नीलेश अडसूळ 

वरकरणी आपण स्वत:ला पुरोगामी म्हणवत असलो तरी मनात मात्र अधोगामी विचारांची मुळं खोलवर रुजलेली असतात. संस्कृती, संस्कार, चारित्र्य, शील या गोष्टींना दिलेल्या नको तेवढय़ा महत्त्वामुळे. आपण काळाच्या पुढे जाणं तर सोडाच, पण काळाच्या बरेच मागे खेचले जात आहोत. मग अशा वेळी पुढचा विचार करणाऱ्याला कायम प्रश्न पडतो की, आपले विचार मांडावेत का? ते चुकीचे तर नसतील ना? लोक काय म्हणतील? आणि जिथे हा विचार येतो तिथेच नव्या विचारांचे खच्चीकरण केले जाते, पण काही तरुण मात्र ‘हाचि माझा मार्ग एकला’ म्हणत आपल्या कलेच्या माध्यमातून पुरोगामी विचारांची रुजवात करू पाहत आहेत. असाच प्रयत्न लेखक धर्मकीर्ती सुमंत आणि दिग्दर्शक अलोक राजवाडे यांनी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटातून केला आहे.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

‘आजच्या पिढीने जे बोलायला हवं ते आपण जाणीवपूर्वक टाळतो. अगदी सामाजिकच नाही तर अनेक वैयक्तिक विषयांकडेही समाजभीतीने आपण पाठ फिरवतो. त्यात जर कुणी लैंगिकतेच मुद्दा काढला तर त्याला सर्रास अश्लीलतेचं लेबल चिकटवून आपण मोकळे होतो. पण अश्लीलता म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याची आज गरज आहे, असे मत दिग्दर्शक अलोक राजवाडे, अभिनेता अभय महाजन, अभिनेत्री पर्ण पेठे आणि सायली फाटक यांनी ‘लोकसत्ता’शी गप्पा मारताना मांडले.

चित्रपटाच्या नावातच अश्लील हा शब्द आहे, त्यामुळे या शब्दाविषयी लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे या कलाकारांनी सांगितले. पुण्यातील वेगवेगळ्या भागात लोकांना या शब्दाबद्दल विचारणा केल्यानंतर जे जाणवलं ते मांडताना पर्ण आणि सायली सांगतात, की फक्त कमरे खालचे विनोद, शिव्या किंवा लैंगिकतेचा उघड उच्चार, काहीतरी घाणेरडं अशी ‘अश्लील’ शब्दाविषयी लोकांची धारणा आहे. काही लोक प्रगतही आहेत, पण प्रगत असोत वा मागासलेले तरुणांच्या समस्या, लैंगिक प्रश्न यावर प्रत्येकाशी बोलण्याची आज गरज आहे हे जाणवले. कारण बोलून आकलन होण्यापेक्षा न बोलून गैरसमज झालेले केव्हाही वाईटच, असे त्यांनी सांगितले.

आलोकच्या मते, ‘अश्लील’ या शब्दाचा इंग्रजी अर्थ ‘व्हल्गर’ असा होतो. जो मूळ ‘व्हल्गस’ या लॅटिन शब्दावरून आला आहे. आणि व्हल्गसचा अर्थ आहे सर्वसामान्य माणूस. त्यामुळे या शब्दात काय वाईट आहे याचा आपणच विचार करायला हवा, असे सांगतानाच सध्या आपल्याकडे शुद्धीकरणाची प्रक्रिया जोरदार सुरू आहे. त्यामुळे संस्कृती रक्षणाच्या नावाखाली आपण पुन्हा जुन्या काळात प्रवेश करण्याचा पवित्रा उचलला आहे. जो प्रगत समाजाला अत्यंत घातक असल्याचा मुद्दा आलोकने मांडला. ‘शील आणि सदाचार जपण्याच्या नावाखाली एक प्रकारे भीतीचं वातावरण समाजात आहे. त्यामुळे आपण स्वत:विषयीही खुलेपणाने बोलणं टाळतो. सातत्याने आदर्शमय जगण्याचा ध्यास धरणारे आपण तितके आदर्शवादी आहोत का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. सहिष्णुतेचा, सुसंस्कृतपणाचा आव समाजात वाढतो आहे. त्यामुळे यातून बाहेर पडून वास्तवाकडे पहायची आवश्यता आहे’, असेही तो सांगतो.

कथेविषयी बोलताना अभय म्हणाला, ही तरुण वर्गाची गोष्ट आहे. महानगरी जीवनाचा अर्क यात मांडण्यात आला आहे. दहीहंडीला कलाकार बोलवण्याची प्रथा आपल्याकडे चांगलीच रूढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात सनी लिओनिला बोलवण्यात आलं होतं. याची बरीच चर्चा झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर हा चित्रपट लिहिण्यात आला आहे. कथेतील आतिश हा मुलगा आपल्या कल्पनेतल्या एका कॉमिक पॉर्न पात्राला दहीहंडीला बोलावण्याचे ठरवतो. आतिशच्या मनातल्या लैंगिक प्रश्नांना ती उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सई ताम्हणकरने साकारलेली ही व्यक्तिरेखा चित्रपटात अकथित मुद्दय़ांना वाचा फोडण्याचं काम करते. दुसरीकडे आतिश आणि सना एकमेकांच्या प्रेमात आहेत. तर सना आणि पूर्णा या दोन मैत्रिणीही एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यामुळे प्रेमातून समलैंगिकतेवरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यात करण्यात आला असल्याचे त्याने सांगितले.

या चित्रपटाच्या शीर्षकावरून बरेच वाद रंगले. त्यात ब्राह्मण महासभेने शीर्षकाला कडकडून विरोध केला. त्यांच्या मते ही एक ‘सॉफ्ट पॉर्न फिल्म’ आहे, परंतु या विधानाचे खंडन करताना आलोक सांगतो, यूए सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेल्या सिनेमावर अशा पद्धतीचे आरोप करणे हे बिनबुडाचे आहे. आरोप करणारे एकूणच संस्कृतीची मक्तेदारी आपल्याकडे आहे अशा अविर्भावात जगतात. यांच्या अंगी असलेले सांस्कृतिक ब्राह्मण्य समाजाच्या अधोगतीस कारणीभूत ठरत आहे. त्याच्या मते, हे आजचे नाही. अशा अनेक चित्रपटांना त्यांनी विरोध केला आहे. जर त्यांचा नव्या आशयाला विरोध असेल तर काही दिवसांनी पुन्हा देवीदेवतांचे चित्रपट काढण्याची वेळ येईल. आधी चित्रपट पाहा आणि मग भाष्य करा. त्याचा नक्कीच विचार केला जाईल.

‘पुरुषाचे पौरुषत्व दाखवण्यासाठी त्याने मारामाऱ्या करणं, कौमार्य ढाळणं हे हल्ली गरजेचं वाटू लागलं आहे. आपण वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरही व्हर्जिन आहोत याचं दडपण घेऊन जगतात हल्लीची मुलं. आणि हा गमतीने घेण्याचा विषय नाही, असे अभय सांगतो. ‘आतिश’ या पात्राच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या भावभावना समोर येतील, जे आजवर त्यांनी पांढरपेशा समाजाच्या भीतीने दडवून ठेवल्या होत्या. आज व्यसनांचा आधार घेऊन आपण वास्तव विसरण्याचा प्रयत्न करतो, पण वास्तव विसरायची गरज का पडते? कारण आपण व्यक्त होत नाही, व्यक्त न झाल्याने त्यावर तोडगा निघत नाही. परिणामी मानसिक स्वास्थ्य  अधिकच चिघळत जाते, असे तो सांगतो. हा लैंगिकतेवर भाष्य करणारा चित्रपट आहे, अंग प्रदर्शन, चुंबन, द्वयअर्थी विनोद करणारा नाही, असेही अभयने स्पष्ट केले.

एकीकडे आपण चित्रपटातून या पिढीच्या वास्तवावर बोट ठेवत आहोत, मात्र दुसरीकडे आपण ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या प्रवाहात वाहत चाललो आहोत, याबद्दल आलोकने खंत व्यक्त केली. ऐतिहासिक चित्रपट करणे हे जोखमीचे काम आहे. विषय जरी जुने असले तरी त्याची अभ्यासपूर्ण मांडणी करणे कठीण असते. मात्र कधीतरी प्रश्न पडतो अजून आपण काळाच्या किती मागे जाणार आहोत? सद्य:स्थिती स्वीकारून विषय मांडले नाहीत तर बदलत्या समाजातल्या गोष्टी आपण अर्धवटपणे समजून बसू. आदर्शवादी चित्रपट करणं हे दिग्दर्शकाच काम नाही. त्यांनी नवीन कथा मांडाव्यात आणि त्यातून जर एखाद्याला आदर्श घ्यावासा वाटला तर ते त्या चित्रपटाचं यश असेल, असे तो म्हणतो. तर पर्ण सांगते, काही वर्षांपूर्वी आलेला ‘देव डी’ हा चित्रपट काळाच्या पुढे जाऊन भाष्य करणारा होता. त्यातले विचार, बोल्डनेस जर आज मांडले गेले असते तर चित्रपटाला अनेक ठिकाणी कात्री लागली असती. परंतु हिंदीतील वातावरण मराठीपेक्षा काहीसे पुढारलेले असल्याने तिथे अनेक संवेदनशील विषय धिटाईने मांडले जातात.  मराठीतही हा बदल होणे अपेक्षित आहे. ऐतिहासिक चित्रपट नक्कीच यावेत परंतु त्यातून काय घ्यायचं आहे हेच कुणाला कळत नाही. केवळ उत्साह आणि रांगडेपणा न घेता सद्य:स्थितीत जगण्यासाठी त्या महापुरुषांचे कोणते गुण आपल्याला अंगीकारावे लागतील याचा विचार व्हायला हवा, असे ती सांगते.