इतिहासातील काही उत्कृष्ट कथानक, काही महत्त्वाचे प्रसंग यांची सुरेख मांडणी करत मोठ्या प्रभावीपणे हे प्रसंग सध्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे चित्रपट. बॉलिवूडमधील काही दिग्दर्शक ऐतिहासिक कथा साकारण्यासाठी या माध्यमाचा अतिशय समर्पक वृत्तीने वापर करतात. त्यातीलच एक नाव म्हणजे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर. ‘पानिपत’चा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आशुतोष ‘पानिपत- द ग्रेट ब्रेट्रेयल’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यासाठी आता जोरदार तयारीला सुरुवात झाली असून शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारण्याचं काम सुरू आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने यासंदर्भातील माहिती दिली असून भूमिपूजनाचे फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कर्जत इथल्या एनडी स्टुडिओत शनिवाड्याची प्रतिकृती उभारली जाणार असून आशुतोष गोवारिकरच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून गोवारिकर रेकी अर्थात चित्रीकरणासाठी योग्य अशा ठिकाणांची पाहणी करत होते.

काही दिवसांपूर्वीच आशुतोषने ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाची घोषणा करत सोशल मीडियावरुन या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता. यात संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. बिग बजेट प्रोजेक्ट असणाऱ्या ‘पानिपत’चं महत्त्वं पाहता चित्रीकरणासाठी आता संपूर्ण टीमसह खुद्द आशुतोषही तयारीला लागला आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.