कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतात. आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली असून पुढील भागामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित राहणार आहेत.

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’च्या पुढील भागामध्ये मकरंद अनासपुरे अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर या दोन्ही दिग्गजांसोबत गप्पा मारणार असून या भागामध्ये अशोक चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केल्याचं दिसून येत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीही त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

या कार्यक्रमामधील चक्रव्ह्यू राउंडमध्ये अशोक चव्हाण यांनी राज ठाकरेंविषयी मत व्यक्त केलं असून ‘मित्र म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे ‘मित्र असावा तर राज ठाकरेंसारखा’, असं अशोक चव्हाण म्हणाले.

पुढे ते असंही म्हणाले, ‘मी शाळेमध्ये असताना गणित हा माझा कच्चा विषय होतो. तसाच राजकीय गणितातही मी थोडा कच्चाच आहे. अजून मी पक्का झालो नाही. त्यामुळे मला हेवेदावे समजत नाही. मी कायम सत्याची वाट धरली आहे. समोर एक आणि पाठीमागे एक असे दुतोंडी चेहरे करुन फिरणं मला जमत नाही’.

दरम्यान, अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर यांची या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आणि किस्से  १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर पाहता येणार आहेत.