|| मानसी जोशी

आक्षेपार्ह दृश्यामुळे गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेले ‘आश्रम २’, ‘अ सुटेबल बॉय’, ‘तांडव’, ‘मिर्झापूर’ या वेब मालिकांना प्रचंड वादाचा सामना करावा लागला. या मालिकांमधील दृश्ये आक्षेपार्ह आहेत. त्यामुळे कधी प्रेक्षकांच्या, कधी धार्मिक-राजकीय संस्थांच्या भावना दुखावल्याचे कारण पुढे करत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या गेल्या, आंदोलने केली गेली. याआधी चित्रपटांनाही अशाच प्रकारे वादांचा सामना करावा लागला आहे. एकीकडे डिजिटल माध्यमांवर सरकारी नियंत्रण असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे अप्रत्यक्षपणे ओटीटी माध्यमांवर सेन्सॉरशीप लादली जात असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने ‘मिर्झापूर’ या वेब मालिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून याप्रकरणी अ‍ॅमेझॉन प्राइम आणि वेब मालिकेच्या निर्मात्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ‘मिर्झापूर’ या वेब मालिकेतील काही दृश्यांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असून यामुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचा दावा या याचिके त करण्यात आला आहे. यात मिर्झापूर शहराबद्दल वाईट पद्धतीने चित्र रंगवण्यात आले असून त्यामुळे तेथील रहिवाशांच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे या याचिके त नमूद करण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम वाहिनीला बसलेला हा लागोपाठ दुसरा झटका आहे. खरंतर या वादाची सुरुवात झाली ती ‘तांडव’ या वेबमालिके मुळे… बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची प्रमुख भूमिका असलेली ‘तांडव’ ही वेबमालिका नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखल झाली. अली अब्बाल जफर दिग्दर्शित या वेब मालिकेत हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे दृश्य असल्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणी सुरू झाली. या वेब मालिके च्या एका भागात अभिनेता मोहम्मद झीशान अय्यूब नाटकात भगवान शंकराची भूमिका करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यात त्याने अपशब्द वापरल्याने हिंदू देवदेवतांची विटंबना झाली असल्याच्या अनेक तक्रारी माहिती प्रसारण मंत्रालयाकडे आल्या होत्या. याप्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल झाला आणि तपासासाठी उत्तर प्रदेशचे पोलीस मुंबईत दाखल झाले. हे नेहमीसारखे प्रकरण असेल असे वाटत असतानाच अली अब्बास जफर, लेखक गौरव सोळंकी, अ‍ॅमेझॉन प्राइमच्या अपर्णा पुरोहित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अटक टाळण्यासाठी या तिघांनी जामीन मंजूर करून घेतला. या सगळ्या घटना एकापाठोपाठ एक घडत असतानाच खुद्द माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या तिघांशी संवाद साधला. या तिघांनीही लगोलग माफी मागत आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकण्याचे आश्वाासन दिलं आणि अशा पद्धतीने दृश्ये काढून टाकत नव्याने प्रदर्शित झालेली ही पहिली वेबमालिका ठरली आहे.

‘तांडव’ वेबमालिके वरून सुरू झालेले हे सेन्सॉरशिपचे तांडव एकं दरीतच सध्या ओटीटीसारख्या प्रभावी माध्यमावर निशाणा साधला जात असल्याचे चित्र निर्माण करणारे आहे. टाळेबंदीच्या काळात ओटीटी माध्यमे वेगाने विस्तारली. चित्रपट-वेबमालिकांच्या निर्मितीचा आकडा वाढता गेला, अर्थकारणही वाढले. त्यामुळे आत्तापर्यंत कु ठल्याही निर्बंधांपासून मुक्त असलेल्या वेबमालिकांच्या आशयावरून उद्भवलेले वाद, त्याविरोधातील आक्रमक भूमिका पाहता या नवमाध्यमांना अप्रत्यक्षपणे सेन्सॉरशिपच्या कात्रीत अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे वाटत असल्याचे मत ‘नक्षलबारी’ आणि ‘समांतर’ या वेब मालिकांचे निर्माते कार्तिक निशानदार यांनी व्यक्त केले. गेल्या चार ते पाच वर्षात प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर ओटीटी माध्यमांकडे वळले आहेत. गेल्या वर्षीच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ओटीटीवर नियंत्रण आणण्यासाठीचे धोरण ठरवण्यात येणार असल्याचे जाहीर के ले. मात्र ओटीटी माध्यमांवरील आशयाबाबतीत जी भूमिका घेतली आहे तशी भूमिका छोट्या पडद्यावरील मालिकांच्या बाबतीत तितक्या तीव्रतेने घेतली जात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रेक्षकांना दैनंदिन जीवनातील न रुचणाऱ्या तसेच न पटणाऱ्या घटना आणि प्रसंग मालिके तही दाखवण्यात येतात. सासू-सुनेचे भांडण, कट कारस्थाने, विष देऊन मारणे यांसारख्या न पटणाऱ्या अनेक गोष्टी दाखवल्या जातात. म्हणून कोणी छोट्या पडद्यावर निशाणा साधत नाहीत, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे मालिकेवर कोणीही अशा पद्धतीने आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. दहा ते बारा वर्षांपूर्वी छोट्या पडद्याला अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मालिकेच्या आशयावर काही प्रमाणात निर्बंध आले होते, आता हेच कमी अधिक प्रमाणात ओटीटी माध्यमावरही होत असताना दिसत असल्याची भावना निशानदार यांनी व्यक्त के ली.

सध्या ‘आश्रम २’, ‘मिर्झापूर’ तसेच ‘तांडव’ या वेब मालिकांना वादाचा सामना करावा लागतो आहे. तुमच्या कलाकृतीत अशी आक्षेपार्ह अथवा संवेदनशील दृश्ये नसतील तर दिग्दर्शकांना घाबरण्याची काही गरज नाही. तुमच्या कलाकृतीवर कोणी आक्षेप घेतल्यास त्यासाठी लढण्याची धमक असली पाहिजे, असे मत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी व्यक्त के ले. भारतासारख्या विविधता असलेल्या देशात काही ठरावीक प्रकारच्या आशयामुळे काही लोकांना वाईट वाटणे साहजिक आहे. आणि वेब मालिकांच्या येण्याआधीसुद्धा अनेक चित्रपटातील आशय प्रेक्षकांना न आवडल्याने तक्रारी केल्या गेल्या आहेत. याबद्दल न्यायालयातही खटले लढवले गेले आहेत आणि त्याचे निकाल चित्रपटांच्या बाजूने लागले आहेत. मात्र समाजमाध्यमे असू दे अथवा ओटीटी प्लॅटफॉर्म आशयाबाबत काही नियम सगळ्यांनाच असून त्याचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एखादा आशय प्रेक्षकांना न आवडल्यास त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याचा पर्याय त्यांच्या हातात असतो. हा विषय नाजूक असून तो संवेदनशीलतेनेच हाताळण्याची गरज आहे. ‘विश्वारूपम’, ‘पीके’, ‘पद्मावत’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटांनाही अशा प्रकारे वादाचा सामना करावा लागला होता. पण त्यांनी न्यायालयीन लढाई लढून याबाबतीत न्यायही मिळवला आहे. माध्यम कु ठलेही असो, अन्यायाविरोधात लढण्याची सगळ्यांनी तयारी ठेवली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका रेणुका शहाणे यांनी मांडली.