी कलाकार या नाटकात आहेत.

‘लेथ’ यंत्राशी निगडित भावनांना उजाळा देणारा ‘लेथ जोशी’

काळानुरूप बदल अपरिहार्य असून ते आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात आणि जीवनाशी निगडित वेगवेगळ्या क्षेत्रांत होत असतात. संगणकीकरण, माहिती-तंत्रज्ञान महाजालाच्या वादळात कामगारवर्गही वेढला गेला आहे. ‘कॉस्ट कटिंग’च्या नावाखाली कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या लेथ यंत्राशी निगडित कथा आता मोठय़ा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न ‘लेथ जोशी’ या आगामी चित्रपटात करण्यात आला आहे.

अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांच्या अमोल कागणे स्टुडिओजने हा चित्रपट प्रस्तुत केला असून प्रवाहनिर्मिती आणि डॉन स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगेश जोशी यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान, ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाचा एक विशेष खेळ महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळींसाठी आयोजित करण्यात आला होता. या वेळी चित्रपटाच्या पोस्टरचेही प्रकाशन करण्यात आले. या चित्रपटाचा विषय वेगळा असून सत्य परिस्थितीवर भाष्य करणारा आहे. यंत्र आणि माणूस यांच्यातील नाते अधोरेखित करण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.

आजच्या संगणक युगात अनेक जुनी यंत्रे आणि त्यावर काम करणारे कामगार कालबाह्य़ झाले आहेत. अशा काळात ‘लेथ’ यंत्राची आठवण करून देणारा, त्या यंत्राशी जोडलेल्या भावनांना उजाळा देणारी कथा ‘लेथ जोशी’ चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाने जगभरातून बारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून वीस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाची निवड झाली आहे. येत्या १३ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.