News Flash

मानवी मूल्यांचा मेलोड्रामा

नाटककार प्रा. वसंत कानेटकरांचं ‘अश्रूंची झाली फुले’ हे मेलोड्रामा शैलीतलं गाजलेलं नाटक.

‘अश्रूंची झाली फुले’ : रवींद्र पाथरे

नाटककार प्रा. वसंत कानेटकरांचं ‘अश्रूंची झाली फुले’ हे मेलोड्रामा शैलीतलं गाजलेलं नाटक. ते रंगभूमीवर आल्याला आता अर्धशतकाहून अधिक काळ लोटलाय. त्यावर बेतलेला ‘आसू बन गए फूल’ हा हिंदी सिनेमाही त्याकाळी लोकप्रिय ठरला होता. परंतु तेव्हाचा काळ आणि आजचा काळ यांत जमीन-अस्मानाचं अंतर पडलंय. त्याकाळचं काहीएक आदर्श मानवी मूल्यं जपणारं सामाजिक वातावरण आणि आज सर्वदूर फोफावलेला अतिरेकी व्यक्तिवाद यांत काहीच ताळमेळ उरलेला नाहीए. या पाश्र्वभूमीवर कानेटकरांचं ‘अश्रू..’ पुनश्च रंगमंचावर अवतरलं आहे. त्यामुळेच त्याकडे एका वेगळ्या नजरेनं पाहणं क्रमप्राप्त ठरतं. केवळ गतरम्यता म्हणून या नाटकाकडे पाहिलं तर काही प्रश्न नाही. परंतु गत आणि वर्तमान काळाची तुलना करू जाता या नाटकात खटकणारे अनेक मुद्दे जाणवतात. विशेषत: यातली काळ्या-पांढऱ्या रंगांत रंगवलेली पात्रं त्यावेळी सहज स्वीकारली गेली असली तरी आज माणसांचं जगणं एवढं गुंतागुंतीचं आणि व्यामिश्र झालं आहे, की या नाटकातील वास्तवाकडे कसं पाहावं असा प्रश्न पडतो.

प्रो. विद्यानंद हे आदर्श मूल्यांचे कट्टर पुरस्कर्ते. ते ज्या कॉलेजचे प्राचार्य आहेत, त्या संस्थेचे आश्रयदाते धर्माप्पा हे काळे धंदे आणि पैशांच्या जोरावर अनेक बेकायदेशीर उपद्व्याप करणारे गृहस्थ आहेत. लाल्या हा प्रो. विद्यानंदांच्या कॉलेजातला वरकरणी गुंडाछाप वाटणारा, परंतु मूलत: सत्प्रवृत्त विद्यार्थी. तो एके दिवशी धर्माप्पाच्या मुलाबरोबर काहीतरी झकाझकी झाल्याने त्याच्यावर सुरा उगारतो. त्यामुळे संतप्त झालेला धर्माप्पा लाल्याची कॉलेजमधून हकालपट्टी करावी म्हणून प्रो. विद्यानंदांना सांगायला येतो. त्याचवेळी लाल्याही तिथे आलेला असतो. तो धर्माप्पाला उडवून लावतो. परंतु प्रो. विद्यानंद लाल्याला गप्प करतात आणि घडल्या प्रकाराची स्वत: जातीने चौकशी करून नंतरच मी लाल्यावर योग्य ती कारवाई करेन असं ते धर्माप्पाला सांगतात. त्यावर धर्माप्पा चिडतो. आपण संस्थेचे आश्रयदाते आणि ट्रस्टी आहोत याची तो प्रो. विद्यानंदांना जाणीव करून देतो. परंतु विद्यानंद आपल्या निर्णयापासून माघार घेत नाहीत. अर्थात लाल्यालाही ते बजावतात, की तू गुन्हा केलेला आहेस आणि त्यात तू दोषी आहेस असं मला आढळल्यास मी तुला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. तू ती निमूटपणे स्वीकारायला हवीस. लाल्या ते मान्य करतो.

कॉलेजमधील प्रो. विद्यानंदांचे सहकारी प्रा. आरोळे आणि प्रा. क्षीरसागर हे ‘धर्माप्पाशेठजींना दुखवू नका, ते महागात पडेल,’ असं विद्यानंदांना समजवायचा बराच प्रयत्न करतात. प्रो. विद्यानंदांकडेच लहानाचा मोठा झालेला, त्यांना मुलासारखा असलेला आणि आता त्यांच्याच कॉलेजात उपप्राचार्य असलेला श्यामही विद्यानंदांना धर्माप्पांशी वृथा पंगा घेऊ नका असं सांगू पाहतो, परंतु तत्त्वनिष्ठ प्रो. विद्यानंद कुणालाच बधत नाहीत.

चौकशी होऊन लाल्याला प्रो. विद्यानंद शिक्षा करतात. परंतु त्याला कॉलेजातून काढून टाकत नाहीत. हा आपला अपमान आहे असं धर्माप्पाला वाटतं. तो प्रो. विद्यानंदांवर सूड उगवण्यासाठी श्यामला हाताशी धरून त्यांना कॉलेजमधील अफरातफरीच्या गुन्ह्य़ात अडकवतो. प्रो. विद्यानंदांवरील आरोप सिद्ध होऊन त्यांना तुरुंगवासाची सजा होते. मात्र, या सगळ्या काळात प्रो. विद्यानंदांची डॉक्टर पत्नी सुमित्रा त्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभी असते. त्यांची या आरोपातून सुटका व्हावी म्हणून ती न्यायालयाचे दरवाजे ठोठावते. मात्र, न्यायदेवता त्यांना न्याय देत नाही.

विद्यानंदांचा एकेकाळचा वाया गेलेला मित्र शंभू महादेव हा त्यांच्याविरोधात धर्माप्पाने सूडबुद्धीने केलेल्या कृत्याचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करतो. परंतु विद्यानंदांनी कायदा हातात घेऊन काही करायला मनाई केल्याने त्याचा नाइलाज होतो.

माणुसकी आणि विश्वास या दोन शब्दांवरील विश्वास उडालेले प्रो. विद्यानंद तुरुंगाबाहेर आल्यावर संपूर्णपणे बदललेले असतात. तस्करी, गैर धंदे यांत ते माहीर होतात. धर्माप्पाचा सूड घेण्याचं ते ठरवतात. त्यासाठी घरादार, पत्नी यांचाही ते त्याग करतात. आता अधोविश्वातले डॉन म्हणून ते सर्वत्र ओळखले जाऊ लागतात. डॉ. सुमित्रा त्यांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न करते, पण त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. मात्र, एकदा अचानक योगायोगाने त्यांचा ठावठिकाणा तिला कळतो. ती तिथे जाऊन त्यांना भेटते. विद्यानंद प्रारंभी तिला ओळखच दाखवीत नाहीत. तिची आपल्यावरची निष्ठा संपावी, तिच्या मनातून आपण उतरावं म्हणून ते खोटं नाटकही करतात. परंतु सुमित्रा हार मानणारी नसते. आपलं खरं रूप ओळखण्यासाठी तू उद्या विमानतळावर ये, असं विद्यानंद तिला सांगतात. तिथे दुबईतून तस्करीचा माल येणार असतो आणि तो सोडवण्यासाठी ते स्वत: जातीने हजर राहणार असतात. त्याचवेळी आपल्या कर्तृत्वाने एक प्रामाणिक व धडाडीचा पोलीस अधिकारी म्हणून ख्याती पावलेला लाल्या या कुख्यात डॉनला पकडण्यासाठी सापळा लावून बसलेला असतो..

अर्थात पुढे काय घडतं, हे नाटकात पाहणंच योग्य.

हिशेबी कथानकाचं हे नाटक वसंत कानेटकरांनी नाटय़पूर्ण घडामोडींनी उत्तरोत्तर  उत्कंठावर्धक होईल याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्या काळातील शैलीबाज अभिनयासाठी रसिकांच्या गळ्यातले ताईत झालेले डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी या नाटकात लाल्याची भूमिका साकारली होती. आणि त्यांच्या प्रचंड लोकप्रियतमुळे या नाटकाचे हाऊसफुल्ल गर्दीत शेकडय़ाने प्रयोग झाले होते. खरं तर हे नाटक मूळात लाल्याचं नसून ते प्रो. विद्यानंदांचं आहे. पुनरुज्जीवित नाटकात दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी ते कटाक्षाने प्रो. विद्यानंदांचंच राहील याची दक्षता घेतली आहे. याही वेळी ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ चित्रपटातील घाणेकरांच्या भूमिकेमुळे प्रेक्षकप्रिय झालेले सुबोध भावे या नाटकात लाल्याच्या भूमिकेत आहेत. मात्र, त्यांनी नाटक आपल्याभोवती फिरावं असा हट्टाग्रह धरलेला नाही. (प्रेक्षक मात्र त्यांच्यासाठी नाटकाला येतात, हेही तितकंच खरं.)

दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी या नाटकातली मेलोड्रामाची मात्रा काही अंशी कमी करून ते वास्तवाच्या थोडं जवळ येईल असा यत्न केला आहे. आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या आहेत. त्यामुळे लाल्या असो वा प्रो. विद्यानंद.. त्यांच्या उक्ती व कृतीत नाटकीयतेचा अंश बराच कमी झाला आहे. नाटककारानं मुळात ते मेलोड्रामा स्वरूपात लिहिलं असल्याने संपूर्ण मेलोड्रामा वजा करणं मात्र शक्य नव्हतं. असो. (काही छोटी पात्रं वगळता) प्रत्येक पात्राला ‘चेहरा’ देण्यात दिग्दर्शिकेला यश आलं आहे. प्रयोगाची पक्की बांधणी हेही नाटकाचं वैशिष्टय़. कुणाही कलाकाराला भूमिकेच्या वर हावी होण्यास त्यांनी दिलेलं नाही. प्रत्येकाला त्याच्या मापात ठेवलं आहे. प्रदीप मुळ्ये यांनी प्रो. विद्यानंदांचा प्रशस्त बंगला, डॉनचा अड्डा आणि तुरुंग नाटकाच्या मागणीनुरूप साकारला आहे. प्रकाशयोजनेची धुराही त्यांनीच सांभाळली असल्याने नाटय़पूर्ण प्रसंग ठळक करण्यावर त्यांनी भर दिला आहे. मिलिंद जोशी यांचं पाश्र्वसंगीत, गीता गोडबोले यांची वेशभूषा आणि कमलेश यांची रंगभूषा यांनी आपापली कामगिरी चोख वठविली आहे.

प्रो. विद्यानंदांच्या भूमिकेत शैलेश दातार यांनी भावभावनांची आंदोलनं आणि तत्त्वनिष्ठ वृत्तीतला ठामपणा जसा उत्तम दर्शविला आहे, तद्वत डॉनच्या भूमिकेतला रूबाबदेखील! वरकरणी खलनायकी मुखवटा पांघरलेल्या प्रो. विद्यानंदांचं अंतर्यामीचं आक्रंदनही त्यांनी अवघ्या देहबोलीतून मूर्त केलं आहे. लाल्या झालेल्या सुबोध भावे यांनी त्याचं दुपेडी व्यक्तिमत्त्व अचूक टिपलं आहे. त्याच्यातली बंडखोर वृत्ती आणि सुष्टतेकडे असलेला त्याचा उपजत ओढा यांच्यातलं द्वंद्व त्यांनी सुंदर दाखवलंय. विशेषत: क्लायमॅक्सच्या प्रसंगात कर्तव्य आणि गुरूप्रतीचा आदरभाव यांच्यात निवड करताना लाल्याची होणारी बेचैन घालमेल त्यांनी अप्रतिम पोहोचविली आहे. प्रणव जोशींचा संयत खलनायक धर्माप्पा त्याच्या थंडपणातूनही चीड निर्माण करतो. सीमा देशमुख यांनी डॉ. सुमित्रांचं धीरोदात्त व्यक्तिमत्त्व शारीर बोली आणि संवादांतून नेमकेपणी पोचवलं आहे. उमेश जगताप यांनी एकाच वेळी खलप्रवृत्ती आणि मैत्रही जपणारा सच्चा मित्र यांच्या संमिश्रणातून  शंभू महादेव लोभसपणे आकारला आहे. उपप्राचार्य श्यामरावची द्विधावस्था प्रथमेश देशपांडे यांनी यथार्थपणे दर्शविली आहे. रवींद्र कुलकर्णी (प्रा. आरोळे) आणि जितेंद्र आगरकर (प्रा. क्षीरसागर) यांनी स्वार्थापायी पतित होणारी ‘माणसं’ सूक्ष्म बारकाव्यांनिशी वास्तवदर्शी रंगवलीयत. अन्य कलाकारांनीही पूरक भूमिकांत चोख साथ केली आहे.साठच्या दशकातला हा मेलोड्रामा काहीशा संयत रूपात पाहताना काळाचे संदर्भ आणि तुलना मनात नक्कीच जागवतो यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 1:59 am

Web Title: ashroonchi zhali phule vasant kanetkar marathi natak akp 94
Next Stories
1 चतुरस्र चिन्मय..
2 गुपितांचा खेळ
3 नव्या मालिकांचा सुसाट प्रवास
Just Now!
X