08 March 2021

News Flash

‘विनोदाचा ‘मीटर’ पाळावाच लागतो’

‘शेंटिमेंटल’ या चित्रपटात ते कॉन्स्टेबलची भूमिका करतायत.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचं विद्यापीठ असा उल्लेख केला की ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं नाव पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं. मराठी चित्रपटांची धुरा एकेकाळी ज्या निवडक कलाकारांच्या खांद्यावर होती त्यातले अशोक सराफ हे खमकं नाव. त्यांनी केवळ मराठी चित्रपटांमधूनच नाही, तर हिंदी चित्रपटांमधूनही इतरांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावली. मराठी रंगभूमी, हिंदी मालिका.. माध्यम कोणतंही असो. त्यांनी ज्या ज्या भूमिका केल्या, त्या त्या भूमिकांमधून ते लोकांच्या मनात आजही घर करून आहेत. टीव्ही म्हटलं की ‘हम पाँच’, ‘तू तू मैं मैं’ या त्यांच्या मालिका हमखास आठवतात. त्यांच्या मराठी चित्रपटांची तर लडीच्या लडी उलगडली जाते. विनोदाचा बादशहा असलेला हा अभिनेता ‘शेंटिमेंटल’ या आगामी मराठी चित्रपटामधून पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत समोर येणार आहे. त्यानिमित्ताने, ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने आयोजित केलेल्या ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी आणि दिग्दर्शक समीर पाटील यांनी खास गप्पा मारल्या.

‘शेंटिमेंटल’ या चित्रपटात ते कॉन्स्टेबलची भूमिका करतायत. मराठी चित्रपटांतून त्यांनी केलेली पांडू हवालदारची भूमिका गाजली होती. त्यामुळे ‘शेंटिमेंटल’ चित्रपटापर्यंत पोहोचता पोहोचता आपलं प्रमोशन झालं आहे आणि पद कॉन्स्टेबल असं झक्कास इंग्रजीत म्हटलं तरी तो साधा पोलीस उपनिरीक्षकच असं ते गमतीने म्हणतात. विनोदी अभिनय हा त्यांचा हुकमी एक्का. कुठलेही अंगविक्षेप न करता चांगला विनोद करणारे, लोकांना पोट धरून हसायला लावणारे अभिनेते आजही कमी आहेत. याचं कारण स्पष्ट करताना विनोद हा विनोदाने घेण्याची गोष्टच नाही मुळी.. असं ते सांगतात. विनोद हा गंभीरपणेच केला पाहिजे. आपण काहीतरी पंच टाकला, विनोदी वाक्य टाकलं म्हणजे विनोद होत नाही. त्याला एक मीटर असतं, टायमिंग असतं, लय असते, त्या संवादांचा आपला वेग असतो. विनोद करताना स्वत:चा संवाद कुठे संपतोय आणि दुसऱ्याचं सुरू होऊन कुठे संपतं याच्या हिशोबाने आपला संवाद सुरू झाला पाहिजे. चांगल्या विनोदाचीही व्याख्या समजावताना आपल्याच चित्रपटाचं उदाहरणही त्यांनी गप्पांमध्ये दिलं.

‘धूमधडाका’ चित्रपटातील त्यांचा ‘व्ॉख्खॅ..विख्खि.. विख्खू.’ करत संवाद म्हणण्याची स्टाईल लोकांना भलतीच आवडून गेली. आता तो संवाद म्हणून म्हणून घसा जायची पाळी आली तरी लोकांना माझ्या तोंडून हा संवाद ऐकायचाच असतो, अशी मिश्कील टिप्पणी करणाऱ्या अशोक सराफ यांनी कुठल्याही व्यक्तिरेखेचं स्वभावविशेष असं ठरवून करता येत नाही, हेही स्पष्ट केलं. या चित्रपटात नायिकेचे वडील बनून मी जेव्हा येतो तेव्हा ‘धनाजी वाकडे इथेच राहतात का?’, असा प्रश्न विचारून हातातील पाईप ओढतो असं ते दृश्य होतं. त्याआधी मी कधी पाईप ओढला नव्हता. तो पाईप ओढणं ही सोपी गोष्ट नव्हती. मी तो ओढला, त्यातला तंबाखू कडक होता, तो एकदम तोंडात गेला आणि मला खोकला आला. आता हा पाईप चित्रपटभर ओढायचा आहे आणि जेव्हा जेव्हा आपण दृश्यामध्ये पाईप ओढणार तेव्हा खोकलाही येणार हे माझ्या लक्षात आलं. मग मी त्या खोकल्यालाच त्या व्यक्तिरेखेचा स्वभावविशेष बनवून टाकला आणि मग एक संवादच्या संवादच मी त्या ‘व्ॉख्खॅ..विख्खि.. विख्खू.’तून लोकांपर्यंत पोहोचवू लागलो. तेव्हा ते एवढं लोकप्रिय होईल, असं वाटलं नव्हतं. पण अशी गोष्ट न ठरवता केली तरच ती खरी वाटते, हेही त्यांनी सांगितलं. त्यांच्या म्हमद्या खाटकाच्या भूमिकेचाही असाच किस्सा त्यांनी यावेळी ऐकवला. रंगभूमीशी आपली नाळ कधी सुटू शकत नाही कारण तिथूनच आपली सुरुवात झाली. त्यावेळीही चित्रपटातून काम करत असलो तरी नाटकाचं महत्त्व जास्त होतं. त्यामुळे त्यावेळी आम्ही श्रीरामपूरला नाटकाचा प्रयोग करत होतो. आणि त्याचवेळी ‘राम राम गंगाराम’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यातली माझी म्हमद्या खाटकाची भूमिका फारच गाजली होती. त्यावेळी म्हणजे मी ‘स्टार’ अशोक सराफ झालो होतो. तर नाटकाच्या प्रयोगासाठी मेकअप करत असतानाच तिसरी घंटा व्हायची वेळ आली होती आणि तेवढय़ात चार धटिंगण, अंगावर रक्ताचे डाग असलेले कपडे, राकट चेहरे असे आत शिरत माझी चौकशी करू लागले. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्ही खाटिक आहोत आणि तुम्ही आता आमच्याच समाजातले आहात, आमच्या समाजाचं नाव तुम्ही उंचावलंय, म्हणून तुमचा सत्कार करायचा आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मी म्हटलं ठीक आहे, करा सत्कार.. पण नाही. त्यांना स्टेजवर येऊन माझा सत्कार करायचा होता. त्यामुळे स्टेजवर एखादा हलाल करायला नेताना सजवलेला बकरा असतो तशी माझी अवस्था झाली होती. नाटकापूर्वी त्यांनी माझा सत्कार केला, तीन-चार भाषणंही ठोकली. यातला गमतीतला भाग सोडला तर त्यांच्यातलाच एक वाटावा इतकी ती भूमिका खरी उतरली होती आणि त्याची खरी पोचपावती अशा रीतीने मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

अशोक सराफ हे गिरगांवकर. त्यामुळे याच गिरगावात त्यांची खाशी मैत्री क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याशी होती. एकाच शाळेत शिकत, कॉलनीत टीममध्ये क्रिकेट खेळत आम्ही दोघं मोठे झालो, हे सांगताना तो उत्तम क्रिकेटपटू आहे हे अनेकांना माहिती असलं तरी तो उत्तम अभिनेता आहे हे कोणाला फारसं माहीत नाही, असं ते म्हणाले. दर रविवारी आमचे क्रिकेटचे सामने रंगायचे. त्या लहान वयातही तो इतकी अप्रतिम फटकेबाजी करायचा की आम्हाला फक्त पळत जाऊन लांब गेलेले त्याचे चेंडू आणणं एवढंच काम असायचं. आम्ही आमचा खेळ सोडून त्याची फलंदाजी बघत बसायचो. त्याला आऊट करणं ही त्यावेळी आमच्यासाठी अशक्यकोटीतील गोष्ट होती. पण सुनील तितकाच चांगला अभिनेता आहे. त्याने चित्रपटातून फार काम केलेलं नाही. आम्ही तेव्हा रेडिओसाठी अनेक नाटकं एकत्र केली आहेत. गिरगावातील आम्ही मित्रमंडळी एकत्र नाटकांत काम करायचो. त्यावेळी आम्ही दोघांनी ‘गुरुदक्षिणा’ हे नाटक केलं होतं. ज्यात त्याने कृष्णाची भूमिका केली होती. कारण तो त्यावेळी गोंडसच दिसायचा आणि मी त्यात बलरामाची भूमिका केली होती. त्या नाटकातील आमची जोडी, त्याचा फोटो आजही त्याच्याकडे आहे, अशी आठवण त्यांनी सांगितली. चित्रपटातील अशोक सराफ म्हटलं की शर्टाचं वरचं बटण उघडं टाकण्याची त्यांची स्टाईलही लोकांना आठवते. ती स्टाईल म्हणजे त्यावेळी तशा प्रकारे शर्ट घालायची स्टाईलच होती, असं ते म्हणतात. आणि अगदीच व्यावहारिक कारण द्यायचं तर त्यावेळी हिरोसाठी शिवून आणलेले कपडे म्हणजे.. माझं माप तेव्हा कधी वाढायचं तर कधी कमी व्हायचं. कोल्हापुरात आलो की वजन वाढायचं आणि मुंबईत परतलो की बारीक व्हायचो. त्यामुळे वजन वाढल्यावर मग तो फिट शर्ट घालून अवघडलेलं दिसण्यापेक्षा वरचं बटन उघडं ठेवणं सोईचं होतं. त्यावेळच्या कित्येकदा अध्र्या चित्रपटात मी जाडा तर अध्र्या चित्रपटात बारीक दिसलो आहे, असंही त्यांनी गमतीने सांगितलं.

सोहळे-समारंभ-प्रसिद्धी यापासून जाणीवपूर्वक दूर राहिलो असं ते म्हणतात. सोहळ्यांमधलं एकाच छापाचं वागणं कधीच पटलं नाही. अभिनेता म्हणून सेटवर कायम निरीक्षण करणं, भूमिकेत राहणं हे आपलं तत्त्व होतं. त्यातूनच अभिनेता म्हणून घडत गेल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरात जास्तीत जास्त चित्रीकरण केलं असल्याने तिथल्या आठवणी खूप आहेत. आजही तिथे अनेकदा जाऊन रहायची इच्छा होते, असं ते म्हणाले. ‘शेंटिमेंटल’नंतर रंगभूमीवर एखादं नाटक करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अर्थातच, त्यांना आवडेल अशी व्यक्तिरेखा, संहिता हवी तरच नाटक करेन. नाटक निवडण्याच्या बाबतीत मी फारच खडूस आहे, असंही सांगायला ते मागेपुढे पाहत नाहीत.

विनोद ही अगदी बारीक रेषेवरून चालणारी गोष्ट आहे. तुमचं पाऊल रेषेच्या जरा इकडे आलं की तिथे खाली कोसळणार, दुसरीकडे तोल गेला की तिथे कोसळणार. त्यामुळे विनोदाचा तो बारीकसा धागा पकडून सरळ आणि सातत्याने चालत राहणं हे कलाकाराचं कसब असतं. कुठलाही लेखक जेव्हा विनोदी संवाद लिहितो तेव्हा तो त्याने त्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेला असतो. लोकांसमोर तो सादर करताना त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने तो अभिनयातून व्यक्त करणं हे कलाकाराचं काम असतं. आणि म्हणून अतिशय विचारपूर्वक, विनोदाचा हा मीटर पाळूनच तुम्हाला अभिनय करावा लागतो. तरच तुम्ही एक चांगले विनोदी अभिनेते म्हणून लौकिक कमावू शकता.

अशोक सराफ

समाजाने ‘शेंटिमेंटल’ होणे गरजेचे –  समीर पाटील

‘पोश्टर बॉईज’ आणि ‘पोश्टर गर्ल’ या दोन चित्रपटांनंतर अनेक विषय डोक्यात होते. पोलिसांची गोष्ट मला प्रकर्षांने करावीशी वाटली. ‘शेंटिमेंटल’ची गोष्ट एको सहप्रवाशाने सांगितलेल्या अनुभवावरून घेतली आहे. म्हणजे कुठे तरी त्याला वास्तवाचा आधार आहे. एका प्रवासात त्याने मला अनेक गोष्टी सांगितल्या, मात्र त्यातली एकच गोष्ट मला खूप मनात ठसली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या गोष्टींतून पोलिसांमधील माणूस जाणवतो. आपण बऱ्याचदा पोलिसांच्या कथा हिंदी-मराठी चित्रपटांतून पाहिल्या आहेत. त्यात पोलीस ‘सिंघम’सारखे एक तर खूप चांगले असतात नाही तर दुसरं म्हणजे ते खूप वाईट, भ्रष्टाचारी असतात. मला हे असं काळंपांढरं चित्र रंगवायचं नव्हतं. फक्त पोलिसांबद्दलच नव्हे तर एकूणच समाजात वावरताना आपण काही एक भान ठेवून, संवेदनशीलतेने ‘शेंटिमेंटल’ होऊन वागणं गरजेचं आहे. हीच गोष्ट फक्त पोलिसांच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला आहे. माझ्या प्रत्येक चित्रपटात उपदेश न करता पण एखादा विषय नर्मविनोदी शैलीत मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. याही चित्रपटातून मी हलक्याफुलक्या पद्धतीने गोष्ट सांगितली आहे. आणि त्यासाठी अशोक सराफ यांच्यासारख्या अभिनेत्याने कुठलेही आढेवेढे न घेता गोष्ट ऐकताच काम करायला होकार दिला हे खरं भाग्य आहे. अशोक सराफ स्वत: सुपरस्टार आहेत. अडीचशे-तीनशे चित्रपट त्यांनी केले आहेत. त्यांना गोष्ट आवडली आणि त्यांनी चित्रपट केला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तीच गोष्ट उपेंद्र लिमयेची. उपेंद्र राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आहे. त्याने जेव्हा पटकथा ऐकली तेव्हा हा पूर्णपणे अशोकमामांचाच चित्रपट आहे हे त्याने मोकळेपणाने मान्य केलं. पण मला त्यांच्या या चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल, असं म्हणत त्याने भूमिकेची लांबी, महत्त्व न पाहता हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे या भावनेने त्याने काम केलं. एकीकडे हे दोघं अनुभवी कलाकार आहेत. तर त्यांच्याबरोबर विकास पाटील, पल्लवी पाटील आणि नाशिकचा सुयोग गोरे अशी नव्या कलाकारांची फळी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:39 am

Web Title: ashok saraf sameer patil promoting movie shentimental in loksatta facebook live
Next Stories
1 आप्पा!
2 अजब प्रवासाची ‘गज’ब कहानी!
3 ..तो पैसा परत
Just Now!
X