‘पद्मावत’, ‘टाइगर जिंदा है’ आणि ‘वॉर’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अनुप्रिया गोयंका. तिने सेक्रेड गेम्स आणि आश्रम या वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. नुकताच अनुप्रियाची ‘आश्रम २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान तिने एका मुलाखतीमध्ये ती १८ वर्षांची असताना अध्यात्मिक गुरुंनी तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

नुकताच अनुप्रियाने इ-टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ती १८ वर्षांची असतानाचा अनुभव सांगितला आहे. ‘माझ्या कुटुंबीयांचा एका अध्यात्मिक गुरुंवर प्रचंड विश्वास होता. मी पण त्यांच्यावर हळूहळू विश्वास ठेवायला लागले होते. त्यांनी मला अनेक सल्ले दिले आणि मला ते पटले देखील’ असे अनुप्रियाने म्हटले.

पुढे तिने ‘त्यांनी माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. मी तेव्हा १८ वर्षांची होते. मी त्यांना गैरफायदा घेऊ दिला नाही. तेव्हा मी घाबरले होते. सुदैवाने त्यांना फायदा घेण्याची संधी मी दिली नाही. मी तिथून निसटले होते. माझं मन मला सांगत होतं मी ते ऐकायला हवं होतं. पण तिथेही मनातल्या मनात माझं युद्ध सुरू होतं. आमच्या सुरुवातीच्या काही भेटीगाठीतून मला काही तरी चुकीचं घडत असल्याचं जाणवत होतं. मी स्वत:वरच शंका घेऊ लागले. कारण माझा त्याच्यावर विश्वास होता आणि हे अशक्य असल्याचं मला वाटायचं’ असं ती म्हणाली.