सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला मानूस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आता बॉलिवूडमध्येही येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हिंदीमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. यामध्ये परेश रावल मुख्य भूमिका साकारणार आहेत. फेब्रुवारीमध्ये नानांचा ‘आपला मानूस’ प्रदर्शित झाल्यानंतर मे महिन्यात हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. यासाठी सतीश राजवाडेसुद्धा मदत करणार आहेत.

‘मुंबई मिरर’शी साधलेल्या संवादात परेश रावल म्हणाले की, ‘चित्रपटाची मूळ कथा मराठी नाटक ‘काटकोन त्रिकोण’वर आधारित आहे. गुजराती भाषेत मी हे नाटक केलं होतं. आशुतोष यांनी ते नाटक पाहिलं आणि त्यावरून चित्रपटनिर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली. हिंदी चित्रपटाबद्दल काम सुरू असून मे महिन्यात शूटिंगला सुरुवात होणार आहे. मराठी नाटक बऱ्याच महिन्यांपूर्वी आलं होतं, पण गुजराती आणि हिंदी भाषेतील नाटकाचे प्रयोग अजूनही सुरु आहेत. या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत.’

वाचा : अबब! गणेश आचार्यने फस्त केल्या २०० इडल्या

या चित्रपटातील इतर कलाकारांची शोधाशोध सुरु असल्याचेही परेश रावल यांनी स्पष्ट केले. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला मानूस’ची निर्मिती अजय देवगण करणार असून त्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत तो झळकणार आहे.