आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत या चित्रपटानं देशभरातून मोठी कमाई केली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील जाट समुदायाकडून या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत होता. तसंच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही जाट समुदायाकडून करण्यात आली होती. चित्रपटातील एका भागावर जाट समुदायानं आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता चित्रपटाला होणारा विरोध लक्षात घेता या चित्रपटातून ११ मिनिटांचा वादग्रस्त भाग काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराजा सूरजमल यांच्याशी निगडित वादग्रस्त भाग चित्रपटातून काढण्यात आला असून चित्रपट पुन्हा सेन्सर बोर्डाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचा कालावधी ११ मिनिटांनी कमी झाला आहे.
भरतपूरचे जाट राजा महाराज सूरजमल यांना चित्रपटात एक स्वार्थी व्यक्तीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर जाट समुदायाकडून या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. या चित्रपटाला विरोध करणाऱ्या जाट महासभेच्या नेत्यांसाठी मंगळवारी या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यानंतर जाट महासभेच्या नेत्यांनी चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती. तसंच या चित्रपटात कथितरित्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर प्रशासनाही चित्रपटावर बंदी घालण्याचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं होतं. या चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय डिस्ट्रिब्युटर्स आणि थिएटर मालकांनी आपल्या स्तरावर घेतला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2019 10:52 am