News Flash

अशीही.. ‘श्यामची आई’!

सानेगुरुजींची ‘श्यामची आई’ ही एक अजरामर कलाकृती.

अशीही.. ‘श्यामची आई’!

सानेगुरुजींची ‘श्यामची आई’ ही एक अजरामर कलाकृती. आपल्या आईचं उत्कट अन् प्रत्ययकारी चित्र सानेगुरुजींनी या पुस्तकात उभं केलं आहे. तिची मूल्यं, संस्कार, नैतिकता आणि आदर्श यांतून आपण कसे घडत गेलो हे त्यांनी त्यात कथन केलं आहे. ‘श्यामची आई’ ही एक मापदंड म्हणून मराठी घराघरांत आजही अनुकरणीय मानली जाते. काळ बदलला, माणसं बदलली, त्यांची वृत्ती-प्रवृत्ती बदलली.. कालची आदर्श मूल्यं आजच्या व्यवहारी जगात बावळटपणाची ठरू लागली. परंतु तरीसुद्धा प्रत्येक पालकाला आपलं मूल सानेगुरुजींच्या ‘श्याम’सारखंच घडावं असं वाटत असतं. आई म्हणून स्त्रीसमोर श्यामच्या आईचाच आदर्श असतो. आई-मुलातलं हे हृद्य नातं हल्ली दुर्मीळ होत आहे. म्हणूनच त्याला कधी नव्हे इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. श्याम आणि त्याची आदर्श आई आज असती तर त्यांचं या स्वार्थाध जगात काय झालं असतं, असा प्रश्न संवेदनशील माणसाला पडल्याविना खचितच राहत नाही.

स्वप्नील जाधवलिखित आणि स्वप्नील बारसकर दिग्दर्शित ‘अशीही श्यामची आई’ हे नवं नाटक नुकतंच सुधीर भट थिएटरतर्फे रंगमंचावर आलं आहे. नावापासूनच या नाटकाबद्दलचं कुतूहल जागृत होतं. प्रथम एकांकिकेच्या रूपात मंचित झालेलं हे नाटक! एकांकिकेची वेस ओलांडून पूर्ण लांबीच्या नाटकाद्वारे ते पुनश्च अवतरेल असं वाटलं नव्हतं. कारण त्यातल्या कथाबीजाचा जीव लहान होता. स्पर्धेच्या गणितात तो एकांकिकेत चितारला होता. एकांकिका काहीशी भडक, आक्रस्ताळीच होती. त्यामुळे पूर्ण लांबीच्या नाटकात तिला पुन्हा सामोरं जाताना मनात आशंका येणं स्वाभाविक होतं. परंतु नाटक म्हणून ते थोडं वेगळ्या तपशिलांनिशी सादर केलं गेलं आहे. पूर्वीच्या मुंबईतल्या चाळसंस्कृतीची म्हणून एक खुमारी होती; जी या नाटकात अस्सल रूपात प्रकटली आहे. एकांकिकेत न आलेले श्यामच्या आईच्या मनातले कल्लोळ नाटकात तीव्रतेनं आले आहेत. तिच्या परिचित रूपाशी ते विसंगत वाटत असले तरी त्यास तार्किकतेची जोड दिली गेली आहे. त्यामुळे नाटक मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा अधिक खोलात शिरलं आहे.

नाटकाची कथा अशी :  श्यामची आई लहानपणापासूनच फिट्स येत असल्याने असंतुलित व्यक्तिमत्त्वाची शिकार आहे. मेंदूला रक्तपुरवठा नीट होत नसल्याने तिच्या वागण्या-बोलण्यात असंबद्धता आली आहे. या आजारापायी तिची मानसिक वाढ नॉर्मल झालेली नाही. तरीही श्यामच्या वडिलांनी तिच्यातल्या उणिवांसह तिला आपुलकीनं पत्करलं होतं. त्यांनी एखाद्या लहान मुलासारखं तिला जपलं. सांभाळलं. पण त्यांच्या अकाली जाण्याने  श्यामवर आईचं सारं करण्याची जबाबदारी येते. श्याम सर्वपरीनं तिला सांभाळायचा, समजून घेण्याचा, तिची उस्तवार करण्याचा कसोशीनं प्रयत्न करीत असतो. पण तिला अधूनमधून येणाऱ्या फिट्स आणि तिच्या बालिश, पोरकट हरकतींमुळे तो कधीतरी कातावतो. चाळीतल्या शेजाऱ्यांबरोबरच्या तिच्या व्यवहारानं त्याचा संयम क्वचित सुटतो. तिची आणि घरातली सगळी कामं आटपून ऑफिसला जायला त्याला नेहमी उशीर होतो. त्याची प्रेयसी मृण्मयी एकदा त्याच्या घरी येते आणि त्याच्या आईला पाहून तिला धक्काच बसतो. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची तिला प्रकर्षांनं जाणीव होते. खरं पाहता श्यामनं तिला आपल्या आईबद्दल सगळी कल्पना आधीच दिलेली असते. परंतु तरीही प्रत्यक्ष तिला भेटल्यावर मृण्मयीला श्यामबरोबरचं आपलं सहजीवन किती खडतर असेल हे कळून चुकतं. ती त्याला नकार देऊन निघून जाते.

दुसरीकडे आईचं सगळं करण्यापायी दररोज उशीर होत असल्यामुळे त्याची नोकरी जाते. सर्व बाजूंनी कोंडीत सापडलेला श्याम हतबल, असहाय होतो. आणि या सगळ्याला आई कारणीभूत आहे याचा भावनिक क्षोभ अनावर होऊन तो आईवर हात उचलतो.त्याच्या त्या संतप्त अवतारानं ती घाबरते. नैराश्यग्रस्त होते. आपल्या ह्य़ांनी मात्र कधीच आपल्याला असं वागवलं नाही, या जाणिवेनं ती आतून कोसळते. वैफल्याच्या त्या क्षणिक झटक्यातून सावरताच श्यामला आपण काय करून बसलो याची जाणीव होते. तो आईची क्षमा मागतो खरी; परंतु या धक्क्य़ातून तिला बाहेर कसं काढायचं, त्याला समजत नाही.

..अन् अकल्पितपणे त्याला मार्ग सापडतो.

लेखक स्वप्नील जाधव यांनी सानेगुरुजींच्या ‘श्यामची आई’च्या विरोधाभासी ‘अशीही श्यामची आई’ चितारली आहे. मुलाच्या भल्याचा विचार करण्याऐवजी त्याला शिव्याशाप देणारी, उथळ, उच्छृंखल, पोरकट वर्तन करणारी ही आई आहे. अर्थात त्यात तिचा दोष नाहीए. तिच्या आजारामुळे ती तशी बनली आहे. परंतु त्यामुळे घरी-दारी निर्माण होणारे प्रॉब्लेम हाही या नाटकातील समांतर विषय आहे. लेखकानं नाटकात चाळीची पाश्र्वभूमी घेतल्याने मनुष्यस्वभावाचे, मानवी वृत्ती-प्रवृत्तींचे नमुने त्यांना अंतर्भूत करता आले आहेत.. ज्यातून वातावरणनिर्मिती होते. मात्र, आई या प्रमुख पात्राचा विकास खुंटलेला असल्याने एक अडचणही उभी राहिली आहे. नाटक बराच काळ जिथल्या तिथं घुटमळत राहतं. परिणामी नाटकाची पकड ढिली होते. ही उणीव भरून काढण्यासाठी लेखकाला शेजारपाजारच्या चित्रविचित्र पात्रांची योजना करावी लागली आहे. नाटय़गत विरंगुळ्यासाठी जरी याचा उपयोग झाला असला तरी त्यामुळे नाटक थबकतं. यातल्या अनावश्यक तपशिलांस थोडी कात्री लावली तर नाटक अधिक प्रभावी होऊ शकेल. यात भावपरिपोष करणारा भाग आहे तो श्यामच्या होणाऱ्या मानसिक प्रवासाचा. आईचा मुलगा तर तो असतोच; पण पुढे तो तिच्या आणि आपल्या वडिलांचीही भूमिका आत्मसात करतो. हा त्याचा प्रवास नाटकात तरलतेनं येतो.

दिग्दर्शक स्वप्नील बारसकर यांनी पात्रं सजीव करण्यात विशेष मेहनत घेतली आहे. त्यांच्या व्यक्तित्वाचे कंगोरे, त्यांचं व्यक्त होणं, त्यांची भाषा, उच्चार, लकबी यांचा त्यांनी सूक्ष्मरीत्या विचार केल्याचं दिसतं. वातावरणनिर्मितीतही त्यांनी कसूर सोडलेली नाही. बाह्य ध्वनींबरोबरच प्रकाशयोजनेतून आणि पाश्र्वसंगीताच्या चपखल वापरातून त्यांनी चाळीचा माहौल उत्तम उभा केला आहे. श्यामची आई तसंच श्यामच्या भावनिक आंदोलनांचा आलेखही त्यांनी अचूक रेखाटला आहे. त्यातले सूक्ष्म ताण नजाकतीनं भरले आहेत.

प्रसाद वालावलकरांनी उभारलेलं चाळीचं नेपथ्य वास्तवदर्शी आहे. अभिजीत पेंढारकरांचं नाटय़परिणाम गडद करणारं पाश्र्वसंगीत आणि भूषण देसाईंच्या प्रकाशयोजनेतून झालेली सुसंगत वातावरणनिर्मिती यांनी नाटकाच्या निर्मितीमूल्यांत भर टाकली आहे. महेश शेरला यांची वेशभूषा आणि संदीप नगरकरांची रंगभूषा पात्रांना बाह्य़ व्यक्तिमत्त्व बहाल करते.

अतिशा नाईक या गुणी अभिनेत्रीने श्यामच्या आईला शरीराबरोबरच आत्माही दिला आहे. तिचं असंबद्ध वागणं-बोलणं, अकल्पित कृती यांतून तिच्या शारीरिक-मानसिक दौर्बल्याची जाणीव होतेच; परंतु अशा व्यक्ती कधी कधी नॉर्मलतेच्या सीमारेषेवर असताना होणारी त्यांची घालमेल, भावनिक तगमग त्यांनी उत्कटपणे व्यक्त केली आहे. तिची शारीरिक वाढ झाली असली तरी बौद्धिक वय मात्र तेवढं वाढलं नसल्याची जाणीवही होत राहते. ओमप्रकाश शिंदे यांनी मातृभक्त श्याम ठाशीव, पण संयतपणे उभा केला आहे. आईमुळे होणारी फरफट, त्यातून होणारी चिडचिड, हताशा, हतबलता आणि तरीही तिच्याबद्दल वाटणारं ममत्व त्यांनी प्रत्ययकारीतेनं दर्शवलं आहे. पौर्णिमा अहिरे-केंडे यांनी कजाग, पण माणुसकीचा अंश असलेल्या शेजारच्या राणेकाकी फर्मास वठवल्या आहेत. त्यांचा ‘बिच्चारा’ नवरा (राणेकाका) प्रवीण डाळिंबकर यांनी तितकाच फक्कड साकारला आहे. शुभम इंदुलकरचा उनाड पिंटय़ा छान. मृणालिनी जावळे (श्यामची प्रेयसी.. मृण्मयी) आणि सारंग शिरसाट (शेजारी) यांनीही आपली कामं चोख केली आहेत. विस्मृतीत गेलेली चाळसंस्कृती आणि एका जगावेगळ्या आईचं दर्शन घेण्यासाठी ‘अशीही श्यामची आई’ पाहायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2018 2:07 am

Web Title: ashi hi shyam chi aai new marathi drama
Next Stories
1 एकता कपूरचा भलता नियम..
2 एक गाव, बारा भानगडी
3 घुसमटीतून बाहेर पडण्याची धडपड
Just Now!
X